डॉ. संजय गायकवाड
पोटदुखी, उलट्या, नॉशिआ, शौचामधून रक्त पडणे, वेदनादायक पोटाची किंवा आतड्यांची हालचाल यापैकी कोणतीही लक्षणे आपल्याला जाणवत असली, तर आपल्याला पोटाचा अल्सर किंवा पेप्टिक अल्सर झाला असण्याची शक्यता असू शकते.
पोटात आतून व्रण पडण्याच्या स्थितीला पोटाचा अल्सर असे म्हटले जाते. समस्या वाढवल्यावर हे व्रण मोठे होतात आणि जखमा होतात. यामुळे जास्त समस्या होऊ शकते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी किंवा मसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे जेव्हा पोटात जास्त अॅसिड तयार होते, तेव्हा हा आजार होतो. यासोबतच पोटातील बॅक्टेरिया इन्फेक्शनमुळे ही समस्या होऊ शकते.
सतत बाहेरचे खाणे, ताण, धूम्रपान, मद्यपान ही पोटाचा अल्सर होण्याची मुख्य कारणे आहेत, असा काहीसा चुकीचा समज गेली काही वर्ष होता; पण पोटाचा अल्सर हा जंतूच्या संसर्गामुळे विशेषतः हेलिकोबॅक्टर पायलोरी या सूक्ष्म जंतूंमुळे होतो हे मान्य झाले आहे.
पोटाच्या 65 टक्के भागात हेलिकोबॅक्टर पायलोरीचा संसर्ग झाल्यामुळे अल्सर होतो. हृदयविकाराचा झटका किंवा लकवा टाळण्यासाठी नियमितपणे घेतली जाणारी काही औषधे किंवा आथ्राईटिससाठी घेतल्या जाणार्या गोळ्या या अल्सर होण्यास कारणीभूत ठरू शकतात. दाह होऊ नये म्हणून घेतल्या जाणार्या औषधांमुळेही पाचपेैकी दोन वेळा पोटाचे अल्सर होत असल्याचे समोर आले आहे. ज्येष्ठांमध्ये पोटाचा कर्करोग हा पोटाचा अल्सर स्वरूपातही असू शकतो.
काही वेळेला पोटाच्या अल्सरची काहीच लक्षणे दिसून येत नाहीत; पण काही अल्सरची वाईट लक्षणे दिसून येतात आणि त्यामुळे गंभीर परिणामही होतात. यामध्ये बरगड्यांच्या खाली दुखणे, अपचन, नॉशिया, पोट बिघडणे, उलट्या, वजन कमी होणे, उलटी किंवा संडास यांमधून रक्त पडणे, अशक्तपणाची लक्षणे, डोके हलके होणे आणि रक्तपात होणे यांमुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. ज्येष्ठांमधील पोटातील रक्तस्त्राव होऊन गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचा धक्काही बसू शकतो.
एंडोस्कोपी करून याची तपासणी करता येते. ज्यामध्ये थोडी भूल देऊन अन्ननलिकेच्या माध्यमातून एक पातळ लवचिक अशी ट्यूब पोटात घातली जाते. त्यामध्ये छोटासा कॅमेरा बसवलेला असतो, ज्याद्वारे पोटात अल्सर आहे का हे डॉक्टर पाहू शकतात. बेरियम मील या पद्धतीत पांढर्या रंगाचा द्रव पदार्थ रुग्णाला प्यायला देऊन एक्स रे काढला जातो. ही पद्धत हल्ली फार कमी वेळा वापरली जाते; पण एन्डोस्कोपी चाचणी उपलब्ध नसल्यास याचाही फायदा होतो. बायोप्सीमध्ये एन्डोस्कोपी करताना पेशींचा एक लहानसा नमुना घेतला जातो आणि तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जातो; पण ही तपासणी जर पोटाचा अल्सर किंवा गॅस्ट्रिक अल्सर आढळून आल्यास केली जाते. हेलिकोबॅक्टर पायलोरी या सूक्ष्म जंतूचा संसर्ग पोटात झाला आहे का, हे पाहण्यासाठी सी 14 नावाची श्वासाची चाचणी घेतली जाते.
प्रतिजैविके, शरीरातील आम्लाचे प्रमाण कमी करणे आणि जीवनशैलीतील काही बदल जसे बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळणे, धूम्रपान, मद्यपान बंद करणे या उपायांनी पोटाचा अल्सर किंवा पेप्टिक अल्सर यावर उपचार केले जाऊ शकतात.
पेप्टिक अल्सरमुळे वेदना तर होतातच शिवाय त्यामुळे आपल्याला अशक्तपणा येतो. अन्नसेवन करणे आणि आयुष्यातील इतर गोष्टींचा आनंद लुटणेदेखील शक्य होत नाही.