पूर्वीच्या काळी गुडघे बदलाची शस्त्रक्रिया ही प्रचंड वेदनादायी असल्यामुळे आणि तसेच दीर्घकाळ त्याचे परिणाम जाणवत असल्याने अनेक रुग्ण दुखणार्या गुडघ्यासह आयुष्य व्यतित करायचे, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय उपचारप्रणालींमध्ये क्रांतिकारक बदल झाले आहेत. विशेषतः सध्या जगभरात चर्चेत असणार्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आणि त्याआधारे कार्य करणार्या रोबोटस्मुळे रोगनिदानांपासून अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रिक्रियांमध्ये थक्क करणारे परिणाम दिसत आहेत. भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये कृत्रिम सांधेरोपणामध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया करून घेणार्यांची संख्या वाढत आहे.
बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, सतत लिफ्टचा वापर, दीर्घकाळ नियमित गाडीवर फिरणे, पोषणतत्वरहित आहाराचे दीर्घकाळ सेवन, लठ्ठपणा यांसारख्या अनेक कारणांमुळे अलीकडील काळात सांधेदुखीची समस्या भेडसावणार्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषतः आपल्याकडे महिलांना स्वयंपाकादी कामांसाठी आयुष्यातील अनेक वर्षे दररोज ओट्यापुढे बरेच तास उभे राहावे लागते. तसेच घरातील कष्टाची कामे करावी लागतात. तरुणपणात या सर्वांचे परिणाम जाणवत नाहीत; मात्र शरीर वृद्धत्वाकडे झुकू लागले की सांधेदुखीसारख्या त्रासाच्या रूपातून हे परिणाम दिसू लागतात. सांधेदुखीमध्ये गुडघ्यामध्ये होणार्या वेदना असह्य स्वरुपाच्या असतात. अनेकदा पाय घसरून पडल्यामुळे, अपघातामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे गुडघा फ्रॅक्चर होतो. गुडघा फ्रॅक्चर झाल्यास वा दुखणे वाढल्यास रुग्णाला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार करणे आवश्यक ठरते. काही वेळा गुडघ्यातील सांध्यांची झीज इतकी झालेली असते की तो बदलण्याशिवाय पर्याय नसतो. पूर्वीच्या काळी गुडघेबदलाची शस्त्रक्रिया ही प्रचंड वेदनादायी असल्यामुळे आणि तसेच दीर्घकाळ त्याचे परिणाम जाणवत असल्याने अनेक रुग्ण दुखणार्या गुडघ्यासह आयुष्य व्यतित करायचे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय उपचारप्रणालींमध्ये क्रांतिकारक बदल झाले आहेत. विशेषतः सध्या जगभरात चर्चेत असणार्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आणि त्याआधारे कार्य करणार्या रोबोटस्मुळे रोगनिदानांपासून अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमध्ये थक्क करणारे परिणाम दिसत आहेत. भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये कृत्रिम सांधेरोपणामध्ये रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी करून घेणार्यांची संख्या वाढत आहे.
रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये शरीरावर कमीतकमी आणि अचूकपणाने काप घेतला जातो. यामुळे आसपासच्या ऊतींना कमी नुकसान होते. याशिवाय शरीरावरील चट्टेही कमी दिसतात आणि जखमाही लवकर बर्या होतात. रोबोटिक यंत्रणेच्या वापरामुळे ऑपरेशन आधी कॉम्प्युटरवर त्याची रचना कशी असेल हे दिसून येते. रोबोटिक आर्म सर्जनला सबमिलीमीटर अचूकतेसह नियोजन करण्यास मदत करतो. यामुळे मानवी चुकांचा धोका कमी होतो. या पद्धतीमुळे ऑपरेशन 100 टक्के यशस्वी होण्याची आणि रुग्ण लवकर बरा होण्याची शक्यता वाढलेली आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या अनेक अभ्यासातून आणि व्यक्तिशः मी केलेल्या शस्त्रक्रियांमधून असे दिसून आले आहे की रोबोटिक हँडच्या साहाय्याने केलेल्या गुडघे बदल शस्त्रक्रियेमध्ये रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे कमी दिवस होतात. तसेच वेदनाही कमी होतात. त्यामुळे व्यस्त जीवनशैली असणार्या रुग्णांसाठी तसेच वेदना सहन करण्याची क्षमता कमी असणार्यांसाठी ही शस्त्रक्रिया वरदान ठरत आहे. अशा व्यक्ती अवघ्या काही दिवसांमध्ये कामावर परतू शकतात. काही रुग्णांमध्ये दोन्हीही गुडघ्यांची झीज झालेली असते. अशा वेळी ते एकदमच बदलणे फायदेशीर ठरते. कारण यामुळे जंतूसंसर्गाचा धोका कमी होतो. तसेच शस्त्रक्रियेसाठीचा खर्च तुलनेने कमी होतो.
रोबोटिक नी रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया करताना गुडघेदुखीची तीव्रता आणि ते दुखणे किती जुने आहे, या गोष्टी तपासल्या जातात. कृत्रिम गुडघारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यावर दोन-तीन दिवसांत रुग्ण चालू शकतो. त्याला टप्प्याटप्प्याने फिजिओथेरपीचे व्यायामही सांगितले जातात. या शस्त्रक्रियेनंतर चालणे-फिरणे, वाहन चालवणे, जिने चढणे-उतरणे, मांडी घालून बसणे या हालचाली करताना व्यक्तीला काहीही अडचण येत नाही. दुखण्यामुळे जे रुग्ण चालूही शकत नाहीत, त्यांचे रोजचे जीवन नक्कीच सुकर होते. अर्थात शस्त्रक्रियेनंतर वृद्ध लोकांनी घरी आणि बाथरूममध्ये पडण्याच्या धोक्यापासून स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे. यासाठी रात्रीच्या वेळी घरात पुरेशी प्रकाश व्यवस्था ठेवावी. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच व्यायाम करावा.
(लेखक नामवंत अस्थिरोगतज्ज्ञ आहेत.)