डेस्कवर दीर्घकाळ बसून काम करणे आरोग्यावर विपरीत परिणाम घडवू शकते. अशा प्रकारचा दिनक्रम हळूहळू शरीराच्या अनेक भागांवर दुष्परिणाम करतो. यामध्ये स्नायू व सांधेदुखी, चयापचय प्रक्रिया मंदावणे, मानसिक तणाव वाढणे आणि बौद्धिक कार्यक्षमतेवर परिणाम होणे यांचा समावेश होतो.
एक कारण म्हणजे माणूस निसर्गतः दिवसभर बसून राहण्यासाठी तयार झालेला नाही; परंतु तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आजकाल बहुतेक नोकर्या संगणकाच्या समोर बसून केल्या जातात. यामुळे सतत बसण्याचा वेळ वाढत गेला आहे. महत्त्वाचे म्हणजे, जितका वेळ बसून राहतो तितका आरोग्य धोक्यात येण्याचा धोका वाढतो. अनेक संशोधनांनुसार, दीर्घकाळ बसून राहण्याचे दुष्परिणाम धूम्रपानासारखेच घातक ठरू शकतात, असे दिसून आले आहे. सतत एकाच स्थितीत बसल्याने शरीराची ठेवण बिघडते. एका बाजूला झुकून बसणे, खांदे पुढे झुकवणे, पाय सरळ खुर्चीखाली लांब ठेवणे असे प्रकार यामध्ये दिसतात.
या चुकीच्या स्थितीमुळे शरीरावर कॉम्पेन्सेटरी स्ट्रेस निर्माण होतो. याचाच अर्थ शरीर चुकीच्या ठेवणीची ‘सवय’ करून घेते; पण या दडपणाचा परिणाम केवळ हिप जॉईंटपुरताच मर्यादित राहत नाही, तर तो पाठ, मान, खांदे, पाठीचा खालचा भाग अशा इतर भागांवरसुद्धा होतो.
सुरुवातीला ही वेदना फक्त स्नायूंमध्ये थकवा म्हणून जाणवते; पण जसजसे दिवस जातात, वेदना वाढते आणि ती होलिस्टिक आरोग्यावर परिणाम करू लागते, अशा स्थितीत काही प्रमाणात स्वतःच्या प्रयत्नाने आराम मिळू शकतो. चुकीची ठेवण दुरुस्त करणे, दर 45 मिनिटांनी खुर्चीवरून उठून चालणे, स्ट्रेचिंग किंवा बळकटीकरण व्यायाम किंवा हिपवर बर्फ ठेवणे यांसारखे उपाय प्राथमिक स्तरावर करू शकता; पण काही लक्षणे दीर्घकाळ दिसू लागल्यास वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
स्वतःच्या प्रयत्नाने वेदना कमी होत नसेल, पाय घसरत असेल किंवा हिपवर होणार्या वेदना पायापर्यंत, बोटांपर्यंत किंवा पोटाखाली पसरत असेल, मल-मूत्रासंबंधी अचानक बदल जाणवत असतील, चालणे, जिने चढणे किंवा वाकणे अशक्य होत असेल, ताप, अशक्तपणा किंवा अचानक वजन घटले असेल, तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हिप पेन म्हणजे प्रत्यक्ष हिप जॉईंटशी संबंधित स्नायू, लिगामेंटस् किंवा सांध्यांमधून निर्माण होणारी वेदना. यामध्ये हिप ऑस्टिओआर्थरायटिस, पॅगेटस् डिसीज, एव्हास्क्युलर नेक्रोसिस, फेमोरो-असिटाब्युलर इम्पिंजमेंट आणि फ्रॅक्चर नंतरच्या समस्या यांचा समावेश होतो. ही सामान्यतः नसांमध्ये सूज आल्याने होते. यामागे रुमेटॉईड आर्थरायटिस, सोरायटिक आर्थरायटिस, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस इत्यादी कारणेही असू शकतात; पण हा त्रास तुमच्या संपूर्ण शरीरासाठी गंभीर परिणाम घडवून आणतो.