डॉ. सम्यक पंचोली
मनगट आणि अंगठ्याच्या सांध्यापाशी अचानक सुरू होणारी ठणक आणि एखादी वस्तू पकडताना होणारी तीव्र वेदना ही ‘डी क्वर्व्हेन्स टेंडिनोसिस’ या वैद्यकीय स्थितीचा संकेत असू शकतो. अंगठ्याच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणाऱ्या स्नायूंबधांंच्या आवरणाला सूज आल्यामुळे ही स्थिती निर्माण होते.
हाताच्या अंगठ्यापाशी होणाऱ्या वेदनांचे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘डी क्वर्व्हेन टेनोसायनोव्हायटिस’ ही समस्या होय. मनगटाच्या बाजूला अंगठ्याच्या हालचालीसाठी कारणीभूत असलेल्या स्नायूंच्या नसांवर जेव्हा सूज येते, तेव्हा ही स्थिती उद्भवते. यामुळे साध्या दैनंदिन हालचाली करणेही रुग्णाला कठीण होऊन बसते.
या आजाराची लक्षणे प्रामुख्याने अंगठ्याच्या खालच्या भागातील मनगटावर केंद्रित असतात. यात अंगठ्याच्या मुळाशी सूज येणे, हालचाल करताना अडथळा जाणवणे किंवा काहीतरी अडकल्यासारखे वाटणे ही प्राथमिक लक्षणे आहेत. कधीकधी हालचाल करताना सांध्यातून ‘कडकड’ असा आवाजही येतो. वेळीच उपचार केले नाहीत, तर या वेदना हाताच्या कोपरापर्यंत पसरू शकतात.
वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहता आपल्या मनगटात अंगठ्याकडे जाणाऱ्या दोन महत्त्वाच्या नसा एका छोट्या बोगद्यासारख्या भागातून जातात. ज्यावेळी आपण सतत एकाच प्रकारच्या हालचाली करतो, तेव्हा या नसांच्या आवरणाला सूज येते. ही सूज वाढल्यामुळे नसांना त्या जागेतून मुक्तपणे हालचाल करणे कठीण जाते. सततच्या कामामुळे किंवा छंदांमुळे ही स्थिती उद्भवू शकते. उदाहरणार्थ, बागकाम करणे, खेळांमध्ये रॅकेटचा वापर करणे, तासन् तास टायपिंग करणे किंवा अगदी लहान मुलाला वारंवार कडेवर उचलून घेणे.
साधारणपणे तीस ते पन्नास वयोगटातील व्यक्तींमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा त्रास होण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच गरोदरपणात किंवा बाळंतपणानंतर शरीरातील संप्रेरकांच्या बदलांमुळे किंवा बाळाला सतत उचलल्यामुळे हा त्रास वाढू शकतो. याशिवाय संधिवात किंवा मनगटाला झालेली जुनी इजादेखील याला कारणीभूत ठरू शकते. निदानासाठी ‘फिंकेलस्टीन टेस्ट’ यांसारख्या शारीरिक चाचण्यांचा वापर डॉक्टर करतात. यामध्ये अंगठ्याची विशिष्ट हालचाल करून वेदनेची तीव्रता तपासली जाते. उपचार पद्धतीमध्ये सुरुवातीला ‘कन्झर्व्हेटिव्ह मॅनेजमेंट’ म्हणजेच विनाशस्त्रक्रिया उपचारांवर भर दिला जातो. यामध्ये मनगटाच्या हालचालींवर मर्यादा आणण्यासाठी ‘थम स्पायका स्प्लिंट’चा वापर अनिवार्य ठरतो.
अत्यंत गंभीर आणि जुनाट प्रकरणांमध्येच शस्त्रक्रिया अपरिहार्य ठरते. या शस्त्रक्रियेत स्नायूबंधांच्या आवरणावर असलेला ताण कमी करून त्यांना हालचालीसाठी जागा करून दिली जाते. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत प्रभावी ठरते आणि रुग्ण पुन्हा आपल्या दैनंदिन कामात सक्रिय होऊ शकतो. मात्र, हा त्रास पुन्हा उद्भवू नये, यासाठी कामाच्या स्वरूपात बदल करणे आणि मनगटावर अतिरिक्त ताण येणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
सुरुवातीला विश्रांती घेणे अत्यंत आवश्यक असते. वेदना देणाऱ्या हालचाली टाळणे, बर्फाने शेकणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने दाहशामक औषधे घेणे फायदेशीर ठरते. योग्यवेळी याकडे लक्ष दिले नाही, तर मनगटाची हालचाल कायमस्वरूपी मर्यादित होऊ शकते. त्यामुळे अंगठ्याच्या मुळाशी सतत वेदना होत असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे हिताचे ठरते.