आरोग्य

समस्या गंधहीनतेची | पुढारी

Pudhari News

डॉ. संजय गायकवाड

नाक ब्लॉक होणे किंवा नाकात अडथळा निर्माण होणे, हे वेगवेगळ्या कारणांमुळे होते. नाकाचे हाड वाढणे, नाकाचा पडदा वाकडा असणे, नाकपुड्यांमध्ये असणार्‍या उंचवट्यांना सूज येणे किंवा त्यांची वाढ होणे, नाकाच्या पोकळीमध्ये एखादी गाठ येणे, यासारख्या कारणांचा त्यामध्ये समावेश होतो. नाकाच्या मार्गात अडथळे आल्यामुळे श्‍वासोच्छ्वास घेण्यासही अडथळा येतो.

कुठल्याही गंधाचे अथवा वासाचे ज्ञान आपल्याला नाकाद्वारे होते. मोगर्‍याचा, रातराणीचा, अत्तराचा, उदबत्तीचा सुगंध आपण जसा चटकन ओळखतो, तसाच नकोसा वाटणारा तीव्र दर्पदेखील आपल्याला लगेच समजतो. गंध घेण्याचे आणि त्याची ओळख पटविण्याचे काम नाक करत असते. म्हणूनच, ज्ञानेंद्रियांमध्ये नाकाचाही समावेश होतो. नाकाची वास ओळखण्याची क्षमता सर्वात जास्त कुत्र्यांमध्ये असते. म्हणून, पोलिसदलात गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी प्रशिक्षित कुत्र्यांचा समावेश असतो. मानवामध्ये नाकाचे प्रमुख कार्य श्‍वासोच्छ्वास करणे आणि गंधज्ञान करणे हे आहे. सौंदर्याच्या दृष्टीनेदेखील नाकाला महत्त्व आहे. तसेच नाक हे शिराचे द्वारदेखील आहे. काही जणांना अतिशय दूरवरून कुठलाही वास चटकन ओळखता येतो. अशा व्यक्‍तींचे घ्राणेंद्रिय तीक्ष्ण आहे, असे आपण म्हणतो. मात्र, काही जणांना वासाचे ज्ञान चटकन होत नाही. गंध न कळण्याची कारणे कोणती, याबाबत आपण जाणून घेऊ; परंतु त्यासाठी आधी नाकाचे कार्य कोणते आणि कसे चालते, हे समजून घेऊ.

श्‍वसनकार्य : नाकाद्वारे श्‍वसन होते हे आपणाला माहितीच आहे. हे श्‍वसन व्यवस्थित होण्यासाठी नाकाची अंतर्गत रचना विशिष्ट प्रकारची असते. नाकाला आतून श्‍लेष्मल त्वचा असते. या त्वचेला असंख्य लोम म्हणजेच केस असतात. तसेच या त्वचेमध्ये ग्रंथी असतात. या ग्रंथी चिकट स्राव स्रवतात, तो स्राव नाकाच्या आतील केसांवर पसरतो. त्यामुळे नाकामध्ये प्रवेश करणारी हवा गाळली जाते. हवेमधील जंतू, धुळीचे कण केसांमुळे आणि त्यावरील चिकट स्रावामुळे अडविले जातात. या स्रावामुळे नाकामधल्या हवेत ओलावा आणला जातो. त्याला आर्द्रीकरण असे म्हणतात. अशा प्रकारे नाकातील हवेचे 80 टक्के आर्द्रीकरण केले जाते. आवश्यकतेनुसार नाकातील स्रावाचे प्रमाण कमी-जास्त केले जाते. या स्रावामध्ये लायसोसाईम नावाचे द्रव्य असते. यामुळे बॅक्टेरिया मारले जातात. नाकात असणार्‍या रक्‍तवाहिन्यांमुळे आत येणारी हवा गरम केली जाते. अशा प्रकारे आलेल्या हवेला शरीरात जाण्यायोग्य बनविण्याचे काम सुरुवातीला नाकाकडून होते. 

गंध ग्रहण करण्याचे कार्य : नाकाच्या आतील त्वचेवरचा 1/3 भागात गंध ग्रहण करण्याच्या पेशी असतात. नाकामध्ये आलेला गंध या पेशींमार्फत गंधनाडीकडून मेंदूपर्यंत जातो. मेंदूमधील गंध ग्राही केंद्रामुळे त्याची जाणीव होते आणि आपल्याला वासाचे ज्ञान होते; मात्र काही वेळा वासाचे ज्ञान कमी प्रमाणात होते, तर काही वेळा नाकाला हे ज्ञान अजिबात होत नाही. सुगंध, दुर्गंधदेखील समजत नाही. काही वेळा पेशंटला एखाद्या वासाचाच भास होतो आणि हा भास बहुतेक वेळा घाणेरडा असतो.

गंध न समजण्यामागची कारणे 

आपल्याला सर्दी होते तेव्हा त्याच्या तीव्रतेनुसार वास येत नाही किंवा वास येण्याचे कमी होते. काही वेळेला नाकाचे आजार वारंवार होतात. त्यामुळे नाकाची मूळ शक्‍ती कमी होऊ लागते. वर सांगितल्याप्रमाणे वासाचे ज्ञान होण्यासाठी असणार्‍या ग्रंथग्राही पेशी नाकाच्या वरच्या 1/3 भागात असतात. त्यामुळे नाकामध्ये खालच्या 2/3 भागात काही अडथळा निर्माण झाला असेल, तर वासाचे अणू-रेणु त्या वरच्या विशिष्ट भागात पोहोचत नाहीत. परिणामी, आपल्याला वास कळू शकणार नाही. नाक ब्लॉक होणे किंवा नाकात अडथळा निर्माण होणे, हे वेगवेगळ्या कारणांमुळे होते. नाकाचे हाड वाढणे, नाकाचा पडदा वाकडा असणे, नाकपुड्यांमध्ये असणार्‍या उंचवट्यांना सूज येणे किंवा त्यांची वाढ होणे, नाकाच्या पोकळीमध्ये एखादी गाठ येणे यासारख्या कारणांचा त्यामध्ये समावेश होतो. नाकाच्या मार्गात अडथळे आल्यामुळे श्‍वासोच्छ्वास घेण्यासही अडथळा येतो. नाकामध्ये अडथळा असणार्‍या या आजारांमुळे वास येत नाही. ज्यांना वारंवार आणि दीर्घकाळापासून सर्दीचा त्रास होत आहे किंवा अ‍ॅलर्जीमुळे वारंवार सर्दी होत आहे, नाकामधून खपल्या निघत आहेत, अशा व्यक्‍तींमध्येदेखील वासाचे ज्ञान कमी झालेले असते. जोराचा ठसका लागणारा धूर नाकात वारंवार गेल्याने बीडी, सिगारेट, तंबाखूचा धूर सतत नाकात जात असल्यास, अतिप्रमाणात तंबाखू खाण्याने किंवा तंबाखू मिश्रीने नाकाची वास घेण्याची क्षमता कमी होते. काही वेळा अनेक वर्षांपासून मधुमेह असल्यास शरीरातील नाड्यांचा दाह होतो. नाकांमधील वास घेण्याशी संबंधित वातनाडीचा असा दाह झाला तरी नाकाची वास घेण्याची क्षमता कमी होते. 

डोक्याच्या कवटीला त्या विशिष्ट ठिकाणी मार लागल्यास फ्रॅक्चर झाले असेल तरी नाकाला वास जाणवत नाही. काही वेळा आजारपणामुळे रुग्णाला त्याचा खराब वास येत असतो. दातांचा जंतू संसर्ग, कानामध्ये पू होणे, फुफ्फुसांमध्ये गवळे होणे, नाकात काही नको असणारे पदार्थ अडकणे, यामुळेदेखील नाकाला दुर्गंधी जाणवते. वृद्धावस्थेत तर सर्वच इंद्रियांची कार्यक्षमता कमी होते. कानाने कमी ऐकू येते. डोळ्यांना कमी दिसू लागते, तसेच नाकाद्वारे वास घेण्याची क्षमतादेखील कमी होते. किंवा नाकाला वास कमी जाणवू लागतो. 

नाकाला वास न जाणवणे हा काही गंभीर आजार नाही; पण तरी अशी तक्रार असेल तर त्यामागची कारणे ओळखून ती दूर करणे अधिक योग्य ठरू शकते. म्हणजे, नाकामध्ये अडथळा निर्माण झाला असेल, नकाचे हाड वाढणे, नाकातील आतल्या भगाला सूज येणे किंवा नाकामध्ये एखादी गाठ येणे, नाकातून खपल्या निघणे यापैकी कुठलाही त्रास असेल तर त्यावर उपचार करावे. नाकाचे आरोग्य आणि नैसर्गिकपण टिकवण्यासाठी नाकातून श्‍लेष्मल त्वचेतील केसांची क्रिया आणि आतील ग्रंथींचा स्राव योग्य असावा लागतो. नाकाच्या आतील त्वचा ओलसर असावी लागते. नाकातील त्वचा कोरडी पडली तर नाकातील केसांचे काम व्यवस्थित होत नाही. नाकाची आतली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी औषधी तेल किंवा तूप आतल्या बाजूला लावावे. आत यामुळे कोरडेपणा येत नाही आणि ग्रंथींची क्रिया योग्य प्रकारे होत राहते. नाक आणि नाकाच्या आजूबाजूचा भाग शेकल्यास तसेच वाफ घेतल्यास साठलेला कफ बाहेर काढणे सोपे जाते. नाकाची स्वच्छता करण्यासाठी आयुर्वेदात वेगवेगळे उपाय सांगितले आहेत. पाण्याऐवजी औषधांचा काढा वापरा, विशिष्ट औषधी द्रव्यांचे धूर नाकावाटे घ्यावे. यामध्ये दालचिनी, वेलची, तमालपत्र, नागकेशर यांचा धूर घेता येऊ शकतो. खूप अधिक कफ झाला असेल, तो वारंवार घशामध्ये येत असेल तर विशिष्ट औषधी देऊन उलटी करविण्याचादेखील उपाय करता येतो. गाईचे तूपदेखील नाकाच्या काही आजारात उपयोगाचे ठरते. काही विशिष्ट प्रकारची भस्म आणि आवळा, लवंग, वाळा, तुळस इत्यादीपासून बनविलेले औषधी चूर्णदेखील उपयोगाचे ठरते. अर्थात, त्यासाठी तज्ज्ञांचा सल्‍ला घेणे केव्हाही फायद्याचे ठरते. 

नाकाचे काही आजार असले तर काही ठरावीक प्रकारचे नियम पाळून हे त्रास नियंत्रणात ठेवता येतात. फार थंड हवेत न फिरणे, पाणी बदलत असेल (प्रवासात) तर त्याबाबत काळजी घेणे, दिवसा न झोपणे, रात्री जागरण न करणे, उष्णतेजवळ सतत काम न करणे, थंड पाण्यात न पोहणे यासारखे नियम उपयोगाचे ठरतात. तसेच आहारातदेखील चहा, कॉफी, आइस्क्रीम, थंड पदार्थ, खारट पदार्थ, तंबाखू, दारू, सिगारेट या गोष्टी वर्ज्य कराव्यात. पचन व्यवस्थित होईल, याकडे लक्ष द्यावे, जेवण ताजे गरम असावे, सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी नाकाला आतून गाईचे तूप लावावे. अशा प्रकारे योग्य ती काळजी घेतली तर नाकाच्या वेगवेगळ्या आजारांवर नियंत्रण राहू शकते आणि त्यामुळे निर्माण होणारी गंध न समजण्याची समस्यादेखील दूर होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT