डॉ. आनंद ओक
ज्या आजारांवरील उपचार करताना त्यामधील आयुर्वेद औषधांची महती सामान्य माणसालादेखील पडली आहे, असा एक आजार म्हणजे अर्धांगवात. यालाच काहीजण अर्धांगवायू किंवा लकवा मारणे किंवा अर्ध्या अंगातून वारे जाणे, असेही म्हणतात.
सर्वसाधारणपणे अर्धांगवाताचे रुग्ण पाहिल्यानंतर काही गोष्टी लक्षात येतात, त्या म्हणजे अर्धांगवाताचा झटका आला. त्यामुळे डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले. त्यावेळी जरा सिरीयसच होते, पण नंतर ठीक झाले. अंगातून वारे गेल्याचे सांगून डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला. त्यानंतर आयुर्वेद उपचारांची सुरुवात होते. शहरी, सुशिक्षित भागात हे उपचार शास्त्रीयपणे केल्याचे आढळते. पण ग्रामीण, अशिक्षित भागात असे उपचार अनुभव या एकाच निकषावर कोठून तरी आणले जातात. कोणी काही वनस्पतीचा काढा देतो, कोणी एखाद्या गोळ्या, कोणी काही प्रकारची भस्मे देतो, तर कोणी विशिष्ट प्रकारचे तेल मालिश करायला सांगतो. काहीजण भोंदू वैद्यांकडून सुवर्णभस्म, रौप्यभस्म अशी मोठी नावे सांगून हजारो रुपयांना लुबाडले गेलेलेही पाहण्यात आहेत. अर्थात असे विविध उपचार हे सर्वस्वी निरुपयोगी असतात, असे नाही. पण निरुपयोगी नसले तरी पुरेसे नसतात, एवढेच आहे. मग असे का होते? आपल्याच देशाच्या आयुर्वेदशास्त्राने या विकारात कोणते उपचार आवश्यक असतात, हे सांगितले आहे. याची माहिती सामान्य माणसाला नसल्याने असे घडते. अर्धांगवात या विकारात मसाज करणे, शेकणे, नस्यकर्म (नाकात औषध टाकणे) विरेचन आणि जोडीला वातशामक औषधी प्रकृती, वय इ. चा विचार करून केलेला वापर आणि आवश्यक आहारातील बदल असे एकत्रित शास्त्रीय सांघिक आयुर्वेद उपचार केल्यास जास्त फायदा लवकर मिळतो.
'इंग्लिश औषधे सुरू असतील तर?' काही वेळा रक्तदाब, मधुमेह इ. विकारांसाठी इंग्लिश औषधे सुरू असल्यामुळे यांच्याबरोबर आयुर्वेद औषधी चालतील का? या शंकेमुळे किंवा 'एकत्रित औषधांचा' काही त्रास तर होणार नाही ना? या भीतीमुळे 'आयुर्वेद' उपचार घेणे टाळले जाते. वास्तविक, अशा रुग्णात अभ्यास करून रक्तदाब, मधुमेह इ. ची इंग्लिश औषधे चालू ठेवून जोडीला आयुर्वेदिक उपचार देता येतात. दुष्परिणाम होत नाहीत. उलट फायदाच होतो.
अर्धांगवाताची कारणे
आयुर्वेदानुसार हा वातविकार असल्याने वाताचा प्रकोप करणारी रूक्ष, लघू, कमी पोषक, पदार्थांचे अनियमित सेवन, अति कष्ट, सतत शरीरावर ताण, अति प्रवास, वेगधारण, चिंता, काळजी, दुर्बलता किंवा स्थूलपणा, डोक्यावर आघात, पाठीवर मार इ. कारणे अर्धांगवात उत्पन्न करतात. काहीवेळा शस्त्रकर्मानंतर मेनिजायटिस, मेंदूतील गाठ, पोलिओमुळेदेखील हा विकार झालेला आढळतो. आधुनिक शास्त्रामते रक्तात गाठ झाल्याने किंवा रक्तवाहिन्या भेदन झाल्याने मेंदूच्या भागात रक्तावरोध होऊन अर्धांगवात होतो.
अर्धांगवाताची लक्षणे
प्रत्येक व्यक्तीनुसार लक्षणे कमी अधिक वेगळी असतात. हाताला किंवा पायाला मुंग्या येणे, जड वाटणे, बधीरपणा, हालचाल करता न येणे, हात किंवा पाय लुळा पडणे, ताकद कमी वाटणे, संडास किंवा लघवीवर ताबा नसणे, काही वेळेला शुद्ध हरपणे तर काही वेळेला तोंड वाकडे होणे, चेहर्याच्या अर्ध्या बाजूला बधीरपणा, गिळता न येणे, बोलता न येणे, ठसका लागणे अशीदेखील असतात. काही रुग्णांच्या स्मरणशक्तीचीदेखील हानी होते. वरील लक्षणे काहीजणांना अचानकपणे जाणवू लागतात, तर काहींमध्ये क्रमाक्रमाने वाढत जातात.
शास्त्रीय आयुर्वेद उपचार
स्वेहन मसाज
आयुर्वेदातील शतावरी, अश्वगंधा, उडीद, दशमूळ, कवचबीन, बला, प्रसारिणी इ. विविध औषधांनी सिद्ध केलेली वेगवेगळी तेले पेशंटचे वय, प्रकृती, लक्षणे इ. चा विचार करून संबंधित हातपायाला आणि सर्वांगाला मसाज करणे, याला 'स्वेहन' म्हणतात. यामुळे संबंधित अवयवांची स्नायूंमधील व नाड्यांतील ताकद वाढून हळूहळू त्यामध्ये हालचाल सुरू होते. कार्यशक्ती वाढीस लागते.
स्वेदन/शेक देणे
लावलेले तेल जास्त मुरते. तसेच अवयवातील जखडलेपणा, जडपणा, बधीरपणा कमी होण्यास आणि सर्वांगातील वातप्रकोप कमी होण्यासाठी उपयोग होतो. यामध्ये आजाराच्या तीव्रता व व्याधीनुसार गरम पाण्याने शेकणे, वाफेने शेकणे, भाताने शेकणे, तेलाने शेकणे इ. प्रकार वापरले जातात.
विरेचन/पोट साफ ठेवणे
आयुर्वेद शास्त्राप्रमाणे अर्धांगवात या विकाराचा हा महत्त्वाचा उपचार आहे. विविध औषधींच्या साहाय्याने नियमित पोट साफ राहिल्यास फारच लवकर परिणाम मिळतो.
बस्ती
वाताचे प्रमाण जास्त असल्यास औषधी तेल अथवा काढा गुदद्वाराने आत सोडून बस्ती हा उपचार केला जातो.
नस्यकर्म
अर्धांगवाताचा प्रादूर्भाव चेहरा, डोळे, जीभ, घसा इ. ठिकाणी झाला असताना औषधी तेलाचे काही थेंब नाकात सोडून केल्या जाणार्या 'नस्य'कर्म या उपचाराचा जास्त उपयोग होतो, तसेच साधारण अर्धांगवातातही इंद्रियशक्ती वाढविण्यासाठी नस्यकर्म हा उपचार केला जातो. दशमूल, तिळतेल इ. च्या बस्ती प्रयोगाचाही खूप चांगला उपयोग होतो.
औषधी उपचार
शतावरी, अश्वगंधा, दशामूळ, गुग्गुळ, सुंठ, एरंड, कवचबीज इ. वनस्पतींनी आणि अभ्रकभस्म, माक्षिक, मंडुरभस्म, सुवर्णभस्म, रौप्यभस्म इ. भस्मांच्या साहाय्याने बनविलेले विविध संयुक्त कल्प, पेशंटची प्रकृती वय, इतर असणारे विकार, चालू असणारी इतर औषधे यांचा सर्वांगीण विचार करून वापरले जातात.
अर्धांगवात किंवा लकवा या आजारात वेळ न दवडता पदवीधर, शुद्ध आयुर्वेद तज्ज्ञाच्या सल्ल्याने शास्त्रीय आयुर्वेद उपचार सुरू करावेत. तसेच वर सांगितल्याप्रमाणे सांघिक एकत्रित उपचार देण्याचा आग्रह धरावा. असे केल्यास दुर्धर वाटणार्या अर्धांगवातावर विजय मिळवता येणे फारसे अवघड नाही.