डॉ. मनोज कुंभार
धूम्रपानामुळे शरीराचे जेवढे नुकसान होते, तेवढेच नुकसान तासन्तास एकाच जागी बसून राहिल्याने शरीराच्या अंतर्गत संस्थेचे होते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
आजकाल बहुतांश नोकर्या या संगणकासमोर बसून करण्याच्या म्हणजेच बैठ्या स्वरूपाच्या झाल्या आहेत. ऑफिसमध्ये 8 ते 9 तास सतत खुर्चीवर बसून काम करणार्यांना वाटते की, आपण सकाळी एक तास जिममध्ये जाऊन आल्याने किंवा व्यायाम केल्यामुळे आपल्याला आरोग्याविषयी चिंतेचे कसलेच कारण नाही. परंतु, आधुनिक वैद्यकीय विज्ञानाने या गंभीर समस्येला ‘सिटिंग इज द न्यू स्मोकिंग’ (सलग बसणे म्हणजे धूम्रपानाइतकेच घातक) असे संबोधले आहे. विविध आंतरराष्ट्रीय आरोग्य संशोधनानुसार, तुम्ही दिवसातून सलग 7 ते 8 तास एकाच जागी खुर्चीला खिळून राहत असाल, तर ते शरीरासाठी दिवसाला 10 ते 15 सिगारेट ओढण्याइतकेच जीवघेणे ठरते. धूम्रपानामुळे शरीराचे जेवढे नुकसान होते, तेवढेच नुकसान तासन्तास एकाच जागी बसून राहिल्याने शरीराच्या अंतर्गत संस्थेचे होते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
सतत बसून राहिल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया कमालीची मंदावते. पायांच्या आणि नितंबांच्या मोठ्या स्नायूंची हालचाल पूर्णपणे थांबते. हे स्नायू निष्क्रिय झाल्यामुळे शरीरातील चरबी जळण्याचे (कॅलरीज बर्न होण्याचे) प्रमाण अत्यंत कमी होते. परिणामी, रक्तामध्ये वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू लागते, शरीराची इन्सुलिन संवेदनशीलता बिघडते, हृदयाच्या रक्तवाहिन्या कडक होतात आणि पर्यायाने हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात (स्ट्रोक) येण्याचा धोका कैक पटीने वाढतो.
अनेक कर्मचार्यांचा असा गैरसमज असतो की, सकाळी जिममध्ये घाम गाळल्यामुळे दिवसभर बसण्याचा शरीरावर काही परिणाम होत नाही. परंतु, विज्ञान सांगते की, सकाळी केलेला केवळ एक तासाचा व्यायाम दिवसभराच्या आठ ते नऊ तासांच्या सलग बैठ्या स्थितीचे दुष्परिणाम पूर्णपणे नष्ट करू शकत नाही. या स्थितीला वैद्यकीय भाषेत ‘अॅक्टिव्ह सिडेंटरी’ म्हणजेच ’व्यायाम करूनही निष्क्रिय राहणे’ असे म्हटले जाते.
या जीवघेण्या समस्येवर अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय उपलब्ध आहे. यासाठी दर 45 मिनिटांनी किंवा जास्तीत जास्त एका तासाने आपल्या खुर्चीवरून उठणे अनिवार्य आहे. खुर्चीवरून उठून कार्यालयातच किमान दोन मिनिटे हलके चालणे, पायांच्या पिंडार्यांचे स्नायू ताणणे किंवा जागेवरच उभे राहून पावले वर-खाली करणे अत्यंत आवश्यक आहे. या छोट्याशा बदलामुळे शरीरातील रक्ताभिसरण संस्था पुन्हा गतिमान होते आणि रक्तातील साखरेचे नियंत्रण योग्य प्रकारे राहण्यास मदत होते.