हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी 
आरोग्य

हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी : उच्च रक्तदाबाचा डोळ्यांवरही परिणाम, 'हे' पदार्थ पूर्णपणे टाळा

रक्तदाबाचा परिणाम डोळ्यांवरही

पुढारी वृत्तसेवा
डॉ. महेश बरामदे

उच्च रक्तदाब अनेक आजारांना आमंत्रण देतो, हे अनेकांना माहिती असते. हाय ब्लडप्रेशरमुळे हृदयविकार, अर्धांगवायूचा झटका किंवा मूत्रपिंडाचे आजार होऊ शकतात; पण उच्च रक्तदाबाचा परिणाम डोळ्यांवरही होऊ शकतो, याबाबत अनेक जण अनभिज्ञ असतात. याविषयी...

उच्च रक्तदाबामुळे डोळ्यांच्या रेटिनाच्या रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. आपण जे काही पाहतो त्याची प्रतिमा रेटिना बनवत असते. उच्च रक्तदाबामुळे हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी हा आजार होऊ शकतो. रक्तदाबाच्या पातळीवर या आजाराची तीव्रता अवलंबून असते. जेवढा रक्तदाब जास्त तेवढी डोळ्यातील गुंतागुंत वाढते. त्यामुळे अर्थातच नजरेवर परिणाम होतो. योग्य उपचार झाले नाहीत, तर गुंतागुंत गंभीर स्वरूप धारण करू शकते.

उच्च रक्तदाब असणार्‍या प्रत्येक व्यक्तीला डोळ्याचा आजार होईल असे नाही; मात्र बर्‍याच रुग्णांमध्ये हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी हा उच्च रक्तदाबामुळे होणारा आजार आढळून येतो. यामुळे रेटिनाला सूज येते. डोळ्यातील रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. त्या रुंद होतात. परिणामी, आपल्या द़ृष्टीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. रक्तदाब खूप वाढला की, डोळ्यांभोवती वेदना आणि तीव्र डोकेदुखी सुरू होते. हे एक गंभीर लक्षण मानले जाते.

ब्लडप्रेशर वाढल्याने मेंदूतील दाब वाढून मेंदूतील नसांवर दबाव पडतो. हा दाब काही वेळा इतका जास्त असतो की, आपल्या डोळ्यांतील पडद्यावर कोणतीही आकृती तयार होत नाही. परिणामी, रुग्णाला काहीही दिसत नाही. डोळ्यांच्या नेहमीच्या तपासणीमध्ये हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी हा त्रास लक्षात येतो. म्हणून रक्तदाबाची नियमित तपासणी करून घ्या. वैद्यकीय सल्ल्याने योग्य औषधे वेळच्या वेळी घेणे गरजेचे आहे. याशिवाय आपल्या जीवनशैलीतही काही बदल करणे अपेक्षित आहे. आहारात फळे, भाज्या, सालासकटचे धान्य यांचा समावेश असला पाहिजे. कमी चरबी असलेले दूध आणि दूधाच्या पदार्थांचा समावेश असावा. ट्रान्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स असणारे पदार्थ पूर्णपणे टाळा.

- मीठाचे सेवन कमी करा.

- नियमित व्यायाम करावा.

- धूम्रपान पूर्ण वर्ज्य करा, मद्यपानावर नियंत्रण ठेवा.

- आपले अतिरिक्त वजन घटवा. या सकारात्मक बदलांमुळे आपण उच्च रक्तदाबाचे नियंत्रण करु शकतो. पर्यायाने डोळ्यावर होणारे परिणाम टाळू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT