शरीर निरोगी ठेवण्यासाठी दूध फायदेशीर ठरते.  File Photo
आरोग्य

आरोग्यदायी दूध

दूध पिण्याची सवय आयुष्यभर ठेवू शकते निरोगी

पुढारी वृत्तसेवा
डॉ. मनोज कुंभार

लहान मुलांच्या मागे दूध पी, दूध पी, असे म्हणत मागे लागणार्‍या अनेक माता आपण पाहतो. त्यांचे ते मुलांच्या मागे लागणे आणि आईचा त्रागा पाहून मग घरातील मोठी मंडळी म्हणतात, त्याला नको असेल तर कशाला जबरदस्तीने दूध पाजतेस, डॉक्टरही मुलांना जबरदस्तीने दूध पाजू नका, असा सल्ला पालकांना देतात. आता लहान मुलांना दूध पिण्याची सक्ती किती करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न असला, तरी दूध पिण्याची सवय ही आयुष्यभर आपल्याला निरोगी ठेवू शकते, हे मात्र खरे.

भारतात प्राचीन काळापासून आहारात दुधाचा समावेश करण्यात आला आहे. आयुर्वेदात तर दुधाला, विशेषत: देशी गायीच्या दुधाचे महत्त्व सांगितले आहे. गायीचे ताजे दूध आणि त्यापासून तयार केलेले साजूक तूप हे दोन्ही आरोग्यदायी असते. इतर दुधांच्या आणि दुग्धजन्य पदार्थांच्या तुलनेत गायीचे दूध पचायला हलके असते. शरीराच्या वाढीसाठी गायीचे दूध पोषक ठरते. दूध कच्चे किंवा निरसे प्यावे, असे म्हटले जात असले तरी ते एकदा तरी उकळून घेतलेले चांगले. कारण दूध उकळल्याने त्यातील अ‍ॅमिनो अ‍ॅसिडसचे विघटन होते. गायीचे दूध गर्भवती, स्तनपान करणार्‍या महिला आणि लहान मुलांसाठी अतिशय आरोग्यदायी असते.

चिमूटभर हळद, मिरी, आल्याचे तुकडे आणि दालचिनी टाकून दूध उकळले तर त्यामुळे शरीराचा जडपणा कमी होतो आणि सर्दी कमी होते. गायीच्या दुधात जीवनसत्त्व ए, बी2, बी3, कॅल्शियम आणि प्रोटिन असते. त्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. आम्लपित्त कमी करण्यास याचा उपयोग होतो. साहजिकच पेप्टिक अल्सर होण्याची शक्यताही कमी असते. आयुर्वेदाने थंड दूध पिणे अहितकारक असल्याचे सांगितले आहे. कारण यामुळे शरीरातील अग्नीचे शमन होते आणि त्यामुळे त्यातील पोषक घटक निष्प्रभ ठरतात. यामुळे सर्दी होण्याचा संभव असतो. सबब कोमट दूध पिणे हितकारक.

गायीचे तूप अतिशय गुणकारी असते. दुधाच्या पदार्थांपासून ज्यांना अ‍ॅलर्जी असते, त्यांच्यासाठीही तूप गुणकारी ठरते. सर्वसाधारणपणे दिवसातून दोन वेळा चमचाभर तूप पुरेसे ठरते. लठ्ठ आणि कोलेस्टरॉलचे प्रमाण अधिक असलेल्यांनी तूप जास्त प्रमाणात खाऊ नये. लहानपणी मुलांना दूध पिण्याची सवय लावली तर अनेक आजारांपासून त्यांना आपोआपच दूर ठेवता येईल. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी दूध अतिशय उपयुक्त आहे. अनेकदा शरीरात कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्या जातात. दूध आपल्याला सहज उपलब्ध असते. रोज एक किंवा दोन ग्लास दूध प्यायल्याने आपण निरोगी आणि सुद़ृढ नक्कीच राहू. म्हणूनच केवळ पैलवानांचे पेय म्हणून दुधाकडे न पाहता, आयुष्यात तंदुरुस्त राहायचे असल्यास आपल्या आहारात दुधाला महत्त्वाचे स्थान द्यायला हवे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT