डॉ. महेश बरामदे
भारतात पावसाळ्यातील दूषित पाणी, उघड्यावर ठेवलेले अन्न आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे दरवर्षी लाखो मुलांना टायफॉईड, पॅराटायफॉईड व डायरिया होतो. यावर उपाय म्हणून आता देशात स्वतःची स्वदेशी साल्मोनेला लस विकसित केली आहे.
साल्मोनेला हा एक सूक्ष्मजीव म्हणजेच जीवाणू आहे. त्याची लांबी सुमारे 0.7 ते 1.5 मायक्रोमीटर इतकी असते. या जीवाणूच्या पृष्ठभागावर असणार्या फ्लॅजेलांच्या साहाय्याने तो हालचाल करू शकतो. साल्मोनेलाचे काही प्रकार, जे सीरोटाइप्स म्हणून ओळखले जातात, ते दूषित अन्न व पाण्यामुळे आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि पचनसंस्था बाधित करतात. विशेषतः फूड पॉयझनिंग, टायफॉईड व पॅराटायफॉईडसारखे आजार उद्भवण्यामध्ये यांचा वाटा मोठा असतो.
भारतात पावसाळ्यातील दूषित पाणी, उघड्यावर ठेवलेले अन्न आणि स्वच्छतेचा अभाव, यामुळे दरवर्षी लाखो मुलांना टायफॉईड, पॅराटायफॉईड व डायरिया होतो. यावर उपाय म्हणून आता देशात स्वतःची स्वदेशी साल्मोनेला लस विकसित केली आहे. ही लस आयसीएमआर (भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद), भारत बायोटेक आणि बायोलॉजिकल ई या संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांतून तयार झाली आहे.
दोन प्रकारच्या स्ट्रेनविरोधात प्रभावी :
जगातील ही पहिली आहे, जी साल्मोनेला टायफी आणि पॅराटायफी या दोन प्रकारच्या स्ट्रेनपासून संरक्षण करते.
या लसीची परिणामकारकता 90 टक्के असल्याचे चाचण्यांमध्ये दिसून आले आहे.
चार अंश सेल्सिअस तापमानावरही स्थिर राहात असल्याने ग्रामीण भागातही सुरक्षितरीत्या साठवता येते.
9 महिने ते 14 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी उपयुक्त
‘युनिसेफ’च्या सहकार्याने ही लस 2026 पर्यंत 10,000 आरोग्य केंद्रांवर उपलब्ध करण्यात येणार आहे.
आधी फक्त खासगी रुग्णालयात 1500 रुपये दराने उपलब्ध असलेली लस आता मोफत दिली जाणार आहे.
पावसाळ्याच्या काळात सांडपाणी, दूषित अन्नपदार्थ, अस्वच्छ हात अशा अनेक कारणांनी या जीवाणूचा संसर्ग पसरू शकतो.
या जीवाणूमुळे आतड्यांमध्ये सूज, तीव्र ताप, मळमळ, उलट्या, अतिसार यांसारखे लक्षणे दिसतात. वेळीच उपचार न मिळाल्यास मुलं आणि वृद्धांसाठी ही स्थिती जीवघेणी ठरू शकते.
आयसीएमआरचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांच्या मते, साल्मोनेला विरोधात विकसित झालेली ही लस स्वस्त, टिकाऊ आणि प्रभावी आहे. यामुळे लाखो गरीब मुलांना सुरक्षाकवच मिळणार आहे.
आपल्या मुलांचे नियमित लसीकरण पूर्ण असल्याची खात्री करून घ्या
आरोग्य केंद्रात उपलब्ध झाल्यानंतर लस वेळेवर घ्या
पावसाळ्यात स्वच्छ आणि ताजे अन्न व पाणी वापरा
मुलांना हात धुण्याची सवय लावा. विशेषतः जेवणाआधी व शौचानंतर.
अन्नपदार्थ उघडे ठेवू नका
साल्मोनेला जीवाणूचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. पण, ही स्वदेशी लस या संसर्गाविरोधातील लढाईमध्ये मोठी ढाल ठरणार आहे.