डॉ. संतोष काळे
योगाभ्यास करण्यासाठी उपयुक्त असे योगा मॅट अनेक जण हल्ली वापरताना दिसतात; पण त्यांची खरेदी करताना केवळ रंग किंवा किंमत न पाहता तांत्रिक बाबी समजून घेणे आवश्यक आहे.
सर्वसाधारणपणे बाजारात ‘पीव्हीसी’ (पॉलीविनाईल क्लोराईड), ‘टीपीई’ (थर्मोप्लास्टिक इलास्टोमर) आणि नैसर्गिक रबर अशा तीन प्रकारचे मॅट उपलब्ध असतात. पीव्हीसी मॅट स्वस्त आणि टिकाऊ असल्या, तरी त्या पर्यावरणासाठी हानिकारक असतात आणि त्यातून विशिष्ट प्रकारचा रासायनिक वास येऊ शकतो. याउलट, टीपीई मॅट अधिक हलक्या आणि पुनर्वापर करण्यायोग्य असतात. नैसर्गिक अनुभवाची ओढ असेल, तर झाडांच्या डिंकापासून बनवलेली नैसर्गिक रबराची मॅट सर्वोत्तम ठरते. कारण, तिची पकड (ग्रिप) इतर कोणत्याही कृत्रिम मटेरियलपेक्षा अधिक मजबूत असते.
हाताने दाबल्यावर जर मॅट लगेच मूळ आकारात येत असेल, तर ती उच्च घनतेची आणि गुणवत्तेची आहे असे समजावे. मॅटची ‘सेल स्ट्रक्चर’ (पेशी संरचना) यामध्ये ‘ओपन सेल’ आणि ‘क्लोज्ड सेल’ असे दोन प्रकार असतात. ओपन सेल मॅटस्मध्ये सूक्ष्म छिद्रे असतात जी घाम शोषून घेतात. यामुळे हात ओले असतानाही निसरडे होत नाहीत. परंतु, अशा मॅटमध्ये बॅक्टेरिया आणि दुर्गंधी साचण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा मॅटची वारंवार स्वच्छता करावी लागते. याउलट, क्लोज्ड सेल मॅटस् घाम शोषत नाहीत. त्या स्वच्छ करणे सोपे असते आणि त्या अधिक काळ टिकतात; पण घाम आल्यावर त्या निसरड्या होऊ शकतात. अशा वेळी मॅटवर कापडी टॉवेल पसरणे हा एक चांगला उपाय ठरतो.
तुम्हाला ‘अष्टांग’ योगप्रकार करायचे असतील, तर जास्त खडबडीत किंवा ‘स्टिकी’ टेक्श्चर असलेली मॅट निवडावी.
मॅटची लांबीसुद्धा तुमच्या उंचीपेक्षा किमान 6 इंच जास्त असावी, जेणेकरून शवासन किंवा ताडासन करताना तुमचे शरीर मॅटच्या बाहेर जाणार नाही.
नवीन मॅट सुरुवातीला थोडी निसरडी असू शकते. उत्पादनाच्या प्रक्रियेत त्यावर एक पातळ फिल्म तयार झालेली असते. ही फिल्म घालवण्यासाठी नवीन मॅट मिठाच्या पाण्याने पुसून घेणे किंवा काही दिवस ती वापरणे आवश्यक असते.
ज्याला तांत्रिक भाषेत ‘ब्रेकिंग इन’ असे म्हणतात. तसेच, नैसर्गिक रबराच्या मॅटला सूर्यप्रकाशात जास्त वेळ ठेवल्यास तिचे ऑक्सिडीकरण होऊन ती कडक होऊ शकते, त्यामुळे तिची निगा राखणे वेगळे असते. या सर्व तांत्रिक गोष्टींचा विचार करून घेतलेली मॅट केवळ आरामच देत नाही, तर योगाभ्यासातील दुखापतींचा धोकाही कमी करते. तुमची शारीरिक गरज आणि योगप्रकाराची तीव्रता ओळखून योग्य ’जीएसएम’ (ग्रॅम्स प्रतिस्क्वेअर मीटर) असलेल्या मॅटची निवड करणे हे दीर्घकालीन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.