डॉ. प्राजक्ता गायकवाड
जगभरातील प्रत्येक आठ महिलांपैकी एका महिलेला प्रभावित करणार्या पीसीओएस या आजाराचे नाव आता बदलून पीएमओएस म्हणजेच पॉलीएंडोक्राईन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम असे करण्यात आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते हा बदल महिलांच्या आरोग्याकडे अधिक व्यापक आणि वैज्ञानिक द़ृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न आहे.
अनेक वर्षांपासून पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम या नावामुळे हा विकार फक्त अंडाशयांशी संबंधित आहे, असा गैरसमज तयार झाला होता. प्रत्यक्षात हा आजार शरीरातील हार्मोन्स, चयापचय प्रक्रिया, मानसिक आरोग्य, त्वचा आणि प्रजनन व्यवस्थेवर परिणाम करणारा गुंतागुंतीचा विकार आहे. पॉलीसिस्टिक हा शब्द दिशाभूल करणारा होता, कारण या विकारात नेहमीच सिस्ट तयार होतात असे नाही. त्यामुळे अनेक महिलांमध्ये योग्य वेळी निदान होत नव्हते आणि उपचारही अपुरे राहत होते. तब्बल 14 वर्षांच्या संशोधन, चर्चा आणि रुग्णांच्या अनुभवांनंतर या विकाराचे नवीन नाव स्वीकारण्यात आले आहे.
पीएमओएसमध्ये शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. विशेषतः अँड्रोजेन नावाच्या पुरुषी हार्मोन्सचे प्रमाण वाढल्याने मासिक पाळी अनियमित होणे, चेहर्यावर मुरुम येणे, अवांछित केस वाढणे किंवा केस गळणे अशा समस्या निर्माण होतात. काही महिलांमध्ये वजन झपाट्याने वाढते, तर काहींना मानसिक तणाव, नैराश्य किंवा आत्मविश्वास कमी होण्याचाही सामना करावा लागतो. याशिवाय हा विकार मधुमेह, हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढवणार्या चयापचय विकारांशीही संबंधित मानला जातो. या आजाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी अनुवंशिकता, लठ्ठपणा आणि इन्सुलिन हार्मोनमधील बिघाड यांचा त्यात मोठा वाटा असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढल्यास अंडाशयांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन जास्त होते आणि त्यामुळे अनेक लक्षणे दिसू लागतात.
पीएमओएसची लक्षणे प्रत्येक महिलेमध्ये वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे निदान करणे अनेकदा कठीण ठरते. किशोरवयीन मुलींमध्ये अनियमित मासिक पाळी आणि हार्मोन्सचे वाढलेले प्रमाण ही प्रमुख चिन्हे मानली जातात. काही महिलांना गर्भधारणेत अडचणी निर्माण होतात, कारण नियमित अंडोत्सर्जन होत नाही. त्यामुळे हा विकार महिलांमधील वंध्यत्वाचे प्रमुख कारण मानला जातो. मात्र, योग्य उपचार आणि जीवनशैलीतील बदलांमुळे अनेक महिला यशस्वीपणे मातृत्व अनुभवू शकतात.
पीएमओएसवर नियंत्रण मिळवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे. प्रक्रिया केलेले अन्न कमी खाणे, नियमित व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे आणि वजन नियंत्रणात ठेवणे यामुळे लक्षणांमध्ये मोठी सुधारणा होऊ शकते. याशिवाय इन्सुलिन नियंत्रित करणारी औषधे, हार्मोन्स संतुलित करणारे उपचार आणि काही विशेष औषधांचाही वापर केला जातो. मात्र, प्रत्येक महिलेची समस्या वेगळी असल्याने उपचारपद्धतीही वैयक्तिक गरजेनुसार ठरवली जाते. या नावबदलामुळे समाजात आणि वैद्यकीय क्षेत्रात या विकाराविषयी अधिक जागरूकता निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे. महिलांच्या आरोग्याकडे केवळ प्रजननाच्या द़ृष्टीने नव्हे तर संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या द़ृष्टीने पाहण्याची गरज या बदलामुळे अधोरेखित झाली आहे.