डॉ. प्रिया पाटील
बर्याचदा सकाळी उठल्यावर टाच जमिनीवर टेकताना भयंकर वेदना होतात. पाय जमिनीवर टेकूच देत नाही. याचबरोबर टाचेजवळ प्रचंड वेदना आणि पायांची जळजळ होणे अशा तक्रारी आजकाल फारच दिसून येत आहेत. वेळीच उपचाराने त्यावर मात करता येते.
टाचेच्या हाडावर होणारी एका लहान हाडाची वाढ (बोन स्पूर) होय. ही वाढ सहसा हळूहळू होते आणि त्यामुळे टाचेत वेदना जाणवू शकते.
त्याची लक्षणे म्हणजेच टाचदुखी होय. ही लक्षणे स्त्री आणि पुरुष या दोघांमध्येही असतात; पण सर्वसाधारणपणे स्त्रियांमध्ये ती जास्त असतात. टाचेच्या वेदना याचे प्रमुख लक्षण असले, तरी संयोजक उतिकांना आलेली सूज ही टाचेखाली असलेल्या उतीच्या जाड बँडमुळे आलेली असते आणि त्यामुळे अतिशय तीव्र वेदना असतात.
पायाच्या स्नायूवर आलेला अतिरिक्त ताण हा प्रामुख्याने याचे प्रमुख कारण असते. तसेच प्लान्टर फॅसिटायटिस हेसुद्धा कॅल्केनियल स्परचे एक कारण असते. यामध्ये टाचेच्या हाडापासून बोटांपर्यंत पसरलेल्या संयोजक उतीला सूज येते, ज्यामुळे हाडाची वाढ होते.
इतर कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
योग्य फिटिंगचे चप्पल न वापरणे किंवा सपाट हिलचे चप्पल वापरणे.
जास्त वेळ किंवा बराच वेळ उभा राहून काम करणे.
जास्त वजन असणे, जुनाट संधिवात असणे, मधुमेहासोबत जास्त वजन असणे.
अशी कारणे टाचदुखीसाठी प्रामुख्याने बघायला मिळतात.
कधीकधी टाचेवर सूज राहणे व सूज बर्याच काळापर्यंत राहते.
डॉक्टरांकडून पायाची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पायाचा एक्स-रे करावा.
टाचेच्या हाड वाढण्याच्या निदानासाठी अल्ट्रासाऊंड किंवा एमआरआय तपासणीची क्वचितच गरज लागते. डॉक्टर या तपासण्या करायलासुद्धा क्वचितच सांगतात. कारण, एक्स-रेच्या तपासणीने बरेचदा आजाराचे योग्य निदान होते. रक्ताच्या तपासण्या, पेशंटचे वय, आजाराचे स्वरूप यावरूनही उपचाराची दिशा ठरते.
टाचेचे हाड वाढणे किंवा दुखणे हे वेदना कमी करण्याच्या औषधांनी तसेच योग्य काळजी घेतल्यानेही कमी होते. यासाठी
योग्य फिटिंगची चप्पल वापरावी.
अनवाणी, कठीण पृष्ठभागावर चालणे टाळावे. वजन जास्त असल्यास वजन कमी करावे.
उभे राहून जास्त वेळ स्वयंपाक किंवा इतर कामे करू नयेत.
टाचेच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया ही शक्यतो अंतिम उपाययोजना असते. ती आजाराच्या तीव्रतेवर अवलंबून राहते. वेळीच उपचार घ्यावेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नये.