राकेश माने
थायरॉईड विकार पुरुषांमधील आरोग्य समस्यांपैकी एक महत्त्वाची समस्या ठरत आहे. पुरुषांमध्ये थायरॉईडचे दोन प्रकार असतात. अतिसक्रिय थायरॉईड ग्रंथी ज्यामुळे हायपरथायरॉईड होतो; तर दुसरा प्रकार म्हणजे कमी सक्रिय थायरॉईड ग्रंथी ज्यामुळे हायपोथायरॉईड होतो.
थायरॉईड ग्रंथी शरीराचे चयापचय नियंत्रित करत असतात. त्यामुळे थायरॉईड ग्रंथींबरोबर येणार्या समस्यांमध्ये चयापचयाची गती मंदावणे किंवा ही गती वाढणे ही लक्षणे दिसतात. प्रतिकार क्षमता काम करत नसेल तर शरीरात थायरॉईड हार्मोन्समध्ये घट होणे किंवा वाढ होणे ही समस्या निर्माण होते. त्यामुळे रुग्णाच्या जीवनशैलीत असंतुलन निर्माण होते.
अति थकवा, सुस्ती येणे हे थायरॉईडचे एक लक्षण आहे. हृदय आणि नाडीचे ठोके मंद असणे हे देखील पुरुषांमधील थायरॉईडचे लक्षण आहे. अर्थात ही लक्षणे अस्पष्ट असतात. तसेच ती सर्वसामान्य असल्याने इतरही काही समस्यांमध्ये दिसून येतात. परिणामी थायरॉईडची समस्येचे लवकर निदान होत नाही.
हायपरथायरॉईडिझम चयापचयामध्ये वेगाने आणि अनियमित बदल घडवतो. त्यामुळे व्यक्तीला झोपण्यात त्रास, चिडचिड, बेचैनी अशाच प्रकारचे इतर त्रासही होतात. त्याचबरोबर व्यक्तीमध्ये नकारात्मक बदल होतात तसेच लक्ष केंद्रित करण्यात समस्या आदी दुष्परिणामही होतात. हायपरथायरॉईडिझमने ग्रस्त असल्यास शरीर गतिशील राहण्यास आवश्यक ऊर्जा मिळवण्यास शरीर असमर्थ ठरते. त्यामुळे शरीर थकल्यासारखी लक्षणे निर्माण होतात. हायपरथायरॉईडिझमने ग्रस्त काही पुरुषांमध्ये स्मरणशक्तीशी निगडित समस्यांची लक्षणे देखील पहायला मिळतात. स्मरणशक्ती कमजोर असणे, भ्रम होणे, नैराश्य जाणवणे ही देखील थायरॉईडशी निगडित लक्षणे आहेत. जास्त वयाच्या पुरुषांमध्ये ही लक्षणे सामान्यपणे दिसू शकतात. ज्या पुरुषांना थायरॉईड आहे त्यांच्या स्नायूंमध्ये वेदना, कंबर किंवा खांदे आखडणे आदी त्रास अनुभवास येऊ शकतात. एकूणातच सांधे कठीण होत जातात.
उपाय काय?
थायरॉईडचा कायमस्वरूपी असा उपचार होत नाही. रुग्णाला आयुष्यभर सकाळी अनशापोटी एक गोळी नियमित सेवन करावी लागते, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण आयुर्वेदाचार्यांच्या मते आहार नियंत्रण, व्यायाम आणि योगासने यामुळे थायरॉईडचा विकार वाढण्यापासून बचाव करू शकता. या आजारात शरीराला पोषक घटकांची गरज असते. त्यामुळे हिरव्या भाज्या, फळे जास्त प्रमाणात सेवन करावे. रुग्णांनी नियमितपणे थायरॉईडची तपासणी करावी.