मंजिरी फडके, आहारतज्ज्ञ
दिवसभरात अचानक चॉकलेट, गोड पदार्थ, चिप्स किंवा पेस्ट्री खावीशी वाटते का? अनेकजण ही इच्छा पूर्ण करण्यासाठी लगेच अशा पदार्थांकडे वळतात; मात्र प्रत्येक क्रेव्हिंगमागे केवळ चवीची इच्छा नसते. काही वेळा शरीराला पोषक घटकांची गरज असल्याचा तो संकेतही असू शकतो.
क्रेव्हिंगची विविध कारणे ही प्रत्येक व्यक्तीला तंतोतंत लागू पडतात, असे नाही, तरीही वारंवार होणार्या क्रेव्हिंगकडे लक्ष देणे आणि त्यामागील संभाव्य कारण समजून घेणे फायदेशीर ठरू शकते. वारंवार चॉकलेट खावेसे वाटत असेल, तर शरीराला मॅग्नेशियमची गरज असू शकते. मॅग्नेशियम स्नायूंचे कार्य, मज्जासंस्था आणि ऊर्जानिर्मितीसाठी महत्त्वाचे खनिज आहे. काजू, भोपळ्याच्या बिया, पालक, आणि विविध कडधान्यांचे सेवन करून मॅग्नेशियमची कमतरता भरून काढता येते. चॉकलेटमध्ये काही प्रमाणात मॅग्नेशियम असले, तरी त्यात साखर आणि चरबीचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे त्याऐवजी नैसर्गिक स्रोतांमधून मॅग्नेशियम मिळवणे अधिक हितावह ठरते.
चिप्स किंवा खारट पदार्थांची इच्छा का होते?
चिप्स, नमकीन किंवा इतर खारट पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होत असल्यास शरीराला इलेक्ट्रोलाइट्सची गरज असण्याची शक्यता असते. विशेषतः उष्ण हवामान, जास्त घाम येणे किंवा शारीरिक श्रमानंतर ही गरज वाढू शकते. इलेक्ट्रोलाइट्ससाठी योग्य पर्यायांमध्ये ताक, नारळपाणी, भाजलेले मखाणे, लिंबूपाणी यांचा समावेश होतो.
ब्रेड, पेस्ट्री किंवा इतर रिफाईंड कार्बोहायड्रेट्स खावेसे वाटत असल्यास शरीराला त्वरित ऊर्जेची गरज असल्याचा संकेत असू शकतो; मात्र रिफाईंड कार्ब्सऐवजी संमिश्र (कॉम्प्लेक्स) कार्बोहायड्रेट्स निवडल्यास ऊर्जा हळूहळू मिळते आणि पोट अधिक काळ भरलेले राहते. यासाठी हंगामी फळे, रताळे, तांदूळ, ओट्स यांचे सेवन करावे.
अपुरी झोप, ताणतणाव, हार्मोन्समधील बदल, सवयी किंवा भावनिक कारणांमुळेही क्रेव्हिंग निर्माण होऊ शकते. त्यामुळे सतत क्रेव्हिंग होत असल्यास संतुलित आहार, पुरेसे पाणी, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
गोड पदार्थांची क्रेव्हिंग म्हणजे काय?
सतत मिठाई, केक किंवा इतर गोड पदार्थ खावेसे वाटत असल्यास, काही वेळा शरीराला प्रथिनांची (प्रोटीन) गरज असू शकते. प्रथिने पोट अधिक वेळ भरलेले ठेवण्यास मदत करतात आणि रक्तातील साखरेतील चढ-उतार कमी करण्यास हातभार लावतात. दही, भाजलेले हरभरे, अंडी, प्रोटीन शेक (गरजेनुसार) हे प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत.