डॉ. हेमंत जोशी, डॉ. अर्चना जोशी
ठिसूळ सहज मोडणारी हाडे हा सध्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. कमजोर भिंती आणि ठिसूळ खांब असलेली इमारत काही वर्षांतच कोसळते. तशीच आपली हाडे ही कमजोर असल्यास सहज मोडतात. त्याने आपले आयुष्य कमी होते. आपल्यापैकी बहुतेकांची हाडे ही कमजोर बनत आहेत आणि ते आपल्याला माहितीही नाही.
ठिसूळ हाडे म्हणजे ऑस्टिओपोरोसिस. हे कमजोर हाडांच्या आजाराचे नाव आहे. हा आजार आपल्याला कमजोर बनवतो. गर्भापासूनच आपली हाडे कमजोर असतात. ती जीवनसत्त्वाने मजबूत होतात. भारतीय अभ्यास सांगतो की, प्रत्येक तिसऱ्या भारतीयाची हाडे ठिसूळ आहेत. स्त्रियांत हे प्रमाण जास्त आहे. ६५ वर्षांवरील प्रत्येक तिसरी व्यक्ती दरवर्षी पडते. जी व्यक्ती एकदा पडते, ती पुन्हा पुन्हा पडते. पडल्यावर दर प्रत्येक दहाव्या माणसाचे हाड मोडते. बरे झाल्यावरही काही कमजोरी राहतेच. आपल्याकडे कमरेचे हाड मोडायचे सरासरी वय हे ५५ वर्षे आहे. पडल्यामुळे कमरेचे हाड मोडते. यामुळे एका वर्षाच्या आत अनेकांचा मृत्यू होतो. गरीब आणि कुपोषित लोकांमध्ये हाड मोडायचे प्रमाण जास्त असते.
आपली हाडे कमकुवत का असतात?
१. कुपोषण व ‘ड’ जीवनसत्त्व व चुन्याचा अभाव हे विशेषतः गर्भवतींची आणि बालपणी आपली हाडे कमकुवत करतात. आपण पोषण करून संतुलित आहार गर्भाशय काळापासून पुढे आयुष्यभर घ्यायला हवा.
२. ‘ड’ जीवनसत्त्व अन्नातून चुना म्हणजे कॅल्शियम शोषून घेते. ते कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या मदतीने आपली हाडे मजबूत करते. अभ्यास सांगतो की, आपल्या सर्वांना रोज ‘ड’ जीवनसत्त्व आणि कॅल्शियमची कमतरता भासते. याच्या अभावामुळे आपली हाडे कमकुवत, कमी लांबीची, कमी रुंदीची असतात. म्हणून आपली उंची कमी असते. शारीरिक कष्ट, हालचाल, खेळ, यांनी आपली हाडे आणि स्नायू मजबूत, लवचिक होतात.
अभ्यासानुसार, भारतात ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे प्रमाण सुमारे ९४ टक्के म्हणजे खूपच जास्त आहे. याचे कारण अंगभर कपडे घालणे, सावलीत राहणे, शहरीकरण आणि बैठे काम यामुळे त्वचेवर सूर्यप्रकाश पडत नाही. लठ्ठ आणि मधुमेहींमध्ये हे प्रमाण अधिक आढळते.
जेव्हा दुपारचा सूर्यप्रकाश आपल्या उघड्या त्वचेवर १ तास पडतो, तेव्हा त्वचेखाली पुरेसे ‘ड’ जीवनसत्त्व तयार होते. यासाठी आपण दुपारच्या उन्हात असणे आवश्यक आहे. आपल्या किमान अर्ध्या उघड्या अंगावर ऊन पडले पाहिजे.
भारतात रोजच्या आहारात चुना म्हणजे कॅल्शियम कमी आहे. आपल्याला दररोज १ ग्रॅम चुन्याची म्हणजे कॅल्शियमची गरज असते. हैदराबाद येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन’च्या अभ्यासानुसार, बहुतांश भारतीयांमध्ये कॅल्शियमची कमतरता आहे. लोहाच्या अभावापेक्षा चुन्याच्या अभावाचे प्रमाण जास्त आहे.
हाडे ठिसूळ होणे, हाडे मोडणे हे टाळणेच हिताचे आहे. त्यासाठी खालील गोष्टी करा :
नियमित कष्ट करा. व्यायाम करा. दुपारच्या उन्हात १ तास घालवा. संतुलित आहार घ्या.
लहानपणापासूनच चुना म्हणजे कॅल्शियमचे पुरेसे सेवन केल्यास हाडे ठिसूळ होणे, हाडे मोडणे हे टाळता येते.
जेवणानंतर दिवसातून दोनदा पान खा. आपण त्याला चुना लावतो. त्यातून आपल्याला चुना म्हणजे कॅल्शियम मिळते. चुना स्वस्त आहे, पण औषधाच्या स्वरूपात तो खूप महाग पडतो. पानाला काथ लावून खावे. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते असे एक अभ्यास सांगतो. पान खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि खाण्याचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे वजन कमी होते.
दररोज ३०० मिली दूध किंवा दही घ्या. तंबाखू, धूम्रपान आणि मद्यपान बंद करा.
असे केल्याने हाडे मजबूत होतात आणि हाडे मोडण्याचा धोका ८६ टक्केने कमी होतो. यामुळे आपल्याला निरोगी आणि दीर्घायुष्य मिळते.
अपघात टाळा. अपघातांमुळे हाडे मोडतात. पडणे टाळा. 10 पैकी 8 लोक घरीच पडतात. पडणारा दर दूसरा माणूस घरी स्नानघरात पडतो. म्हणूनच ज्येष्ठांसाठी घरे सुरक्षित करायला हवीत. पडणे टाळण्यासाठी खालील गोष्टी कराव्यात.
पडण्यापूर्वीच वयाच्या ५५ व्या वर्षापासून काठीचा वापर सुरू करावा.
स्नानघरात आपण घसरणार नाहीत अशा टाईल्स किंवा प्लास्टिकची जाळी वापरा.
घरातील सर्व भिंतींवर आणि जिन्याला रेलिंग (पकडण्यासाठी आधार) बसवावेत.
चालताना काळजी घ्या. अंधाऱ्या आणि निसरड्या जागा टाळाव्यात. योग्य चष्मा वापरावा. पावसाळ्यात विशेष काळजी घ्या. प्रत्येक पाऊल हळू व सावध पणे टाकावे.
चांगली पकड तळवे असलेले बूट वापरा. हाडे मोडण्यावर होणाऱ्या उपचारांच्या खर्चापेक्षा हे स्वस्त आहे.