Egg nutrition benefits | उन्हाळ्यात अंडी खावीत का? 
आरोग्य

Egg nutrition benefits | उन्हाळ्यात अंडी खावीत का?

पुढारी वृत्तसेवा

नीलिमा महाजन

प्रथिनांचा उत्तम स्रोत मानली जाणारी अंडी अनेकांच्या रोजच्या आहाराचा भाग असतात. मात्र, तापमान वाढू लागल्यावर अनेकांना प्रश्न पडतो की, अंडी खाणे सुरक्षित आहे का आणि त्यामुळे शरीरावर काही विपरीत परिणाम होतात का?

वास्तविक, अंडी शरीरात उष्णता निर्माण करतात हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. अंडी ही उच्च प्रतीची प्रथिने, व्हिटॅमिन बी-12, व्हिटॅमिन डी आणि लोह यांसारख्या पोषक घटकांनी समृद्ध असतात. एका अंड्यात साधारण सहा ते सात ग्रॅम उच्च दर्जाचे प्रथिन असते आणि शरीराला आवश्यक असलेले सर्व महत्त्वाचे अमिनो अ‍ॅसिड त्यातून मिळतात. त्यामुळे अंडी हे स्वस्त, सहज उपलब्ध आणि पौष्टिक अन्न मानले जाते.

उष्णतेचा विचार करता, समस्या अंड्यात नसून ती अंड्यांच्या साठवणुकीत आणि हाताळणीमध्ये असते. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने अंडी योग्य पद्धतीने साठवली गेली नाहीत, तर त्यामध्ये जीवाणू वाढण्याचा धोका वाढतो. विशेषतः साल्मोनेला संसर्गामुळे अन्नविषबाधा होऊ शकते. दूषित किंवा अर्धवट शिजवलेली अंडी खाल्ल्यास जुलाब, पोटदुखी, उलट्या आणि पोटात मुरडा येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

उन्हाळ्यात किती अंडी खावीत, हा प्रश्नही अनेकांना पडतो. दिवसातून एक ते दोन अंडी खाणे सामान्यतः सुरक्षित मानले जाते. मात्र, प्रत्येकाची प्रकृती वेगळी असल्याने काहींना अंडी खाल्ल्यानंतर जडपणा किंवा उष्णतेची भावना जाणवू शकते. अशा वेळी प्रमाण नियंत्रित ठेवणे योग्य ठरते.

उन्हाळ्यात कच्ची किंवा अर्धवट शिजवलेली अंडी टाळावीत, कारण उष्ण हवामानात जीवाणू वेगाने वाढतात. अंडी नेहमी फ्रिजमध्ये ठेवावीत. बराच वेळ बाहेर ठेवू नयेत. तेलकट आणि मसालेदार पदार्थांऐवजी उकडलेली, अंडी अधिक श्रेयस्कर. याशिवाय अंड्यांसोबत सॅलड, भाज्या आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्ल्यास शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. योग्य प्रकारे साठवणूक आणि स्वच्छतेची काळजी घेतली, तर अंडी उन्हाळ्यातही सुरक्षित आणि फायदेशीर आहाराचा भाग ठरू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT