नीलिमा महाजन
जर उरलेला भात योग्य पद्धतीने साठवला नाही किंवा तो वारंवार गरम केला, तर त्यात हानिकारक जीवाणूंची वाढ होऊन अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो. बर्याचदा या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले जाते, जे पुढे जाऊन पोटाचे विकार आणि इतर आरोग्य समस्यांना निमंत्रण देऊ शकते.
शिजवलेल्या भातामध्ये ‘बॅसिलस सेरियस’ नावाचे जीवाणू असू शकतात. जेव्हा शिजवलेला भात दीर्घकाळ खोलीच्या तापमानाला म्हणजेच बाहेर ठेवला जातो, तेव्हा हे जीवाणू वेगाने वाढू लागतात. महत्त्वाचे म्हणजे, एकदा या जीवाणूंनी आपली विषारी द्रव्ये भातात सोडली, की त्यानंतर तो भात गॅसवर किंवा मायक्रोवेव्हमध्ये कितीही गरम केला तरी ती नष्ट होत नाहीत. त्यामुळे असा भात खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरते.
जास्त गरम केल्याने भात सुरक्षित होतो हा एक मोठा गैरसमज आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बॅसिलस सेरियसचे विषारी घटक उष्णतारोधक असतात, म्हणजेच ते प्रखर उष्णतेमध्येही टिकून राहतात. त्यामुळे वारंवार गरम केलेला भात लहान मुले, वृद्ध आणि ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे अशा व्यक्तींसाठी अधिक हानिकारक ठरू शकतो.
विषबाधेची लक्षणे
अशा प्रकारचा भात खाल्ल्यानंतर काही तासांतच उलट्या होणे, मळमळणे, पोटात तीव्र वेदना होणे, जुलाब आणि अशक्तपणा जाणवू शकतो. यासोबतच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने म्हणजेच डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. मग प्रश्न असा पडेल की उपाय काय? भात उरला असेल, तर तो बाहेर न ठेवता लवकरात लवकर थंड करून हवाबंद डब्यात भरावा आणि फ्रीजमध्ये ठेवावा. फ्रीजचे तापमान 5 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असावे, जेणेकरून जीवाणूंची वाढ रोखता येईल. साठवलेला भात 24 तासांच्या आत वापरणे केव्हाही चांगले. तसेच, तो फक्त एकदाच गरम करावा, वारंवार गरम करणे टाळावे. भाताला विशिष्ट वास येत असेल, त्याचा रंग बदलला असेल किंवा तो अधिक चिकट झाला असेल, तर तो अजिबात खाऊ नये. आरोग्यासाठी नेहमी ताजे अन्न खाणेच सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर ठरते.