डॉ. अनिल न. मडके
फेब्रुवारी-मार्चमध्ये येणार्या फाल्गुन महिन्यात झाडांना नवीन पालवी फुटते. नवीन फुले येतात. निसर्ग खुलतो, फुलतो. वसंत ऋतूच्या आगमनाचा, नवचैतन्याचा हा काळ; पण काही रुग्णांसाठी, विशेषत: दम्याच्या रुग्णांसाठी हा काळ ‘काळ’ बनून येऊ शकतो. दमा, अॅलर्जी किंवा दीर्घकालीन श्वसनविकार, डोळ्यांचा त्रास, डर्म्याटायटीस असलेल्या रुग्णांनी अशाप्रसंगी विशेष काळजी घ्यायला हवी.
होळी झाली. धुळवड झाली. रंग पंचमी देखील झाली. फाल्गुन या मराठी वर्षाच्या शेवटच्या महिन्यातले हे तीन महत्त्वाचे उत्साहाने आणि जल्लोषाने भरलेले सण. सामान्यतः फेब्रुवारी-मार्चमध्ये येणार्या या फाल्गुन महिन्यात झाडांना नवीन पालवी फुटते. नवीन फुले येतात. निसर्ग खुलतो, फुलतो. सृष्टी नवचैतन्याने भरून जाते. वसंत ऋतूच्या आगमनाचा हा काळ. पण, काही रुग्णांसाठी विशेषत: दम्याच्या रुग्णांसाठी हा काळ बनू शकतो. म्हणून वेळीच जागे होण्याची - सजग होऊन काळजी घेण्याची गरज असते. ते केले तर या सृष्टीचा आनंद घेत, तुमच्यातही उल्हास संचारतो.
होळी- धुळवड - रंगपंचमीच्या आनंदाच्या सणात, एकमेकांवर रंग उधळण्याची आणि एकमेकांना लावण्याची आपल्याकडे प्रथा आहे. ती सर्वांना आवडतेदेखील. पण आज-काल या रंगांमध्ये विषारी घटक किंवा कृत्रिम हानिकारक रंग मिसळलेले असतात. त्यामुळे रंग उडविताना यातील काही घटक नाकावाटे- तोंडावाटे शरीरात गेले, तर धोका उद्भवू शकतो. काही वेळा डोळ्यांत किंवा कानांतही असे रंग जातात. दमा अॅलर्जी किंवा दीर्घकालीन श्वसनविकार, डोळ्यांचा त्रास , डर्म्याटायटीस असलेल्या रुग्णांनी अशाप्रसंगी विशेष काळजी घ्यायला हवी; अन्यथा एखादा विषारी घटक मोठे संकट निर्माण करू शकतो.
या काळात जेव्हा होळी पेटविली जाते तेव्हा, त्यातून भरपूर धूर आणि काही हानिकारक कण हवेत पसरतात. कारण, होळी पेटवताना त्यामध्ये आजकाल बर्याच विषारी घटकांचा त्यात समावेश असू शकतो. असा दूर जेव्हा फुफ्फुसात जातो, तेव्हा श्वासनलिकांना आणि वायुकोशांना हानी पोहोचू शकते. दमा, सीओपीडी आय.एल.डी. असे दीर्घकालीन विकार असलेल्या रुग्णांना श्वासाचा अटॅक येऊ शकतो. याच काळात फुफ्फुसांमध्ये जंतुसंसर्ग होण्याची शक्यताही अनेक पटीने वाढते. खरे तर दम्याच्या रुग्णांनी किंवा दीर्घकालीन श्वसनविकार असलेल्या रुग्णांनी अशावेळी बाहेर न पडणे इष्ट; अन्यथा अशावेळी नाकावर एन-95 मास्क घालणे हे जास्त शहाणपणाचे ठरते. जर घराबाहेर भरपूर विषारी धूर असेल, तर तो घरात येऊन त्रासदायक ठरू शकतो.
गेल्या दोन-तीन दिवसांत हवामानात बदल होत आहे आणि असे बदललेले वातावरण दम्याच्या अटॅकला जणू आमंत्रण देत असते. रंगपंचमी, रंगांची उधळण, बराच काळ रंग उडवलेल्या वातावरणात राहणे, नाकातून खूप कण फुफ्फुसांत जाणे... अशा गोष्टी जर आधीपासून दम्याचा त्रास असलेल्या रुग्णाच्या बाबतीत घडल्या , तर दम्याच्या अटॅक टाळणे अशक्य होते. जेव्हा दम्याचा अटॅक येतो तेव्हा, रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. हळूहळू हा त्रास वाढतो. छातीतून घरघर आवाज येऊ लागतो. खोकला येतो. खोकल्यातून कफ पडू लागतो. छातीवर दडपण आल्यासारखे वाटते. जंतुसंसर्ग झाला तर, कफ घट्ट होतो . कफ बाहेर टाकायला त्रास होतो. रुग्णाची अस्वस्थता वाढते. पुरेसा प्राणवायू हवेत असूनदेखील, तो पेशींपर्यंत पोहोचत नाही. आजकाल वाढलेल्या वायू प्रदूषणामुळे, हा त्रास आणखी बळावतो. सौम्य अटॅकचे रूपांतर तीव्र अटॅकमध्ये होऊ शकते. अशा रुग्णाला तातडीने श्वासनलिका रुंद होण्याची औषधे द्यावी लागतात.
मोकळी स्वच्छ हवा महत्त्वाची. बाहेर प्रदूषण असेल, तर त्या काळापुरते दारे खिडक्या बंद करणे महत्त्वाचे; पण वायुवीजन ही मूळ आवश्यक बाब दुर्लक्षित करू नये. ‘एअर प्युरिफायर’ असेल तर सर्वात उत्तम. जर श्वासनलिका रुंद करणारी औषधे घेऊन रुग्णाला आराम वाटत नसेल, तर पुढची उपचार पद्धती अंमलात आणावी लागते. अनेक रुग्णांची ऑक्सिजनची पातळी कमी होते, तेव्हा त्यांना ऑक्सिजन द्यावा लागतो. अशा वेळी रुग्णालयात अॅडमिट करण्यावाचून पर्याय नसतो. रुग्णाला एन.आय.व्ही. नावाचा कृत्रिम श्वास (तोंडातून नळी न घालता) द्यावा लागतो.
दम्याचा अटॅक आल्यानंतर जर रुग्ण वेगाने अस्वस्थ होत असेल किंवा विचित्र वर्तणूक करत असेल मानसिक रुग्ण असल्यासारखा वागत असेल किंवा त्याला गुंगी येत असेल, तर ही सर्व धोक्याची लक्षणे असतात. रक्तातील कार्बन-डाय-ऑक्साईडचे प्रमाण वाढल्याची ही लक्षणे असू शकतात. त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. अनेकदा या बाबींकडे दुर्लक्ष केल्यामुळे रुग्णाला हॉस्पिटलमध्ये न्यायला उशीर केल्यास ते जीवाशी येऊ शकते. म्हणून तातडीने उपचार करणे महत्त्वाचे असते. दम्याच्या रुग्णांनी जर आधीपासूनच काळजी घेतली, तर या सर्व गोष्टी संपूर्णपणे टाळता येतात; अन्यथा रुग्णालयात दाखल होणे - औषधोपचार घेणे - आर्थिक भार सोसणे या सगळ्या गोष्टी न टाळता येण्यासारख्या असतात. ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’ हा मंत्र केवळ दमेकर्यांनी नव्हे, तर सर्वांनीच अंमलात आणला तर ते नक्कीच ‘हेल्थ इज वेल्थ’ या न्यायाने फायद्याचेच ठरते.