Acidity Tablet | पित्ताच्या गोळ्या नियमित घेताय? 
आरोग्य

Acidity Tablet | पित्ताच्या गोळ्या नियमित घेताय?

पुढारी वृत्तसेवा

डॉ. महेश बरामदे

धावपळीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या अनियमित सवयींमुळे आजकाल अनेकांना पोटात जळजळ होणे, छातीत अन्नाचा त्रास जाणवणे किंवा पोटात अतिप्रमाणात आम्लनिर्मिती होणे (अ‍ॅसिडिटी) यांसारख्या समस्या नेमाने सतावतात. अशा वेळी अनेक जण वैद्यकीय सल्ल्याविना थेट आम्ल कमी करणार्‍या औषधांचे किंवा गोळ्यांचे सेवन करू लागतात. काही जणांची तर ही सवयच बनून जाते. परंतु, विनाकारण आणि दीर्घकाळ या औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.

प्रत्येक वेळी पोटात दुखणे किंवा जळजळ होणे म्हणजे गॅस किंवा अ‍ॅसिडिटीच असते, हा गैरसमज नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे. गॅलस्टोन, पित्ताशयाचे आजार, स्वादुपिंडाच्या समस्या किंवा हृदयाशी संबंधित गंभीर आजारांच्या सुरुवातीची लक्षणे देखील पोटात दुखण्याच्या स्वरूपात समोर येऊ शकतात. अशावेळी केवळ गॅसेसची औषधे घेत राहिल्यामुळे मूळ आजाराचे निदान होण्यात मोठा विलंब होतो.

याशिवाय, सतत आणि दीर्घकाळ आम्ल निर्मिती रोखणार्‍या गोळ्या घेतल्यामुळे शरीरातील नैसर्गिक संरक्षणात्मक यंत्रणेवर विपरीत परिणाम होतो. पोटातील आम्ल हे अन्नाचे पचन करण्यासाठी आणि शरीरात प्रवेश करणार्‍या हानीकारक जंतूंचा नाश करण्यासाठी आवश्यक असते. या आम्लाची निर्मिती कृत्रिमरीत्या सातत्याने दाबून ठेवल्यास शरीराची प्रतिकारशक्ती मंदावते.

वैद्यकीय संशोधनानुसार, सतत आम्ल कमी करणार्‍या औषधामुळे शरीरात क्युबॅकझीयम आणि व्हिटॅमिन बी बाराची कमतरता निर्माण होऊ शकते. यामुळे हाडे कमजोर होणे, फ्रॅक्चरचा धोका वाढणे, तीव्र अशक्तपणा आणि सांधेदुखी यांसारख्या समस्या उद्‌भवू शकतात. विशेषतः ज्या लोकांना आधीपासूनच मूत्रपिंडाचा म्हणजेच किडनीचा त्रास आहे, त्यांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय अशा औषधांचे सेवन अजिबात करू नये, कारण यामुळे मूत्रपिंडावर अतिरीक्त ताण येतो. याशिवाय, शरीरात योग्य आम्ल न राहिल्यामुळे छातीचे संक्रमण, फुफ्फुसांमध्ये जंतुसंक्रमण आणि न्युमोनियाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.

या समस्येवर मात करण्यासाठी जीवनशैलीत आणि आहारामध्ये सकारात्मक बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. आहारात चहा आणि कॉफीचे प्रमाण मर्यादित ठेवणे, अतिशय तिखट व तेलकट अन्नपदार्थ टाळणे, शरीराचे वजन नियंत्रित राखणे तसेच धूम्रपान आणि मद्यपानापासून पूर्णपणे दूर राहणे फायदेशीर ठरते. कोणत्याही स्थितीत स्वतःच्या मनाने कोणतीही औषधे दीर्घकाळ सुरू ठेवणे किंवा अचानक बंद करणे टाळावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT