डॉ. महेश प्रभू
१५ जुलै हा दिवस जगभरात 'जागतिक प्लास्टिक शस्त्रक्रिया दिन' म्हणून नुकताच साजरा झाला. विशेष म्हणजे या दिवसाची सुरुवात भारताने केली आहे. कारण 'प्लास्टिक' या शब्दाचा मूळ उगम ग्रीक भाषेतील ‘प्लास्टिकोस’ या शब्दापासून झाला असला तरी हे शास्त्र ग्रीकांनी नाव देण्यापूर्वीच, इसवी सनपूर्वी सहाव्या शतकात भारतात वापरात होते. पवित्र गंगेच्या काठावर महर्षी सुश्रुतांनी 'सुश्रुत संहितेत' नासिका पुनर्रचनेच्या (ऱ्हायनोप्लास्टी) रूपाने जगातील पहिल्या शस्त्रक्रियेची नोंद करून प्लास्टिक शस्त्रक्रियेचे तंत्र साकारले होते.
प्लास्टिक शस्त्रक्रिया ही केवळ सौंदर्य वाढवण्याचे साधन नसून हे शास्त्र हरवलेले किंवा निकामी झालेले अवयव परत मिळवून देण्याची कला आहे. अपघातात, भाजल्यामुळे, आजारपणामुळे किंवा जन्मजात आलेल्या उणिवा दूर करणे हे या शास्त्राचे मुख्य अंतरंग आहे. जन्मजात फटीसह जन्मलेल्या मुलांची शस्त्रक्रिया वेळेत न झाल्यास त्यांचे केवळ दिसणेच नाही, तर बोलणे, खाणे आणि मानसिक विकासही प्रभावित होतो. भाजलेल्या व्यक्तीची त्वचा योग्य उपचारांभावी आखडल्यास तिची हालचाल मर्यादित होते. त्यामुळे ही शस्त्रक्रिया अनेकदा जगण्याचा आणि सन्मानाचा प्रश्न असते.
अथांग विस्तार आणि सूक्ष्मशस्त्रक्रिया
कुठल्याही दुसऱ्या शस्त्रक्रियाशाखेला संपूर्ण शरीरावर अधिकार नसतो; परंतु प्लास्टिक सर्जन डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या तळव्यापर्यंत काम करू शकतात. यामध्ये पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया, हाताची शस्त्रक्रिया, कवटी-चेहऱ्याची शस्त्रक्रिया , लसीका संस्थेचे विकार आणि सौंदर्यशास्त्र अशा अनेक उपशाखांचा समावेश होतो.
गेल्या काही दशकांत 'सूक्ष्मशस्त्रक्रिया' ही या क्षेत्रातील सर्वात मोठी क्रांती ठरली आहे. यामध्ये सूक्ष्मदर्शकाखाली १ मिमी पेक्षाही बारीक रक्तवाहिन्या आणि नसा जोडून, विलग झालेले किंवा मशीनमध्ये चिरडलेले हात-बोटे पुन्हा जिवंत केली जातात. तसेच कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचा चेहरा किंवा अवयव पूर्ववत करण्याचे महत्त्वाचे कामही याद्वारे केले जाते.
सध्या समाजमाध्यमांनी आणि इंटरनेटवरील अर्धवट माहितीमुळे सौंदर्यशस्त्रक्रियेची क्रेझ कमालीची वाढली आहे. फिल्टर केलेल्या प्रतिमांमुळे अपेक्षांचे वास्तवहीन फुगे मोठे असतात. दुसरीकडे, या क्षेत्रात एंडोस्कोपी, फॅट ग्राफ्टिंग आणि सुरक्षित इम्प्लांट्स अशा आधुनिक तंत्रज्ञानाने नवे पंख दिले आहेत. मात्र, या वाढत्या मागणीसोबतच अपुऱ्या सुविधांच्या दवाखान्यात आणि अवघ्या काही दिवसांचे प्रशिक्षण घेऊन शस्त्रक्रिया करणाऱ्या अप्रशिक्षित हातांचा धोकाही वाढला आहे. एक सुप्रशिक्षित प्लास्टिक सर्जन होण्यासाठी सर्वोच्च पदवी मिळवून वर्षानुवर्षे घाम गाळावा लागतो.
जखम भरण्याचे विज्ञान आणि डाग पडण्याचे कारण हे सगळे संशोधन याच शास्त्राने जगाला दिले आहे. सामान्य शल्यचिकित्सक जेव्हा पोटाची जखम बंद करतो किंवा मधुमेहामुळे झालेल्या पायाच्या जखमांवर उपचार करतो, तेव्हा ते याच शास्त्राच्या प्रयोगशाळेत सिद्ध झालेल्या तत्त्वांचा वापर करत असतात. प्लास्टिक सर्जरी ही विज्ञानाचा कोट घातलेली एक त्रिमितीय कला आहे, जी मानवी शरीराला आणि रुग्णाच्या जगण्याला पुन्हा प्रतिष्ठेने जोडण्याचे काम करते आहे.