real and fake almonds how to identify real almond
पुढारी ऑनलाईन :
बदाम आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, मात्र बाजारात सध्या नकली आणि भेसळयुक्त बदामही मोठ्या प्रमाणावर विकले जात आहेत. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी खरे आणि नकली बदाम यांची ओळख करणे अत्यंत गरजेचे आहे. येथे जाणून घ्या 4 सोप्या पद्धती.
बदाम आरोग्यासाठी उपयुक्त
बदाम आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यामध्ये प्रथिने, फायबर, विविध जीवनसत्त्वे तसेच हेल्दी फॅट्स मुबलक प्रमाणात असतात. मात्र आजकाल वाढत्या मागणीमुळे बाजारात नकली किंवा भेसळयुक्त बदामही मोठ्या प्रमाणावर विकले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होउ शकते.
बनावट बदाम खाल्ल्याने आरोग्यावर दुष्परिणाम
बनावट बदाम खाल्ल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे बदाम खरेदी करण्यापूर्वी खरे आणि नकली बदाम ओळखणे फारच महत्त्वाचे ठरते. यात आम्ही तुम्हाला 4 सोप्या पद्धती सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही खऱ्या बदामांची ओळख सहज करू शकता.
रंगावरून ओळख खरे बदाम
खऱ्या बदामांचा रंग साधारणपणे फिकट तपकिरी असतो. तर नकली किंवा भेसळयुक्त बदाम खूपच चमकदार आणि जास्त गुळगुळीत दिसतात. अनेकदा त्यांना पॉलिश किंवा रसायनांनी प्रक्रिया केलेली असते, ज्यामुळे त्यावर कृत्रिम चमक येते. बदाम फारच गुळगुळीत वाटत असतील, तर ते खरेदी करू नयेत.
वासाकडे लक्ष द्या
खऱ्या बदामांना हलका, नैसर्गिक आणि बदामासारखाच सुगंध असतो. जर बदामांतून रसायनांचा वास, विचित्र किंवा उग्र दुर्गंधी येत असेल, तर ते नकली किंवा खराब असू शकतात. खरेदी करताना थोडे बदाम वास घेऊन तपासून पाहा.
चवीवरून तपासा
खऱ्या बदामांची चव हलकी गोड आणि क्रीमी असते. जर चव घेतल्यावर बदाम फार कडू किंवा विचित्र लागत असतील, तर ते खरेदी करू नका. कडू चव असल्यास त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता असते.
पाण्यात भिजवून टेस्ट करा
बदाम पाण्यात भिजवूनही तपासता येतात. काही बदाम 5–6 तास पाण्यात भिजत ठेवा. खऱ्या बदामांचे साल सहज निघते आणि आतला गर पांढरा व स्वच्छ दिसतो. तर नकली किंवा प्रोसेस केलेल्या बदामांचे साल नीट निघत नाहीत. काही वेळा नकली बदाम आतून पिवळसर रंगाचेही असतात.