आरोग्य

Dyspnea Symptoms Warning | पायऱ्या चढताना धाप लागतेय? सावधान! 'डिस्पनिया' असू शकतो गंभीर आजाराचा संकेत

पुढारी वृत्तसेवा

डॉ. प्राजक्ता पाटील

पायर्‍या चढल्यानंतर किंवा वेगाने चालल्यानंतर धाप लागणे हा एक सामान्य अनुभव आहे. मात्र, जेव्हा ही समस्या वारंवार किंवा विनाकारण जाणवू लागते, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते.

वैद्यकीय भाषेत धाप लागणे या त्रासाला ‘डिस्पनिया’ असे म्हणतात. ही समस्या केवळ फुफ्फुसांशी संबंधित नसून हृदयविकार, रक्ताल्पता किंवा मानसिक तणावाचे लक्षणही असू शकते.

मानसिक तणाव आणि ‘पॅनिक अटॅक’मुळे श्वास फुलू शकतो. एखादी व्यक्ती प्रचंड तणाव, भीती किंवा घबराट अनुभवते, तेव्हा शरीरातील श्वास घेण्याची गती अचानक बदलते. पॅनिक अटॅक दरम्यान हृदयाचे ठोके वेगाने वाढतात आणि व्यक्तीला श्वास गुदमरल्यासारखे वाटते. ही स्थिती पूर्णपणे मानसिक आरोग्याशी संबंधित असली, तरी त्याचे शारीरिक परिणाम अत्यंत तीव्र असतात. काही आरोग्य अभ्यासानुसार, धाप लागण्याची तक्रार महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत अधिक दिसून येते. हार्मोनल बदल, चिंता आणि तणाव घेण्याची अधिक प्रवृत्ती यामुळे महिलांना हा त्रास जास्त जाणवू शकतो. तसेच, गर्भधारणेदरम्यान शरीराला ऑक्सिजनची गरज वाढते आणि गर्भाशयाचा दाब फुफ्फुसांवर पडतो, ज्यामुळे श्वास घेण्यास जडपणा जाणवतो. शरीरातील रक्ताचे कमी प्रमाण हे देखील महिलांमधील धाप लागण्याचे एक मुख्य कारण आहे.

पुरुषांमध्ये ही समस्या अनेकदा जीवनशैलीशी संबंधित असते. दीर्घकाळ धूम्रपान केल्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. यामुळे ‘सीओपीडी’ किंवा फुफ्फुसांच्या संसर्गाचा धोका वाढतो. पुरुषांमध्ये शारीरिक श्रमामुळे किंवा हृदयविकारामुळे धाप लागण्याचे प्रमाण अधिक असू शकते. हृदयाचे स्नायू कमकुवत झाल्यास किंवा रक्त पंप करण्याची क्षमता कमी झाल्यास शरीरातील ऊतींपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नाही. अशा वेळी फुफ्फुसांमध्ये द्रव जमा होऊ लागतो आणि श्वास घेताना जडपणा जाणवतो. हा त्रास अनेक आठवड्यांपासून टिकून असेल किंवा त्यासोबत छातीत दुखणे, चक्कर येणे आणि प्रचंड थकवा जाणवत असेल, तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT