Habit of Saying Sorry | ‘सॉरी’चा आजार 
आरोग्य

Habit of Saying Sorry | ‘सॉरी’चा आजार

पुढारी वृत्तसेवा

डॉ. संतोष काळे

एखाद्याला प्रश्न विचारायचा असो, स्वतःचे मत मांडायचे असो किंवा अगदी किरकोळ गोष्टीसाठी दुसर्‍याची मदत घ्यायची असो, शिंक आली तरी काही व्यक्तींच्या तोंडून नकळत ‘सॉरी’ हा शब्द बाहेर पडतो. आपली चूक नसतानाही माफी मागणे, दुसर्‍याची गैरसोय होऊ नये म्हणून सतत स्वतःला दोष देणे किंवा कोणत्याही प्रसंगात समोरच्याची नाराजी टाळण्याचा प्रयत्न करणे, अशा सवयी अनेकांमध्ये आढळतात. वरकरणी हा स्वभाव नम्रपणाचा किंवा सभ्यतेचा वाटत असला, तरी त्यामागे काही मानसिक कारणे दडलेली असू शकतात.

लहानपणी घरातील वातावरण सतत तणावपूर्ण असेल, पालकांच्या स्वभावात अचानक बदल होत असतील किंवा विरोध केल्यामुळे रागाला सामोरे जावे लागत असेल, तर मुलांमध्ये संघर्ष टाळण्याची प्रवृत्ती निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत पटकन माफी मागितल्याने वाद मिटतो, असा अनुभव त्यांच्या मनावर ठसतो. पुढे परिस्थिती बदलली तरी ही सवय कायम राहू शकते. परिणामी, स्वतःची चूक नसतानाही वाद टाळण्यासाठी माफी मागितली जाते.

आपण इतरांवर ओझे आहोत, अशी भावना काही व्यक्तींना आपल्या गरजा, अपेक्षा किंवा मतांमुळे इतरांना त्रास होत असल्याची सतत जाणीव असते. साधी मदत मागतानाही त्यांना अपराधी वाटते. आपण कोणाच्या वेळेचा अपव्यय तर करत नाही ना, आपल्यामुळे कोणाची गैरसोय तर होत नाही ना, अशी चिंता त्यांच्या मनात असते. त्यामुळे स्वतःचे अस्तित्व आणि गरजा स्वीकारण्याऐवजी त्या सतत माफी मागतात. नकार मिळण्याची भीतीही या वर्तनामागे असू शकते.

सर्वांना खूश ठेवण्याचा प्रयत्न इतरांच्या भावना जपणे आणि प्रत्येकाला खूश ठेवण्याचा प्रयत्न करणे यामध्ये फरक आहे. काही व्यक्ती समोरच्याला नाराज करणे म्हणजे आपण चुकीचे वागलो, असे समजतात. त्यामुळे स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून त्या इतरांच्या अपेक्षांना प्राधान्य देतात. सतत माफी मागणे हा त्यांच्या दृष्टीने चांगले संबंध टिकवण्याचा मार्ग बनतो. कालांतराने या सवयीमुळे स्वतःच्या भावनिक गरजांकडे दुर्लक्ष होऊ शकते. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या गरजा स्पष्टपणे सांगण्याचा आणि गरज पडल्यास नकार देण्याचा अधिकार असतो. परंतु, काहींना नकार दिल्यामुळे समोरची व्यक्ती दुखावेल किंवा संबंध बिघडतील, अशी भीती वाटते. त्यामुळे स्वतःची मर्यादा सांगतानाही त्या आधी माफी मागतात. काही वेळा संभाव्य वाद टाळण्यासाठी स्वतःची भूमिका मांडण्याचेही टाळतात.

ही सवय बदलण्यासाठी स्वतःच्या गरजा आणि भावनांना महत्त्व देण्यास शिकणे आवश्यक आहे. इतरांचा आदर राखताना स्वतःच्या अस्तित्वाबद्दल अपराधी वाटून घेण्याची गरज नाही. चूक झाल्यास माफी मागणे योग्यच आहे; परंतु प्रत्येक वेळी स्वतःला दोषी समजणे आवश्यक नाही. नम्रपणा जपण्यासाठी आत्मसन्मानाशी तडजोड करण्याची गरज नसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT