shoulder surgery | काय आहे रिव्हर्स टोटल शोल्डर रिप्लेसमेंट? Pudhari File Photo
आरोग्य

shoulder surgery | काय आहे रिव्हर्स टोटल शोल्डर रिप्लेसमेंट?

पुढारी वृत्तसेवा

डॉ. सम्यक पंचोली

फ्रोजन शोल्डरची तीव्र अवस्था असल्यास खांद्याच्या सांध्याचे कार्य पूर्णपणे थांबलेले असल्यास रिव्हर्स टोटल शोल्डर रिप्लेसमेंट ही शस्त्रक्रिया करणे अपरिहार्य आणि लाभदायक ठरते.

आपला खांदा हा वरच्या हाताच्या हाडाने (ह्यूमरस) आणि खांद्याच्या पातीने (स्कॅप्युला) बनलेला आहे. हाताच्या हाडाचे गोलाकार टोक (ह्युमरल हेड) खांद्याच्या पातीतील उथळ कप्प्यात (सॉकेट) बसलेले असते. यामुळे खांद्याला विस्तृत हालचाल करण्याची क्षमता मिळते. या सांध्याभोवती असलेले कूर्चा (कार्टिलेज), टेंडन आणि स्नायुबंध (लिगामेंट) हेदेखील स्नायूंची हालचाल सुरळीत करण्यास साहाय्य करतात.

का करावी लागते शस्त्रक्रिया?

काही कारणांमुळे किंवा बरेचदा चुकीच्या सवयींमुळे, अपघातांमुळे, जड वस्तू चुकीच्या पद्धतीने उचलल्यामुळे खांद्यात तीव्र वेदना सुरू होतात. परिणामी, दैनंदिन कामे करणे कठीण होते. काही वेळा खांद्यातील अशक्तपणामुळे हात पूर्णपणे हलवता येत नाही. औषध, इंजेक्शन किंवा फिजिकल थेरपी यांसारख्या उपचारांनंतरही लक्षणे कमी होत नाहीत. फ्रोजन शोल्डरची तीव्र अवस्था असल्यास खांद्याच्या सांध्याचे कार्य पूर्णपणे थांबलेले असल्यास रिव्हर्स टोटल शोल्डर रिप्लेसमेंट ही शस्त्रक्रिया करणे अपरिहार्य आणि लाभदायक ठरते.

या शस्त्रक्रियेचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, रोटेटर कफ टिअर आर्थ्रोपॅथी म्हणजे खांद्याच्या सांध्यातील संधिवाताबरोबर रोटेटर कफ स्नायुबंध तुटलेले किंवा नष्ट झालेले असणे. अशावेळी स्टँडर्ड खांदा प्रत्यारोपण यशस्वी ठरत नाही. कारण, त्याला स्थिरतेसाठी आणि हालचालीसाठी रोटेटर कफची गरज असते. रिव्हर्स प्रत्यारोपण मात्र रोटेटर कफऐवजी डेल्टॉईड स्नायूचा वापर करून हात उचलण्याची क्षमता परत आणते.

खांद्याच्या सांध्याला नुकसान होण्याची कारणे

ऑस्टिओआर्थरायटीस या आजारामुळे हाडांच्या टोकांवर असलेले कार्टिलेज खराब होते. यामुळे सांधा सुरळीतपणे हलू शकत नाही.

रोटेटर कफ हा खांद्याच्या सांध्याभोवती असलेल्या स्नायू आणि टेंडन्सचा समूह आहे. हे स्नायू तुटल्यास किंवा त्यांना इजा झाल्यास खांद्याच्या कार्टिलेज आणि हाडांचे नुकसान होऊ शकते.

वरच्या भागातील ह्युमरस हाडाच्या फ्रॅक्चरमुळे खांदा बदलण्याची गरज पडू शकते. विशेषत: जेव्हा आधीच्या शस्त्रक्रियेनंतर हाड नीट जुळले नसेल, तर खांदाबदल गरजेचा ठरतो.

रुमॅटोईड आर्थरायटीस आणि इतर काही संसर्गजन्य आजारांमध्ये रोगप्रतिकारक प्रणाली अतिसक्रिय होऊन कार्टिलेजबरोबरच हाडांचेही नुकसान करू शकते.

ऑस्टिओनेक्रोसिससारख्या काही खांद्याच्या आजारांमध्ये ह्युमरसला पुरेसा रक्तप्रवाह मिळत नाही. त्यामुळे हाड कमकुवत होऊन तुटू शकते.

रिव्हर्स टोटल शोल्डर रिप्लेसमेंट ही खांद्यावरील एक विशेष प्रकारची शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेत डॉक्टर खांद्याच्या सांध्यातील खराब किंवा नुकसान झालेल्या भागांना काढून टाकतात आणि त्याऐवजी कृत्रिम भाग बसवतात. सामान्य खांदा प्रत्यारोपणात कृत्रिम गोल (बॉल) हाताच्या हाडावर आणि कप्पा (सॉकेट) खांद्याच्या पातीवर बसवतात; परंतु रिव्हर्स प्रत्यारोपणात हे उलटे असते. खांद्याच्या पातीच्या बाजूस गोल आणि हाताच्या हाडाच्या बाजूस कप्पा बसवला जातो. त्यामुळे या प्रकाराला ‘रिव्हर्स’ असे नाव आहे. यामध्ये कप्पा धातूच्या दांडीने (स्टेम) ह्यूमरस हाडात बसवला जातो, तर बॉल खांद्याच्या पातीला स्क्रू आणि धातूच्या प्लेटने जोडला जातो.

हात वर उचलता न येणे, खांद्याच्या पुढच्या बाजूस हाडाची फुगीर हालचाल दिसणे, खांद्याची हाडे गंभीररीत्या मोडणे, विशेषतः बॉल हाडाजवळील किंवा बॉल तुकडे होणे, ट्यूमरमुळे हाड काढावे लागणे अशा स्थितीत ही शस्त्रक्रिया प्रभावी ठरते.

किती टक्के यशस्वी?

आजवरच्या पाहण्यांनुसार या शस्त्रक्रियेमुळे 85-90 टक्के रुग्णांमध्ये उत्कृष्ट परिणाम दिसून येतात. बहुतेक रुग्ण डोक्याच्या वर हात नेऊ शकतात; परंतु बाजूला हात पसरवण्याची क्षमता हळूहळू प्राप्त होते. साधारणतः या शस्त्रक्रियेसाठी 2-3 दिवस रुग्णालयात राहावे लागते. 90 टक्के रुग्णांमध्ये हा सांधा 15 वर्षे टिकतो.

या शस्त्रक्रियेदरम्यान जनरल अ‍ॅनेस्थेशिया किंवा नर्व ब्लॉक करून खांद्यावर चीर देऊन खराब हाड व ऊतक काढून टाकले जाते. सॉकेटच्या बाजूस धातूची प्लेट व स्क्रू बसवून त्यावर बॉल बसवला जातो. तसेच ह्यूमरस हाडात रॉड व त्यावर प्लास्टिक सॉकेट बसवले जाते. यानंतर स्नायू व त्वचा टाके किंवा स्टेपल्सने बंद केल्या जातात.

काय काळजी घ्यावी?

शस्त्रक्रियेपूर्वी एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय यांसारख्या तपासण्या करून हाडे व मऊ ऊतकांची अचूक माहिती घेतली जाते. रुग्णाने घेत असलेल्या सर्व औषधांची माहिती डॉक्टरांना देणे आवश्यक असते. तसेच रक्त पातळ करणारी औषधे (ब्लड थिनर्स) थांबवण्याबाबत सल्ला घ्यावा. तसेच शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरनी सांगितलेली पथ्ये पाळणे आणि औषधे नियमित व वेळेवर घेणे आवश्यक आहे.

(लेखक अस्थिरोगतज्ज्ञ, शोल्डर आणि अप्पर लिंब सर्जन आहेत.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT