पोटात म्युकसचे चिकट थर असतात. अन्नाच्या पचनासाठी आवश्यक असलेले हायड्रोक्लोरीक आम्ल आणि पेप्सिन यांचा पोटाच्या त्वचेवर दुष्परिणाम होऊ न देण्याचे काम हे थर करतात. म्युकसचे थर आणि हायड्रोक्लोरीक आम्ल यांच्यातील सुसंवाद बिघडला की हायड्रोक्लोरिक आम्लाचा थेट पोटाच्या त्वचेवर परिणाम होऊ लागतो. सहसा अन्ननलिका, जठर आणि लहान आतडे यांना अल्सरचा त्रास होतो.
इसोफॅजियल अल्सर ः अन्ननलिकेला होणार्या अल्सरचे हे नाव आहे. या अल्सरचे प्रमाण कमी आहे.
गॅस्ट्रिक अल्सर ः जठराला होणारा अल्सर म्हणजे गॅस्ट्रिक अल्सर होय.
ड्युओडिनम अल्सर ः लहान आतड्याच्या वरच्या भागाला ड्युओडिनम म्हणतात. याला होणारा अल्सर या प्रकारात मोडतो. या अल्सरचे प्रमाण अधिक आहे.
एच पायरोली या बॅक्टेरियामुळे पेप्टिक अल्सर मोठ्या प्रमाणात होतो. मल आणि घाणेरडे पाणी यांच्याद्वारे याचा फैलाव होतो. पावसाळ्याच्या दिवसांत पाणी खराब होण्याचे आणि आजूबाजूला घाण पसरण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पावसाळ्यात या प्रकारचा अल्सर मोठ्या प्रमाणात झाल्याचे आढळते. या दिवसांत शरीराची हालचाल आणि त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्तीही कमी असते. चहा, कॉफी, तळलेले, मसालेदार पदार्थ खाणे यांमुळे या अल्सरच्या तीव्रतेत वाढ होते. स्वच्छता राखणे हा यावरचा प्रतिबंधक उपाय आहे.
पोटदुखी हे याचे प्रमुख लक्षण आहे. रिकाम्या पोटी पोट अधिक दुखते. पोटातील आम्ल अल्सरग्रस्त पेशीवर परिणाम करू लागल्यामुळे पोट दुखते. रात्री पोटातील जळजळ वाढते. काही वेळा रक्ताची उलटी होते. मळमळ होणे, मलाचा रंग गडद होणे, भुकेच्या प्रक्रियेत बदल होणे अशी याची लक्षणे असतात. हेलिकोबॅक्टर पायरोली या बॅक्टेरियाच्या फैलावामुळे हा अल्सर होतो. ताणतणाव, मधुमेह, आनुवंशिकता, दारू, कॉफी, तंबाखू अधिक प्रमाणात सेवन, हाडे ठिसूळ झाल्यामुळे घेतल्या जाणार्या औषधांचे दुष्परिणाम, दीर्घ काळ वेदनाशामके घेणे अॅस्प्रिन आणि जळजळरोधक औषधे घेणे यांमुळे अल्सर होतो.
पेप्टिक अल्सरमुळे अॅनिमिया आणि अधिक रक्तस्राव होतो. शिवाय दीर्घ काळ अल्सरचा त्रास झाला तर पोटाच्या किंवा आतड्याच्या कर्करोगाची शक्यताही वाढते. अंतर्गत रक्तस्रावामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. जठराच्या किंवा छोट्या आतड्याच्या भित्तिकेला छिद्रही पडू शकते. त्यामुळे आतड्यांना गंभीर संसर्ग होण्याची शक्यता असते. पेप्टिक अल्सरमध्ये जठराच्या ऊतींचेही नुकसान होऊ शकते. त्यामुळे अन्नाच्या पचनमार्गात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पोट लवकर भरणे, उलटी होणे आणि वजन कमी होणे यांसारखे दुष्परिणाम दिसू लागतात. म्हणून वेळेवर उपचार केले जाणे आवश्यक ठरते.