Snail fever disease risk | धोका स्नेल फीवरचा  
आरोग्य

Snail fever disease risk | धोका स्नेल फीवरचा

पुढारी वृत्तसेवा

डॉ. संतोष काळे

नद्या, तलाव किंवा नैसर्गिक झर्‍यांमध्ये पोहण्याचा मोह कोणाला आवरत नाही? मात्र, निसर्गाच्या सान्निध्यात डुंबण्याचा हा आनंद आता जीवावर बेतू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगभरात दरवर्षी सुमारे 25 कोटी लोक ‘स्नेल फीवर’च्या विळख्यात अडकत आहेत.

वैद्यकीय भाषेत ‘स्नेल फीवर’ याला ‘सिस्टोसोमियासिस’ असे म्हटले जाते. हा आजार केवळ ताप आणणारा नसून, तो यकृत आणि फुफ्फुसांसारख्या महत्त्वाच्या अवयवांना कायमस्वरूपी निकामी करण्याची क्षमता ठेवतो.

‘सिस्टोसोमियासिस’ म्हणजे काय?

हा आजार एका विशिष्ट परजीवी कृमीमुळे (फ्लूक वर्म) होतो. हे परजीवी प्रामुख्याने गोड्या पाण्यातील गोगलगाईंमध्ये आश्रय घेतात. जेव्हा एखादी व्यक्ती अशा दूषित पाण्यात उतरते, तेव्हा या परजीवींचे ‘लार्वा’ मानवी त्वचेचा भेद करून थेट रक्ताभिसरण प्रक्रियेत शिरतात. विशेष म्हणजे, हे लार्वा इतके सूक्ष्म असतात की, ते उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. एकदा का हे परजीवी रक्तामध्ये शिरले की, ते रक्तवाहिन्यांमध्येच आपली वाढ करतात आणि अंडी घालू लागतात. ही अंडी शरीरातील विविध भागांत अडकतात आणि तिथल्या ऊतींना नष्ट करू लागतात :

यकृत आणि आतडे : अंडी यकृतामध्ये अडकल्याने तिथे सूज येते आणि कालांतराने यकृत निकामी होऊ शकते.

फुफ्फुसे : रक्ताद्वारे हे परजीवी फुफ्फुसांपर्यंत पोहोचतात, ज्यामुळे श्वसनाचा त्रास आणि फुफ्फुसांचे गंभीर आजार उद्भवतात.

जननेंद्रिये आणि कर्करोग : जेव्हा हे परजीवी जननेंद्रियांच्या भागात संसर्ग करतात, तेव्हा त्याला ‘युरोजेनिटल शिस्टोसोमियासिस’ म्हणतात. यामुळे वंध्यत्व येणे, मूत्रातून रक्त येणे आणि काही प्रकरणांमध्ये मूत्राशयाचा कर्करोग होण्याचा धोका निर्माण होतो.

एचआयव्हीचा धोका : जननेंद्रियांवर झालेल्या जखमांमुळे अशा व्यक्तींना एचआयव्ही संसर्गाचा धोका निरोगी व्यक्तीपेक्षा कितीतरी पटीने जास्त असतो.

धोका कुठे आहे आणि कुठे नाही?

नद्या, तलाव आणि धरणे : हे या परजीवींचे मुख्य केंद्र आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील गोड्या पाण्याचे साठे जिथे गोगलगाईंचे प्रमाण जास्त असते, तिथे हा धोका सर्वाधिक असतो.

स्विमिंग पूल : क्लोरीनयुक्त आणि स्वच्छ फिल्टर केलेल्या स्विमिंग पूलमध्ये हा धोका नसतो. कारण, क्लोरीन या लार्वांना नष्ट करते.

समुद्र : खार्‍या पाण्यात हे परजीवी जगू शकत नाहीत, त्यामुळे समुद्रात हा संसर्ग होण्याचे प्रमाण अत्यंत दुर्मीळ आहे.

संसर्ग वाढण्याची कारणे आणि बचावाचे उपाय

वाढते जागतिक तापमान (ग्लोबल वॉर्मिंग) आणि हवामान बदलामुळे गोगलगाईंचे प्रजनन क्षेत्र वाढत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटनामुळे हा परजीवी एका देशातून दुसर्‍या देशात वेगाने पसरत आहे. यापासून वाचण्यासाठी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे :

अप्रमाणित किंवा दूषित नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये पोहणे टाळावे.

नदी किंवा तलावात उतरण्यापूर्वी शरीरावर कुठेही जखम किंवा कट नसावा. कारण, तिथून परजीवी सहज शिरकाव करू शकतात.

पाण्यात भिजल्यानंतर लगेच स्वच्छ पाण्याने आणि साबणाने आंघोळ करावी. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी नेहमी उकळूनच वापरावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT