Sleep apnea stroke risk | स्लीप अ‍ॅपनिया आणि स्ट्रोकचा वाढता धोका 
आरोग्य

Sleep apnea stroke risk | स्लीप अ‍ॅपनिया आणि स्ट्रोकचा वाढता धोका

पुढारी वृत्तसेवा

डॉ. महेश बरामदे

भारतामध्ये स्ट्रोकसारख्या जीवघेण्या आजारांची वाढती संख्या ही आता केवळ आरोग्य यंत्रणेची समस्या राहिलेली नाही, तर ती संपूर्ण समाजासाठी एक मोठा इशारा ठरू लागली आहे.

जागतिक आरोग्य संशोधनानुसार, 1990 च्या दशकातील भारतातील स्ट्रोकच्या घटना आणि आजची आकडेवारी यांचा विचार केला, तर ही वाढ धक्कादायक आहे. दोन दशकांत स्ट्रोक रुग्णसंख्या जवळपास दुप्पट झाली आहे आणि हे संकट ज्या वेगाने वाढते आहे, त्याचा थेट संबंध आधुनिक जीवनशैली, तणाव, प्रदूषण आणि स्लीप अ‍ॅपनियासारख्या दुर्लक्षित विकारांशी जोडला गेला आहे.

स्लीप अ‍ॅपनिया हा विकार किती गंभीर आहे याची जाणीव अजूनही समाजाला झालेली नाही. झोपेत वारंवार श्वास थांबणे, प्रचंड घोरणे, दिवसभर थकवा, झोपताना अचानक थाप लागणे या लक्षणांकडे बहुतांश लोक दुर्लक्ष करतात. परंतु ही साधी वाटणारी लक्षणे शरीराच्या अंतर्गत यंत्रणेची झिज करतात आणि त्याचा सर्वात भीषण परिणाम म्हणजे वाढलेला स्ट्रोकचा धोका. वारंवार श्वास थांबल्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी झपाट्याने खाली जाते. मेंदू हा अत्यंत संवेदनशील अवयव असल्याने अशा ऑक्सिजन-अभावाच्या आघातांमुळे मेंदूतील रक्तवाहिन्यांवर ताण निर्माण होतो. त्या कमकुवत बनतात आणि दीर्घकाळानंतर अडथळा किंवा रक्तस्रावाची शक्यता वाढते. हा ‘मूक शत्रू’ अनेकांना कळत नकळत स्ट्रोककडे ढकलतो.

झोपेत श्वास थांबल्यावर शरीरातील स्ट्रेस-हॉर्मोन्स अचानक वाढतात. यामुळे रक्तदाब रात्रभर वर-खाली होत राहतो. कालांतराने हा चढउतार कायमस्वरूपी उच्च रक्तदाबात रूपांतरित होतो आणि उच्च रक्तदाब हा स्ट्रोकचा सर्वात मोठा आणि सर्वात धोकादायक कारणकारक घटक आहे. आज भारतात हायपरटेन्शन झपाट्याने वाढत असल्याचे लक्षात घेतल्यास स्लीप अ‍ॅपनियाचे दुष्परिणाम किती व्यापक असू शकतात, हे सहज समजते.

या परिस्थितीचे आणखी एक गंभीर रूप म्हणजे हृदयातील अनियमित ठोके. स्लीप अ‍ॅपनियामुळे ‘अ‍ॅट्रियल फिब्रिलेशन’सारखे विकार वाढतात. हृदयात तयार होणार्‍या सूक्ष्म रक्तगुठळ्या मेंदूकडे जाऊन रक्तपुरवठा बंद करू शकतात आणि हा अटळ परिणाम म्हणजे ‘इस्केमिक स्ट्रोक’. अनेक अभ्यासांत असे दिसून येते की, स्लीप अ‍ॅपनिया आणि हृदयाच्या अनियमित लयी या दोन्ही समस्या एकत्र आल्यास स्ट्रोकचा धोका अनेक पटींनी वाढतो. ज्यांना आधी स्ट्रोक झाला आहे, अशा रुग्णांमध्ये हा विकार निदान न झाल्यास पुन्हा स्ट्रोक होण्याचा धोका वाढतो आणि पुनर्वसनाची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे स्लीप अ‍ॅपनियाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःच्या आरोग्यावर दीर्घकालीन अन्याय करणे होय.

आज देशात स्ट्रोकचे प्रमाण धोकादायकरीत्या वाढले आहे, परंतु त्यामागील काही कारणे ओळखणे आणि दुरुस्त करणे हे समाजाच्या हातात आहे. स्लीप अ‍ॅपनिया केवळ घोरण्याचा किंवा झोपेचा प्रश्न नाही; तो हळूहळू शरीराची संपूर्ण प्रणाली हादरवणारा एक गंभीर आरोग्यविषयक विकार आहे. या विकारावर वेळेवर उपचार केले गेले, तर स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. त्यामुळे श्वास थांबण्याच्या या शांत, नकळत चालणार्‍या धोक्याकडे त्वरेने लक्ष देणे, हीच खरी आरोग्य-जाणीव आणि आजच्या काळाची तातडीची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT