डॉ. मनोज शिंगाडे
अलीकडच्या काळात फिश ऑईल कॅप्सूल घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विशेषतः जिम करणारे, फिटनेसची आवड असलेले आणि हृदयाचे आरोग्य जपणारे अनेक जण डॉक्टरांचा सल्ला न घेता हे सप्लिमेंट सुरू करतात. फिश ऑईल कॅप्सूल प्रत्येकासाठी आवश्यक किंवा सुरक्षित असतीलच असे नाही. चुकीच्या पद्धतीने किंवा गरजेपेक्षा जास्त प्रमाणात घेतल्यास त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात.
नॉनअल्कोहोलिक फॅटी लिव्हर असलेल्या काही रुग्णांमध्ये फिश ऑईलचा फायदा होऊ शकतो. यामुळे यकृतात साचलेली चरबी आणि सूज कमी होण्यास मदत मिळू शकते. फिश ऑईलमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, ईपीए आणि डीएचए हे महत्त्वाचे घटक असतात. शरीर हे घटक स्वतः तयार करू शकत नाही. त्यामुळे ते आहारातून किंवा सप्लिमेंटद्वारे मिळवावे लागतात. काही संशोधनांनुसार, फिश ऑईल यकृतातील फायब्रोसिसची प्रक्रिया मंदावण्यास मदत करू शकते. त्यामुळे भविष्यातील यकृताच्या गंभीर समस्यांचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो.
तुम्ही आधीपासून रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल, तर फिश ऑईल डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. ओमेगा-३ मध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची प्रक्रिया काही प्रमाणात कमी करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे रक्तस्रावाचा धोका वाढू शकतो.
गरजेपेक्षा जास्त प्रमाणात फिश ऑईल घेतल्यास अपचन, मळमळ, उलटी, पोटदुखी, गॅस किंवा जुलाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
ज्यांना मासे किंवा समुद्री अन्नाची अॅलर्जी आहे, त्यांनी फिश ऑईल कॅप्सूल घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा गंभीर अॅलर्जिक प्रतिक्रिया येऊ शकतात.
फिश ऑईल कॅप्सूल जेवणानंतर घेणे अधिक योग्य मानले जाते. चरबीयुक्त आहारासोबत घेतल्यास त्यातील ओमेगा-३ शरीरात अधिक चांगल्या प्रकारे शोषले जाते. डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणापेक्षा जास्त डोस घेऊ नका.
तुम्ही नियमितपणे मासे, अक्रोड, जवसाच्या बिया किंवा इतर ओमेगा-३ युक्त पदार्थ खात असाल, तर अतिरिक्त सप्लिमेंटची गरज आहे का, हे डॉक्टरांकडून तपासून घ्या.