आरोग्य

छाती चोंदल्यास ‘हे’ घरगुती उपाय करू शकता! 

Pudhari News

डॉ. मनोज शिंगाडे

श्‍वसनमार्गाला संसर्ग झाल्यामुळे किंवा तिथे दाह होत असल्यामुळे निर्माण होत असलेली स्थिती म्हणजे छाती चोंदणे. वाढत्या प्रदूषणामुळे श्‍वसनमार्गाला होणारे तीव्र संसर्ग सध्या सर्वसामान्य बनले आहेत. काही घरगुती उपाय यावर प्रभावी ठरतात. अर्थातच, कोणत्याही प्रकारे छाती चोंदली असेल तर डॉक्टरकडे जाणे महत्त्वाचे ठरते. त्यामागे कोणतेही गंभीर कारण नसल्याचे स्पष्ट झाले की तुम्ही घरगुती उपाय करू शकता. 

या घरगुती उपायांमध्ये वनस्पतीजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात वापरले जातात. वैद्यकीय उपचार सुरू असतानाही ते तुम्ही निर्धास्तपणे घेऊ शकता. म्युकस मेंब्रेनच्या दाहामुळे छाती चोंदते. सहसा यामागे विषाणूजन्य संसर्ग हे कारण असते; परंतु त्यातून पुढे बॅक्टेरियाजन्य संसर्गही होऊ शकतो. छाती चोंदलेली असणे आणि कफ असणे या गोष्टी परस्परांशी संबंधित आहेत. कारण, खोकणे हा कफ बाहेर टाकण्यासाठीचा प्रतिक्रियात्मक प्रतिसाद आहे. नाक वाहणे आणि श्‍वास घ्यायला त्रास होणे ही लक्षणे खोकल्यासोबतच यावेळी दिसतात. फुफ्फुसे चोंदणे ही एक अधिक गंभीर स्थिती आहे. त्यामुळे त्या परिस्थितीत तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. 

ब्राँकायटिसमुळे छाती चोंदली असेल, तर त्याला कित्येक घटक कारणीभूत असू शकतात. संसर्ग, वाफांमुळे होणारा दाह, धूळ किंवा वातावरणातील प्रदूषके यांचा त्यामध्ये समावेश असतो. याशिवाय धूम्रपान, रोग प्रतिकारशक्‍ती कमी असणे किंवा आधीपासूनच दमा असणे या कारणांनी त्यात वाढ होते. 

घरगुती उपाय ः गवती चहासारख्या विविध वनस्पतींप्रमाणेच दालचिनी, लवंग, मिरी, लसूण, लिंबू आणि आले यांचा उपयोग केल्यास चोंदलेली छाती मोकळी होते. चहा किंवा कॉफीत आले आणि यापैकी काही पदार्थ घातले तरी चालते. अर्थातच लसूण, लिंबू हे पदार्थ चहा किंवा कॉफीत घालू नयेत; परंतु याहूनही सर्वाधिक साधा उपाय हा गरम पाण्याचा असतो. भरपूर कोमट पाणी प्या. त्यामुळे कफ पातळ होतो. वाफ घेतल्यामुळे चोंदलेले नाक आणि चोंदलेली छातीही साफ होते. फक्‍त पाण्याची किंवा पाण्यात व्हिक्स अगर किसलेला कोबी टाकून वाफ घेतली तर त्याचाही उपयोग होतो. 

बडीशेप ः छाती चोंदण्याबरोबर इन्फ्लुएंझामध्येही बडीशेप उत्तम ठरते. तसेच सायन्युसायटिस आणि श्‍वसनसंस्थेच्या इतर अनेक समस्यांमध्ये बडीशेप गुणकारी ठरते. मसाज करण्याच्या तेलात बडीशेप टाकली तरी त्यामुळे अधिक लाभ मिळतो. तिच्यामुळे कफ सुटतो आणि तिच्यात बॅक्टेरियारोधक गुणधर्मही असतात. घशाला आराम मिळतो. त्यामुळे खोकल्यावरच्या आणि सर्दीवरच्या कित्येक सिरपमध्ये बडीशेप वापरली जाते. 

कापूर ः छाती चोंदली असेल तर कापराचा वापर कित्येक औषधांतून केला जातो. बाम्स आणि रब्जमध्ये याचा प्रभावी वापर करून घेतला जातो. कापरात दाहप्रतिरोधक गुणधर्म आहेत. त्यामुळे छाती चोंदण्याबरोबरच अंगदुखीसाठीही त्याचा उपयोग होतो. म्हणूनच कित्येक बाम हे डोकेदुखी आणि अंगदुखीसाठीही उपयुक्‍त ठरतात. 

निलगिरी ः याचा वापरही कित्येक औषधांमध्ये केल्याचे आढळते. बाम्स, रब्ज यांच्यात ती वापरली जाते. बंद झालेला हवेचा मार्ग ती खुला करते आणि शरीराला सर्दीपासून आराम देते. 

लसूण  ः लसूण ही नैसर्गिक वनस्पती असून चोंदलेली छाती मोकळी करते. तसेच घसा धरला असेल तरी त्यावर उपकारक ठरते. ती दाहप्रतिरोधक आणि विषाणू व जीवाणू (बॅक्टेरिया) रोधक आहे. त्यामुळे हे संसर्ग दूर करण्यासाठी लसणाचा उपयोग होतो. लसणात क्‍वेरसेटिन असते. ते लिपोक्झायजिनेझची सक्रियता रोखते. लिपोक्झायजिनमुळे दाह वाढवणारी रसायने स्रवतात. त्यामुळे लसूण खाल्यामुळे दाह ताबडतोब थांबतो. लसूण कच्ची चावून खाता येते किंवा अन्‍नपदार्थांत घालून खाता येते.

आले  ः आल्यात दाहप्रतिरोधक, बॅक्टेरिया आणि विषाणू प्रतिरोधक गुणधर्म असतात. त्यामुळे श्‍वसनमार्गातील अडथळा दूर होतो आणि सर्दी, खोकल्यात किंवा छाती चोंदली असेल तरी त्वरित आराम पडतो. पाण्यात ताज्या आल्याचा तुकडा उकळा. गाळा आणि ते पाणी गार करून घ्या. आल्याचे असे पाणी रोज प्यायल्यामुळे त्याचे मोठे लाभ मिळतात आणि श्‍वसनमार्ग चांगला राहतो. 

लिंबू आणि तत्सम पदार्थ ः सिट्रिक अ‍ॅसिड हे बॅक्टेरियारोधक असते आणि संसर्ग दूर करते. लिंबू, मोसंबी, संत्री या फळांमध्ये ते असते. या फळांमुळे छातीतील कफ दूर होतो आणि घशाला आराम वाटतो. लिंबातील व्हिटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारशक्‍तीतही वाढ होते. एक ग्लास पाण्यात अर्धे लिंबू पिळून ते प्या. रोज ते घेतल्यास चोंदलेले नाक किंवा छाती मोकळी होते. 

मध ः एक टेबलस्पून मध गरम पाण्यात घालून प्यायल्यास घशाला आराम मिळतो. अगदी लहान मुलांना मात्र मध देऊ नये. कारण, त्यामुळे त्यांना काही वेळा त्रास होऊ शकतो. 

तुळस ः तुळशीत अनेक औषधी गुणधर्म असतात. खोकला, सर्दी यांच्यावरही ती उपयुक्‍त ठरते. तिच्यात बॅक्टेरियारोधक आणि बुरशीरोधक गुणधर्मही असतात. तुळशीत कॅम्फिन, युजेनॉल आणि सिनेओल ही रसायने असतात. त्यांच्यामुळे चोंदलेली छाती मोकळी होती. तसेच तिच्यात दाहरोधक, अ‍ॅलर्जीरोधक गुणधर्म असतात. तुळशीच्या पानांचा चहा अत्यंत उपयुक्‍त ठरतो. तुळशीची आठ ते दहा पाने धुऊन घ्या आणि पाण्यात आले व गूळ घालून ती चांगली उकळा. हा चहा दूध न घालता गाळून प्या. सर्दी आणि खोकल्यात आराम पडतो. 

चहा ः चहाचा कफ घालवण्यासाठी मोठाच उपयोग होतो. चहात थिओब्रोमीन आणि थिओफायलिन हे रासायनिक घटक असतात. त्यांच्यामुळे श्‍वसनमार्ग रुंदावतो. हृदयाची गती वाढते आणि रक्‍तप्रवाहही वाढतो. गवती चहाही मोठीच उपयुक्‍त औषधी आहे. साध्या चहाहूनही तिच्यात अधिक प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. 

हळद ः आयुर्वेदात हळदीला 'हरिद्रा' असे म्हटले गेले आहे. तिच्यात मोठे औषधी गुणधर्म असतात. टमेरोन्स, कर्क्युमिनॉईड्स, कर्क्युमिन आणि टेट्राहायड्रोकर्क्युमिन हे हळदीतील घटक दमारोधक आणि कफरोधक आहेत. हळदीच्या मुळांचा ताजा रस ब्राँकायटिसमध्ये उपयुक्‍त ठरतो. दुधात हळद टाकून ते उकळले जाते. गूळ घालून ते प्यायल्यास छाती मोकळी होते. दम्याचा त्रास असेल तर याच्या वाफाही उपयुक्‍त ठरतात. 

अनेक अ‍ॅलोपॅथिक औषधांमधील रसायनांचे दुष्परिणाम सध्या समोर येत असल्यामुळे लोक पुन्हा घरगुती उपचारांकडे वळत आहेत. हे उपचार, साधे, सोपे आणि दुष्परिणामरहीत आहेत. तसेच त्यांच्याबरोबर इतर उपचार सुरू ठेवल्यानेही काही बिघडत नाही. डॉक्टरांकडे जाण्याआधी तातडीने हे उपचार केले तर आराम पडतो. काही वेळा तर त्यांच्यामुळे डॉक्टरांकडे जाण्याची गरजच उरत नाही. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT