डॉ. मितेन शेठ
आपल्याला गुडघ्याचा संधिवात आहे का? सार्वजनिक वाहतुकीद्वारे कठीण प्रवास केल्यामुळे सतत वेदना होतात का? प्रवास करताना वेदना होऊ नये, यासाठी काही टीप्स हव्या आहेत का? मग, आपण कोणत्याही क्षणाचा विलंब न करता खालील उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे.
गुडघेदुखीची अनेक कारणे आहेत. ते जाणण्यासाठी गुडघ्याची रचना माहीत असणे गरजेचे आहे. चार वेगवेगळी हाडे मिळून गुडघा तयार होतो. याबरोबर मांसपेशी, 'टेंडन्स', 'कार्टीलेज' आणि 'लिगामेन्टस्' यांचाही गुडघा तयार होण्यात समावेश असतो. त्यावर एक 'सायनोवीयल सॅक' नावाचे आवरण असते व ते एक द्रव्य तयार करते. त्याला'सायनोवियल फ्लुईड' म्हणतात. गुडघ्याच्या हालचालींसाठी हे द्रव्य अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या शरीराचे संपूर्ण वजन गुडघ्यावर असते. अनेक कारणांमुळे संधिवात निर्माण होतो. संधिवाताला सांधेदुखी असेही म्हणतात. सांध्यांमध्ये कार्टिलेज नावाचा घटक असतो. या कार्टिलेजमुळे सांध्यांची हालचाल योग्यरीत्या होत असते. कोणत्याही कारणास्तव कार्टिलेजची झीज झाली असता सांधेदुखी वाढते व या वेदना असह्य होतात. सांध्यांमधील हाडे एकमेकांना घासली जातात. त्यामुळे गुडघ्यामध्ये सूज येऊ लागते. या स्थितीला सांधेदुखी किंवा ऑस्टिओआर्थरायटिस असे म्हटले जाते.
संधिवाताची लक्षणे
या व्याधीत सांध्यात वेदना, सांध्यांवर सूज ही प्रमुख लक्षणे असतात. संधीमध्ये वेदना व सूज हे एकत्रितपणे असते किंवा फक्त संधीवेदनाही असू शकते. सांध्यांच्या हालचाली करताना वेदना होणे,उठताना, बसताना किंवा चालताना आवाज येणे, संधीचा स्पर्श वाताने भरलेल्या खालीप्रमाणे जाणवणे, संधीच्या हालचालींवर मर्यादा येणे किंवा त्या नष्ट होणे, अशी लक्षणे आढळतात.
गुडघेदुखीची कारणे
गुडघ्यावर ताण पडणे किंवा मार लागणे हाड मोडणे लिगामेंट, कार्टिलेज, सायनोवियल सॅकशी संबंधित आजार क्षयरोग वा त्यासदृश्य आजाराचा गुडघ्यामध्ये झालेला संसर्ग वातसदृश्य आजार लठ्ठपणा आनुवंशिक संधिवात हा कूर्चेचा रोग आहे. वयोमानानुसार जशी हाडांची झीज होते, तशाच लवचिक कूर्चा कडक व ठिसूळ बनतात. त्यामुळे किरकोळ स्वरूपाचा मार लागला तरी त्या फाटतात व दुखण्यास तसेच सूज येण्यास सुरुवात होते.
गुडघ्याचा संधिवात आणि प्रवास
गुडघ्याचा संधिवात असणार्या व्यक्तीने प्रवास करणे खरेतर कठीण असते. कारण, प्रवासादरम्यान सांध्यांवर येणारा भार अधिक त्रासदायक ठरू शकतो. साधारणपणे वाढत्या वयानुसार कार्टिलेजची क्षमता कमी होते. झीज वाढत जाते. त्यामुळे संधिवाताचे प्रमाण वृद्ध व्यक्तींमध्ये अधिक आहे. सांधे दुखणे, सांध्यांची हालचाल योग्य रितीने न होणे, तसेच चालताना, वाकताना, उठताना, बसताना त्रास होणे, जिना चढणे-उतरणे यामध्ये वेदना निर्माण होतात. ही सर्व लक्षणे उतारवयामध्ये वेदना निर्माण करणारी आहेत.
प्रवासादरम्यान अशी घ्या काळजी
सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना चढताना अथवा उतरताना गुडघ्यांवर अतिरिक्त भार येणार नाही, याची काळजी घ्या.
प्रवासात घाई करू नका, एका वेळी एकच पाऊल उचला.
प्रवासात बराच वेळ बसावे लागते असल्याने अधून मधून उभे राहा जेणेकरून हाडांवर ताण येणार नाही. अधिक काळ एकाच जागी बसल्याने स्नायूंवर ताण येऊन त्यामुळे शक्य असेल तेव्हा उभे राहा आणि हालचाल करा. जेणेकरून शारीरिक वेदनांपासून लांब राहता येईल. असे केल्याने अधिक काळ बसता येईल. व्हीलचेअरचा वापर करा. यामुळे स्नायूंवर अधिक ताण येणार नाही. विमान प्रवास करताना आधीच व्हिलचेअर बुक करणे सोयिस्कर ठरेल.
तुमची औषधे नेहमी जवळ बाळगा. प्रवासादरम्यान औषधांचा डोस चुकविणे नुकसानकारक ठरेल त्यामुळे रोजची औषधे आपल्या जवळ बाळगणे उत्तम ठरते, टॅबलेट 'डोलो 650' ही पेनकिलर आपल्या सोबत ठेवल्यास अडचण येणार नाही.
आरामदायी आसनव्यवस्था निवडणे अधिक फायद्याचे ठरेल. प्रवासादरम्यान उठणे आणि बसणे सहज शक्य होईल, अशी जागा निवडा. प्रवासात पाय लांब करता येतील, अशी सीट निवडल्यास फायदा होईल. फ्लाईट निवडताना कमी अंतराच्या फ्लाईट्स निवडणे योग्य ठरेल. चारचाकीने प्रवास करताना अधूनमधून ब्रेक घेणे योग्य ठरेल. यामुळे एकाच अवस्थेत न बसता अधूनमधून हालचाल करता येणे शक्य होईल आणि वेदनांपासून दूर राहणे शक्य होईल.
आरामदायी कपड्यांची निवड करा जेणेकरून प्रवासादरम्यान अडचणी येणार नाहीत. घट्ट कपडे घालणे टाळा. सैल कपड्यांमुळे शक्य तेव्हा वेदनाशामक बाम, बर्फ लावणे शक्य होईल. पायाला अराम देणार्या बुटांची निवड करा.
बस, ट्रेनने प्रवास करताना खूप वेळ उभे राहावे लागणार नाही, याची खबरदारी घ्या. जास्त वेळ उभे राहिल्याने शरीराचा अतिरिक्त भार स्नायूंवर येऊन सांधेदुखी उद्भवू शकते. सांधेदुखीवर लाभदायक ठरणारे साहित्य नेहमी सोबत ठेवा. आईस पॅक, गरम पाण्याची पिशवी अशा गोष्टी नेहमी सोबत बाळगा. डॉक्टरांनी दिलेली औषधे तसेच त्यांनी दिलेल्या सूचनांचे अचूक पालन करा.