Drinking water 
आरोग्य

Drinking water: कारमध्ये बऱ्याच दिवसांपासून राहिलेल्या बॉटलमधील पाणी प्यावं का?

या बॉटमध्ये नेमकी काय रासायनिक प्रक्रिया होते? याविषयी आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात, जाणून घेऊया याविषयी

पुढारी वृत्तसेवा

तुमच्या गाडीत एक प्लास्टिकची पाण्याची बॉटल काही दिवसांपासून असेल, तर त्यातलं पाणी पिणे सुरक्षित आहे का? असा प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडलाच असेल. तुम्ही विचार केला असेल आणि काहीवेळा तसेच पिलेदेखील असेल. परंतु खरंच असं जास्त दिवसाचे पाणी पिणे शरीरासाठी योग्य असू शकतो का?

कारमधील गरम हवा आणि अतिनील किरणे (UV rays) यांमुळे प्लास्टिकच्या बॉटलमधील पाण्यावर परिणाम होऊ शकतो, खासकरून जेव्हा ती गाडीत ठेवली जाते. खिडक्यांमुळे गाडीत जास्त उष्णता अडकून राहते.

काय होतं

शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्च तापमानामुळे आणि अतिनील किरणांमुळे (UV rays) प्लास्टिकमधील काही रसायने आणि मायक्रोप्लास्टिक (सूक्ष्म कण) पाण्यात मिसळू शकतात. तसेच, बॉटलमध्ये जिवाणू (Bacteria) किंवा बुरशी (Mold) वाढू शकते. हे पाणी पिणे असुरक्षित का? याविषयी काही तज्ज्ञांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे; जाणून घेऊया त्याविषयी

बऱ्याच दिवसाच्या बॉटलमधील पाणी प्यावे का? तज्ज्ञ काय म्हणतात?

  • पाण्यातील सूक्ष्मजंतू (Microbes)

तुम्ही एकदा बॉटल उघडल्यानंतर आणि त्यातून पाणी प्यायल्यानंतर, तुमच्या तोंडातून, हातातून किंवा हवेतून जिवाणू बाटलीत जाऊ शकतात, आणि त्यांची संख्या वाढू शकते. असे युनिव्हर्सिटी ऑफ रोड आयलंडमधील न्यूरोसायंटिस्ट जेमी रॉस यांनी सांगितले. कोलंबिया युनिव्हर्सिटीमधील जिओकेमिस्ट बीझान यांनी सांगितले की, गरम गाडीत ठेवलेल्या पाण्याच्या बॉटलमध्ये नेमके काय होते?, याबद्दल कोणताही ठोस अभ्यास उपलब्ध नाही. परंतु, उपलब्ध माहितीवरून काही निष्कर्ष काढता येत असल्याचेही ते म्हणाले.

२०१३ मध्ये झालेल्या एका अभ्यासात, संशोधकांनी ७७ अंश फॅरनहाइट (७७°F) तापमानात दोन आठवड्यांसाठी ठेवलेल्या प्लास्टिकच्या बॉटलमधील शीतपेये, चहा, रस आणि पाणी यांचे विश्लेषण केले. त्यांना अनेक बाटल्यांमध्ये जिवाणू, बुरशी आणि यीस्ट वाढलेले आढळले.

गाडीच्या आतले तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा जास्त होते, ज्यामुळे सूक्ष्मजंतूंना लवकर वाढण्यासाठी योग्य वातावरण मिळते. डॉ. रॉस यांच्या मते, काही तासांतच हे होऊ शकते. २००५ च्या आणखी एका अभ्यासानुसार,बॉटलमधून फक्त एक घोट पाणी प्यायल्यानंतर ४८ तासांतच रूम टेंपरेचरमध्येही जिवाणू वाढतात. डॉ. रॉस यांच्या म्हणण्यानुसार, बॉटलमध्ये वाढणारे जिवाणू आजारांना कारणीभूत ठरतात की नाही? हे नक्की सांगता येत नाही, पण ते आजार निर्माण करू शकतात हे नक्की. २००५ च्या अभ्यासात आढळलेल्या जिवाणूंमध्ये ‘स्टेफिलोकोकस ऑरियस’ (Staphylococcus aureus) नावाचा जिवाणू होता, जो अन्नविषबाधेला (Food-borne illness) कारणीभूत असतो.

रासायनिक घटक (Chemical Contaminants)

येल स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील पर्यावरण एपिडिमिओलॉजिस्ट निकोल डिझील यांच्या माहितीनुसार, बहुतेक सिंगल-यूज प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या ‘पॉलीथिलीन टेरेफ्थालेट’ (PET) नावाच्या प्लास्टिकपासून बनलेल्या असतात. जेव्हा PET-युक्त बाटल्या उष्णतेत किंवा सूर्यप्रकाशात ठेवल्या जातात, तेव्हा त्यातून बिस्फेनॉल ए (BPA) आणि थॅलेट्स (phthalates) सारखी रसायने बाहेर पडू शकतात. ही रसायने शरीरातील हार्मोन्सवर परिणाम करतात. डॉ. डिझील यांनी सोशल मीडियावर पसरणाऱ्या त्या दाव्याला चुकीचे ठरवले, ज्यात गरम प्लास्टिकच्या बॉटलमधून कर्करोगजनक ‘डायॉक्सिन्स’ (dioxins) बाहेर पडतात, असे म्हटले होते.

मायक्रोप्लास्टिक (Microplastics)

प्लास्टिकच्या बॉटलमधील पाण्यात अनेकदा प्लास्टिकचे लहान कण, ज्यांना मायक्रोप्लास्टिक म्हणतात, ते आढळतात. २०१८ च्या एका अभ्यासात, नऊ देशांमधून खरेदी केलेल्या प्लास्टिकच्या बॉटलमधील पाण्याचे विश्लेषण केले असता, ९३% बॉटलमध्ये प्लास्टिकचे कण आढळले. डॉ. यान यांच्या मते, गाडीतील उष्णता आणि अतिनील प्रकाशामुळे (UV rays) हे कण पाण्यात मिसळण्याची प्रक्रिया वेगवान होते. मायक्रोप्लास्टिकचे शरीरावर नेमके काय परिणाम होतात, हे अजून स्पष्ट झालेले नाही. पण ते शरीरात जमा होतात, हे निश्चित आहे. २०२५ मधील एका अभ्यासात, नुकत्याच मृत झालेल्या व्यक्तींच्या ऊतींचे (Tissues) विश्लेषण केले असता, त्यांच्या मूत्रपिंड (Kidney), यकृत (Liver) आणि मेंदूमध्ये मायक्रोप्लास्टिक जमा झाल्याचे आढळले.

सुरक्षितपणे पाणी कसे प्यावे, उपाय काय?

  • एका सिंगल-यूज प्लास्टिकच्या बाटलीतले पाणी गरम गाडीत ठेवल्यानंतर पिणे किती सुरक्षित आहे, हे तज्ज्ञांना निश्चितपणे सांगता येत नाही. पण संभाव्य धोके पाहता, असे करणे शरीरसाठी योग्य नाही.

  • संशोधकांनी प्रवासात प्लास्टिकऐवजी स्टेनलेस स्टील किंवा काचेच्या बाटल्या वापरण्याचा सल्ला दिला आहे.

  • पुन्हा वापरता येणाऱ्या कठीण प्लास्टिकच्या बाटल्या उष्णता आणि सूर्यप्रकाशात कमी प्रमाणात खराब होतात, पण तरीही त्या प्लास्टिकच असल्यामुळे कालांतराने त्यांचेही विघटन होऊ शकते.

  • जिवाणू आणि बुरशी टाळण्यासाठी, एकदा उघडलेले आणि उष्णतेत राहिलेले पाणी फेकून देणे योग्य आहे. तुम्ही अनिश्चित असाल, तर ते पाणी पिऊ नका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT