डॉ. संतोष काळे
कोलोनोस्कोपी ही मोठ्या आतड्याच्या (कोलन), मलाशय आणि गुदद्वाराच्या अंतर्गत भागाची तपासणी करणारी एक महत्त्वाची वैद्यकीय प्रक्रिया आहे.
अनेकदा रुग्ण कोलोनोस्कोपी या प्रक्रियेला घाबरतात; परंतु ज्यांनी ही तपासणी केली आहे, त्यांचा अनुभव असा सांगतो की, प्रत्यक्ष तपासणीपेक्षा त्यापूर्वी करावी लागणारी पूर्वतयारी अधिक कठीण असते.
कोलोनोस्कोपीची पूर्वतयारी म्हणजे संपूर्ण कोलन स्वच्छ करणे, जेणेकरून डॉक्टरांना तपासणीदरम्यान आतड्याचे अस्तर स्पष्टपणे पाहता येईल. या प्रक्रियेच्या एक दिवस आधी रुग्णाला घन आहार बंद करून केवळ पारदर्शक द्रव पदार्थांचे सेवन करावे लागते. त्यानंतर रुग्णाला तीव्र रेचक दिले जाते, ज्याचा उद्देश आतड्यांमधील सर्व साचलेला मळ बाहेर काढणे हा असतो.
पुढील काही तासांत या औषधामुळे वारंवार जुलाब होतात, जोपर्यंत शौचावाटे केवळ स्वच्छ पाणी बाहेर येत नाही. ही प्रक्रिया वेदनादायक नसली, तरी अत्यंत थकवणारी असते. वारंवार प्रसाधनगृहात जावे लागल्याने अस्वस्थता येते. तसेच यामुळे पोट फुगणे, मळमळणे आणि कधीकधी थंडी वाजणे असे त्रासही उद्भवू शकतात.
प्रत्यक्ष कोलोनोस्कोपी ही प्रक्रिया तुलनेने जलद आणि सुसह्य असते. रुग्णाला भूल किंवा गुंगी (डशवरींळेप) देऊन ही तपासणी केली जाते, त्यामुळे रुग्णाला वेदना जाणवत नाहीत.
अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या 2024-25 च्या अहवालानुसार, कोलोनोस्कोपीसारख्या नियमित तपासणीमुळे कोलोरेक्टल कॅन्सरच्या मृत्युदरात लक्षणीय घट झाली आहे. अमेरिकेत दरवर्षी सुमारे 1 कोटी 50 लाख कोलोनोस्कोपी केल्या जातात. 50 वर्षांवरील व्यक्तींमध्ये या तपासणीमुळे कर्करोगाचा धोका 40 टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच एक दिवसाचा त्रास सहन करणे हे भविष्यातील जीवघेण्या आजारापासून वाचण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
कोलोनोस्कोपी यशस्वी होण्यासाठी कोलन पूर्णपणे स्वच्छ असणे अनिवार्य आहे. आतड्यांमध्ये थोडाही मल शिल्लक राहिला, तर डॉक्टर लहान पॉलिप्स (गाठी) किंवा कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे पाहू शकणार नाहीत. यामुळे निदानामध्ये चूक होऊ शकते किंवा तपासणी पुन्हा करावी लागण्याची शक्यता निर्माण होते. स्वच्छ कोलनमुळे ही चाचणी अधिक सुरक्षित आणि अचूक होते, ज्यामुळे कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका वेळीच ओळखता येतो.