Swine Flu | धोका स्वाईन फ्लूचा  
आरोग्य

Swine Flu | धोका स्वाईन फ्लूचा

पुढारी वृत्तसेवा

डॉ. अनिल न. मडके

वातावरण पावसाळी आहे. अशा वातावरणात गर्दीच्या ठिकाणी थोडे सावध राहिलो, तर आपल्याला आरोग्याच्या बाबतीतही संरक्षण मिळेल. अन्यथा फ्लूसारखा साधा विषाणू आपल्या फुफ्फुसांवर आक्रमण करायला वेळ लावत नाही, हे लक्षात घ्यावे.

इन्फ्लूएंझा किंवा फ्लू हा श्वसनसंस्थेचा एक संसर्गजन्य आजार आहे, ज्यात नाक, घसा, श्वासनलिका आणि वायुकोश यांवर परिणाम होतो. H1N1 या 'इन्फ्लूएंझा ए' प्रकारच्या विषाणूमुळे होणारा फ्लू म्हणजे स्वाईन फ्लू. त्याची पहिली मोठी साथ २००९ मध्ये आली होती. हा विषाणू बाधित व्यक्तीकडून खोकताना, शिंकताना, बोलताना किंवा श्वास घेताना बाहेर पडणाऱ्या तुषारांतील सूक्ष्म कणांद्वारे पसरतो. दूषित हात किंवा पृष्ठभागांनंतर नाक, तोंड किंवा डोळ्यांना स्पर्श केल्यानेही संसर्ग पसरू शकतो. सुरुवातीची लक्षणे अनेकदा सामान्य फ्लूसारखी दिसतात. जसे की, अचानक ताप येणे, थंडी वाजणे, खोकला, घसा खवखवणे, स्नायूदुखी किंवा अंगदुखी, डोकेदुखी, तीव्र थकवा, नाक वाहणे किंवा चोंदणे इ. बहुतेक वेळा हे संसर्ग सौम्य असतात.

न्यूमोनिया- जेव्हा हा संसर्ग फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो तेव्हा न्यूमोनिया होतो. न्यूमोनिया म्हणजे फुफ्फुसांचा किंवा वायुकोशांचा दाह. न्यूमोनियामुळे वायुकोश घट्ट होतात. येथे होणारी ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांची देवाणघेवाण मंदावते. त्यामुळे रक्तातील ऑक्सिजन कमी होऊ होतो आणि आजार बळावला, तर श्वसन क्रिया बंद पडू शकते.

न्यूमोनियाची लक्षणे - जेव्हा न्यूमोनिया होतो, तेव्हा लक्षणे तीव्र स्वरूप धारण करतात. दम लागणे किंवा धाप लागणे, श्वसनाचा वेग प्रचंड वाढणे, छातीत वेदना होणे किंवा छातीवर दाब आल्यासारखे वाटणे. तसेच ओठ किंवा त्वचा निळसर होणे, उलट्या होणे, मानसिक स्थिती गोंधळल्यासारखी होणे, अतिझोप किंवा आकडी येणे, लघवीचे प्रमाण कमी होणे अशी लक्षणे दिसतात. अशा स्थितीत वेळीच हॉस्पिटलमध्ये दाखल होणे शहाणपणाचे असते.

जोखीम गट- गर्भवती किंवा नुकतीच प्रसूती झालेली महिला, ५ वर्षांखालील मूल किंवा ६५ वर्षांवरील व्यक्ती, दमा किंवा सीओपीडी , हृदयविकार, मूत्रपिंड विकार, यकृत समस्या, मेंदू विकार, मधुमेह, कर्करोग, अतिलठ्ठपणा किंवा रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास न्यूमोनियाची गुंतागुंत आणि गांभीर्य वाढू शकते.

निदान - गुंतागुंत नसलेल्या सौम्य इन्फ्लुएंझासाठी चाचणीची गरज नसते; पण गुंतागुंतीच्या रुग्णांमध्ये चाचण्या कराव्या लागतात. रिपोर्ट येण्यापूर्वी उपचार सुरू करावे लागतात. आरटीपीसीआर (Real-time-PCR) ही चाचणी नाक किंवा घशातील श्वसन स्राव (स्वॅब) घेऊन केली जाते.

उपचार आणि काळजी- अशा रुग्णांमध्ये तातडीने अँटिव्हायरस औषधे द्यावी लागतात. आजार सौम्य असताना संपूर्ण विश्रांती घ्यावी, भरपूर पाणी आणि फळांचा रस घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तापासाठी औषधे घ्यावीत. शक्यतो हवेशीर खोलीत राहावे. इतरांसाठी आपण मास्क वापरावा. गर्दीत जाणे टाळावे. तंबाखू , धूम्रपान, मद्यपान नको. स्वतः अँटिबायोटिक्स घेऊ नयेत.

प्रतिबंध- जेव्हा आजूबाजूला इन्फ्लूएंझाची साथ असेल, तेव्हा मास्क वापरणे इष्ट ठरते. हात साबण आणि पाण्याने वारंवार धुवावेत. खोकताना आणि शिंकताना रुमाल किंवा टिश्यू पेपर वापरावा. ज्यांना दीर्घकालीन श्वसनविकार, हृदयविकार, मधुमेह, कर्करोग किंवा रोगप्रतिकारक्षमता कमी असणे अशा व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने दरवर्षी फ्लूची लस घ्यावी आणि अर्थात आरोग्याची त्रिसूत्री म्हणजे सकस आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी विश्रांती नि झोप, यांकडे लक्ष दिल्यास आपण निरोगी राहतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT