डॉ. मनोज कुंभार
अतिविचार ही मानसिक विकृती म्हणून सुरू होत नाही. अनेकदा तो काळजी, जबाबदारी आणि स्वतःचे संरक्षण करण्याच्या सहज प्रवृत्तीपासून जन्माला येतो. एखादी घटना पुन्हा पुन्हा मनात घोळवणे, शक्य परिणामांचा अंदाज बांधणे, भविष्यातील धोके आधीच ओळखण्याचा प्रयत्न करणे, हे सारे सुरुवातीला योग्यच वाटते. पण हाच विचारांचा प्रवाह जेव्हा थांबत नाही, तेव्हा तो उपयुक्त राहत नाही, उलट मनाची ऊर्जा शोषून घेतो.
अतिविचाराने झोप कमी होते, लक्ष केंद्रित करणे कठीण जाते आणि अगदी साधे निर्णयही जड वाटू लागतात. अतिविचार कसा सुरू होतो हे समजून घेतल्याशिवाय तो कमी करणे शक्य होत नाही. मानवी मेंदूला अनिश्चितता आवडत नाही. अपूर्ण उत्तरे, न सुटलेले प्रश्न किंवा नियंत्रणाबाहेरील परिस्थिती यामुळे मेंदू सतत त्याच विचाराभोवती फिरत राहतो.
या अवस्थेत ताणतणावाशी संबंधित कॉर्टिसोलसारखी हार्मोन्स वाढतात. दीर्घकाळ ताण राहिल्यास मेंदूतील अमिग्डाला, म्हणजेच धोक्याची जाणीव करून देणारा भाग, अधिक सक्रिय राहतो. त्यामुळे तटस्थ परिस्थितीदेखील धोकादायक भासू लागते. अधिक विचार केल्याने समस्या सुटेल, असा भ्रम निर्माण होतो; प्रत्यक्षात मात्र कोणतीही नवी दिशा मिळत नाही.
अतिविचार शब्दांआधी शरीरात जाणवू लागतो. खांद्यांतील ताण, जबडा घट्ट होणे, श्वास उथळ होणे, ही त्याची सुरुवातीची लक्षणे असतात. या संकेतांकडे लक्ष दिल्यास विचारांची साखळी वेळीच थांबवता येते. केवळ एका मिनिटासाठी श्वास संथ केल्यास मेंदूला सुरक्षिततेचा संदेश मिळतो आणि ताणाची तीव्रता कमी होते. अनेकदा मन शांत होण्याआधी शरीराला शांत करणे आवश्यक ठरते.
अतिविचार बहुतेकदा ‘काय झालं तर?’ अशा प्रश्नांवर पोसला जातो, ज्यांना शेवट नसतो. अतिविचार हा दोष नसून तो एक संकेत आहे. विश्रांतीची गरज, आश्वासनाची अपेक्षा किंवा स्पष्टतेचा अभाव, याकडे तो निर्देश करतो. स्वतःवर कठोर होण्याऐवजी समजूतदार द़ृष्टी ठेवली तर मानसिक ताण कमी होतो. संशोधन सांगते की सौम्य आत्मसंवादामुळे तणाव कमी होतो आणि भावनिक संतुलन सुधारते. विचार पुसून टाकणे हे उद्दिष्ट नसून, त्यांना संतुलित प्रतिसाद देणे हेच खरे मानसिक स्वास्थ्य आहे.