Winter Kidney health | हिवाळ्यात करा मूत्रपिंडाचे संरक्षण pudhari File Photo
आरोग्य

Winter Kidney health | हिवाळ्यात करा मूत्रपिंडाचे संरक्षण

पुढारी वृत्तसेवा

डॉ. भाविन पटेल

हिवाळ्यात होणार्‍या शरीरातील निर्जलीकरणामुळे मूतखड्याची शक्यता वाढते. मूतखड्याची कारणे समजून घेतल्यास आणि योग्य जीवनशैलीचे पालन केल्यास थंडीतही तुमच्या मूत्रपिंडाचे रक्षण होऊ शकते.

थंडीच्या दिवसात तापमान कमी होत असताना, बरेच लोक नकळत कमी पाणी पितात, ज्यामुळे निर्जलीकरण होते. हे मूतखडा होण्यामागील एक प्रमुख कारण आहे. मूतखडे हे कॅल्शियम, ऑक्सलेट आणि युरिक अ‍ॅसिडसारख्या खनिजांपासून बनलेले घन स्फटिक असतात, जे मूत्रपिंडात जमा होतात. जेव्हा हे खडे मूत्रमार्गातून पुढे जातात, तेव्हा प्रचंड वेदना आणि अस्वस्थता निर्माण होते. मूत्रपिंडातील खडे होण्यामागची कारणे म्हणजे पाणी कमी पिणे. मीठ, प्रथिनं आणि प्रक्रिया केलेले अन्न जास्त प्रमाणात सेवन केल्याने मूत्रपिंडात खडे तयार होतात. कोरडी हवा आणि घामाचे प्रमाण कमी झाल्याने आपल्याला तहानदेखील कमी लागते. ज्या लोकांना मूतखड्याचा इतिहास आहे किंवा लठ्ठपणा, मधुमेह किंवा संधिविकार यासारख्या आजारांचा वैद्यकीय इतिहास आहे, त्यांना किडनी स्टोन होण्याचा धोका अधिक असतो.

पाठीच्या खालच्या भागात किंवा ओटीपोटात तीव्र वेदना, लघवी करताना जळजळ होणे, मळमळ किंवा उलट्या होणे, फेसाळ किंवा लालसर लघवी होणे तसेच वारंवार लघवी करण्याची इच्छा होणे, ही लक्षणे दिसून येतात. वेळीच उपचार न केल्यास मूत्रपिंडाचे गंभीर नुकसान होते किंवा संसर्ग होतो. किडनी स्टोनवर उपचार हे त्या खड्याच्या आकारावर आणि प्रकारावर अवलंबून असतात. लहान खडे बहुतेकदा नैसर्गिकरीत्या निघून जातात. मोठ्या दगडांना मात्र शॉक वेव्ह थेरपी (लिथोट्रिप्सी), युरेटेरोस्कोपीसारख्या वैद्यकीय प्रक्रियेची आवश्यकता भासते.

प्रतिबंधात्मक उपाय आणि व्यवस्थापन करताना आपल्याला तहान लागली नसली, तरीही दररोज 10 ते 12 ग्लास पाणी प्यावे. कोमट पाणी किंवा हर्बल टी, जसे की पुदीना, कॅमोमाईल किंवा हिबिस्कस असे पर्याय निवडावेत. जास्त सोडियममुळे लघवीमध्ये कॅल्शियम जमा होते म्हणून प्रक्रिया केलेल्या पदार्थाचे सेवन टाळावे. लिंबू आणि संत्री सारख्या लिंबूवर्गीय फळांचा समावेश असलेला पौष्टिक आहार घ्या. तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्यायाम करावा. व्यायामामुळे चयापचय प्रक्रिया सुधारते आणि मूत्रपिंडाचे कार्य चांगले राहण्यास मदत होते. लघवीच्या रंगातील बदलांचे निरीक्षण करावे आणि कोणतीही असामान्यता आढळल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. जर वेदना, जळजळ किंवा लघवीवाटे रक्त येत असेल, तर ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी.

हिवाळ्यात जेव्हा डिहायड्रेशनचा धोका वाढतो, तेव्हा मूतखडा टाळता येतो. म्हणून द्रवपदार्थांचे सेवन करणे, पौष्टिक आहार घेणे आणि सक्रिय जीवनशैली बाळगणे, हे मूत्रपिंडाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT