काही विशिष्ट कारणांमुळे अकाली वजन घटणे, शुक्रधातू कमी होणे, भिरुता, हातापायांत जोर नसणे असे घडू शकते. त्याकरिता म्हणजे मलप्रवृत्ती, अग्निबल, पचन, आहार, विहार, निद्रा, मैथून, श्रम, व्यसन, परिसर, पाणी अशा विविध घटकांचा पूर्ण विचार करावा लागतो.
(Physical Weakness)
सर्वसामान्यपणे भूक वा पचनाची काहीच तक्रार नसली तर सुवर्णमाक्षिकादिवटी, चंद्रप्रभा, शृंगभस्म आणि लक्ष्मीविलास गुटी प्रत्येकी तीन गोळ्या दोन वेळा घ्याव्या. त्यांचेबरोबर कुष्मांडपाक तीन चमचे, अश्वगंधापाक किंवा च्यवनप्राश दोन चमचे यांपैकी एक बल्य औषध घ्यावे.बुद्धी किंवा स्मरणशक्ती कमी झाल्यासारखी वाटत असल्यास ब्राह्यीप्राश आणि सोबत ब्राह्यीवटी तीन गोळ्या घ्याव्या. पचन ठीक नसेल तर भोजनानंतर पिप्पलादी काढा चार चमचे घ्यावा.
शुक्रक्षीणता आणि वजन घटणे या तक्रारींचे स्वरूप गंभीर असल्यस मधुमालिनीवसंत सहा गोळ्या, लक्ष्मीविलास आणि चंद्रप्रभा तीन गोळ्या, पुष्टिवटी एक गोळी अशा तेरा गोळ्या अश्वगंधा पाकाबरोबर दोन वेळा घ्याव्या. वार्धक्यामुळे वजन घटणे, शुक्रक्षय आणि घाबरेपणा आला असल्यास चंद्रप्रभा, शृंग आणि ब्राह्यीवटी प्रत्येकी तीन गोळ्या, च्यवनप्राश दोन चमचे रिकाम्या पोटी घ्यावा.
वार्धक्यामुळे वजन घटणे, शुक्रक्षय आणि घाबरेपणा आला असल्यास चंद्रप्रभा, शृंग आणि ब्राह्यीवटी प्रत्येकी तीन गोळ्या, च्यवनप्राश दोन चमचे रिकाम्या पोटी घ्यावा. जेवणानंतर पिप्पलादी काढा किंवा अश्वगंधारिष्ट चार चमचे समभाग पाण्याबरोबर घ्यावे. रात्रौ झोपताना निद्राकरवटी सहा गोळ्या आणि एक चमचा आस्कंदचूर्ण घ्यावे.
चंद्रप्रभा, अश्वगंधापाक, च्यवनप्राश, वसंतकुसुमाकर, सुवर्णमालिनीवसंत.
जेवताना आहाराकडे, चर्वणाकडे पूर्ण लक्ष द्यावे. दोन जेवणांमध्ये व्यवस्थित अंतर हवे. माफक व्यायाम, वेळेवर झोप याकडेही लक्ष हवे. झोपण्यापूर्वी फिरून येणे फायद्याचे आहे.
पथ्य : गहू, उडीद, मूग, वाटाणा, हरभरा, दही, कांदा, बटाटा, दूध, शेंगदाणे, खोबरे, गूळ, साखर, जेवणानंतर पाणी पिणे, सुकामेवा विशेषत: खारीक, जर्दाळू, खजूर, बदाम.
कुपथ्य : चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स, शिळे अन्न, फार खारट, आंबट आणि तिखट पदार्थ, मिरची, तंबाखू, विडी, सिगारेट, मशेरी, पानपराग, गुटखा, मद्यपान, रात्रौ उशिरा जेवण.
रसायनचिकित्सा : च्यवनप्राश, कुष्मांडकालेह, त्रिवंशभस्म, सुवर्णरावंग, द्राक्षासव.
योग आणि व्यायाम : किमान बारा सूर्यनमस्कार, जोर, बैठका, पोहणे, सकाळी आणि रात्री चालणे
चिकित्साकाल : तीन महिने.
निसर्गोपचार : माफक व्यायाम, वेळेवर आणि सावकाश जेवण, रात्रौ फिरून येणे, प्रार्थना, मग झोपणे.
अपुनर्भवचिकित्सा : शतावरी, आस्कंद, कावेरी, भुईकोहळा आणि चोपचिनी, प्रत्येकी समभाग आणि चवीपुरती सुंठपूड असे मिश्रण सकाळी आणि संध्याकाळी गाईच्या दुधाबरोबर घेणे.
संकीर्ण : नुसती टॉनिके खाऊन किंवा व्हिटॅमिन खाऊन अंगी लागत नाही. अग्निबल, पचन, आहाराचा दर्जा, वेळ, दातांचे चवर्णकार्य, वेळेवर झोप, किमान व्यायाम या सर्वांचा विचार व्हावा.
वैद्य विनायक खडीवाले