पोटातील कृमींबाबत दुर्लक्ष नको  pudhari photo
आरोग्य

पोटात जंत होण्याची कारणे काय? जाणून घ्या उपाय

पुढारी वृत्तसेवा
डॉ. किरण जोशी

मानवी शरीरात परजीवीच्या रूपात वेगवेगळ्या प्रकारचे जंत किंवा कृमी राहत असतात. वाढीच्या वेगवेगळ्या चक्रासाठी ते मानवी शरीराचा पोषणासाठी वापर करतात. त्याचा आरोग्यावर अपायकारक परिणाम होतो.

पोटात जंत झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसू लागतात. लहान मुलांनाच हा त्रास होतो, असे बरेच जण समजात. परंतु, मोठ्या माणसांमध्येदेखील हा त्रास बर्‍याच प्रमाणात दिसून येतो. अत्यंत चिवट आणि बरे होण्यासाठी खूप जास्त कालावधी घेणारा हा त्रास आहे. प्रामुख्याने अस्वच्छतेमुळे हा त्रास दिसून येतो. कृमींच्या जीवनचक्रातील वेगवेगळ्या अवस्थांना ठरावीक कालावधीनंतर रोखणे, हाच यावरील उपचारपद्धतीचा प्रमुख गाभा आहे.

हा त्रास होण्याचे आणखी एक कारण म्हणजे आहाराचे पचन योग्य प्रकारे न होणे. पचन योग्य न झाल्यामुळे पचनसंस्थेत मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. या उष्णतेमुळे अन्न पचण्यास आणखी त्रास होतो आणि पोट साफ होत नाही. अशा वेळी शरीरात राहिलेले टाकाऊ अन्न हे आंबण्याच्या अवस्थेत जाते आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कृमी निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण होते.

कृमींचे प्रमुख दोन प्रकार सांगितले जातात. एक आहे सहज कृमी म्हणजे नॉन पॅथोजनीक बॅक्टेरिया. हे कृमी शरीरात निरनिराळ्या क्रिया घडवून आणण्यासाठी सहायक म्हणून काम करतात. पण, पॅथोजनीक बॅक्टेरिया हे शरीरात विविध प्रकारच्या त्रासांची लक्षणे निर्माण करत असतात. पॅथोजनीक कृमींचेदेखील काही प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात उवा, लिखा, यासारख्या शरीराबाहेर असणार्‍या कृमींचा उल्लेख करता येईल. यांच्यामुळे त्वचेवर खाज सुटते.

दुसर्‍या प्रकारचे कृमी हे शरीरात असणारे जंत होत. शरीरात असणार्‍या जंतांमध्ये देखील वेगवेगळे प्रकार आहेत. यामध्ये काही जंत हे रक्तात तयार होतात, काही कफामुळे तयार होतात आणि काही विष्ठेमध्ये तयार होतात.

शरीरामध्ये जे कृमी तयार होतात त्याची कारणे वेगवेगळी आहेत. अनेकदा व्यक्ती पोट बिघडले असताना किंवा अपचन झालेले असतानादेखील जेवतात. काही जण आंबट, गोड यासारखे पदार्थ किंवा पेय खूप जास्त प्रमाणात सेवन करतात. बेसन, उडीद, यासारखे पीठ किंवा गुळापासून तयार केलेले गोड पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करणे, व्यायाम न करणे, दिवसा झोपणे, दूध-फळे, दूध आणि खारट पदार्थ असे गुणधर्माने विरुद्ध असणारे पदार्थ एकत्र करून खाणे, शिळे, नासलेले पदार्थ खाणे, भाज्या स्वच्छ न धुता खाणे यासारख्या वेगवेगळ्या कारणाने कृमी होण्याची शक्यता वाढते.

रक्तात जे कृमी तयार होतात ते अतिशय सूक्ष्म आणि लाल रंगाचे असतात. या कृमींमुळे डोक्याचे केस गळणे, अंगावरचे केस गळणे, पापण्यांचे केस गळणे, नखे वारंवार तुटणे, अंगावर सतत काटा येणे, खाज सुटणे यांसारखी लक्षणे दिसतात. शरीरात कफ वाढल्यास देखील कृमी तयार होतात. हे कृमी वेगवेगळ्या प्रकारचे असतात. खाल्लेले अन्न जेथे साठते तेथे हे तयार होतात.

या प्रकारचे कृमी वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगांचे असतात. काही गोलाकार, काही जाड तर काही चपटे असतात. काही दोर्‍याप्रमाणे बारीक असतात तर काही पांढर्‍या, तांबड्या रंगाचे असतात. या प्रकारच्या जंतांमुळे तोंडाला पाणी सुटते, उलटी येते, तोंडाला चव राहत नाही. अन्नाचे पचन नीट होत नाही. ताप येतो, काही वेळा बेशुद्ध अवस्थादेखील येते. उत्साह वाटत नाही. सतत जांभया किंवा शिंका येतात. पोटात गॅस होतो. अंग आखडल्यासारखे वाटू लागते. वजन कमी होते. ही सर्व लक्षणे कफ वाढल्यामुळे तयार होणार्‍या कृमींमुळे दिसू लागतात.

काही जातींचे पट्टकृमी हे वनस्पतींद्वारे प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करतात. प्राण्यांच्या मासांमध्ये हे कृमी सुप्तावस्थेत राहतात आणि त्याद्वारे माणसांच्या शरीरात प्रवेश करतात. नंतर आपल्या शरीरातील लहान आतड्याच्या आतील भागाला चिकटून बसतात आणि पुढे ते वाढतात.

जंतनाशक औषधांमुळे जुलाब होऊन जंत बाहेर टाकले जातात; पण हा उपचार परिपूर्ण नसतो. कारण यामुळे तेवढ्यापुरते जंत शरीराबाहेर टाकले जातात. जंतांपासून कायमची सुटका होण्यासाठी जंतांच्या बीजनिर्मितीपासून ते पुन्हा मोठे जंत तयार होईपर्यंच्या वेगवेगळ्या अवस्थांमधील चक्र मोडावे लागते.

कारण असलेले जंत पडून गेले तरीही त्याचे बीज आतड्यात असते आणि पोटात पुन्हा त्यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाले, तर त्यांच्यापासून पुन्हा जंत तयार होतात. यासाठी तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार ठरावीक काळानंतर ठरावीक औषधांचा पूर्ण कोर्स करावा लागतो. त्यामुळे जंतांचे चक्र मध्ये तोडले जाते आणि जंत पुन्हा निर्माण होण्याची क्रिया थांबवली जाते. त्यामुळे जंताचे औषध एकदाच घेऊन उपयोग नसतो, तर ते काही काळासाठी नियमितपणे घ्यावे लागते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT