डॉ. बिपीनचंद्र भामरे
थंड वातावरणाच्या संपर्कात आल्यावर शरीरातील रक्तवाहिन्या नैसर्गिकरीत्या आकुंचन पावतात. शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी ही प्रक्रिया उपयुक्त असली, तरी त्यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. तसेच रक्तदाब वाढल्याने हृदयावर अतिरिक्त ताण येतो. विशेषतः हृदय शस्त्रक्रियेनंतर शरीर पूर्ववत होण्याच्या प्रक्रियेत असताना हा ताण लक्षात घेणे गरजेचे आहे.
हृदयरुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?
शरीर उबदार ठेवा : थंडीपासून बचाव करण्यासाठी आरामदायी आणि उबदार कपडे वापरावेत. बाहेर जाताना छाती, हात, पाय आणि डोके झाकलेले राहील याची काळजी घ्यावी. अचानक थंड वातावरणाच्या संपर्कात येणे टाळावे.
अतिश्रम करू नका : जड वस्तू उचलणे, अतिश्रमाचे व्यायाम करणे किंवा बाहेरील अंगण अथवा परिसराची साफसफाई यांसारखी कामे टाळावीत. व्यायाम किंवा शारीरिक हालचाली पुन्हा सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
औषधे नियमित घ्या : रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्यावीत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे बंद करू नयेत किंवा त्यांचे प्रमाण बदलू नये.
आहाराकडे लक्ष द्या : संतुलित आहार घ्यावा. आहारातील मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवावे. डॉक्टरांनी पाणी पिण्यावर निर्बंध घातले नसल्यास पुरेसे द्रवपदार्थ घ्यावेत.
व्यायामाची योग्य वेळ निवडा : डॉक्टरांच्या परवानगीनुसार घरात हलका व्यायाम करावा. अतिथंडीच्या वेळी बाहेर व्यायाम करणे टाळावे.
पुरेशी झोप घ्या : शरीराला विश्रांती मिळणे पुनर्वसनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे नियमित आणि पुरेशी झोप घ्यावी.
लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका : छातीत दुखणे, नेहमीपेक्षा अधिक धाप लागणे, चक्कर येणे, हृदयाची धडधड वाढणे किंवा अचानक अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
हृदय शस्त्रक्रियेनंतरची प्रकृती सुधारण्याची प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडण्यासाठी थंडीच्या दिवसांतही आरोग्यविषयक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. योग्य काळजी आणि वेळेवर वैद्यकीय सल्ल्याच्या मदतीने हृदयाचे आरोग्य सुरक्षित ठेवता येऊ शकते.