Overthinking and Hidden Anger: अनेकांना वाटतं की राग व्यक्त करणं म्हणजे मोठ्याने ओरडणं, भांडण करणं किंवा नाराजी व्यक्त करणं. पण प्रत्येकजण राग अशाच पद्धतीने व्यक्त करत नाही. काही लोक शांत राहतात, समोरच्याशी थेट वाद घालत नाहीत; मात्र सतत टोमणे मारणे, मुद्दाम दुर्लक्ष करणे, कौतुक न करणे किंवा उपरोधिक बोलणे अशा वागणुकीतून ते आपला राग व्यक्त करत असतात, यामुळे नात्यांवर नेमका काय परिणाम होतो? राग आला तर काय करायचं? हे जाणून घेऊया समुपदेशक आणि 'जिज्ञासा काऊन्सेलिंग'च्या सहसंचालक डॉ. अनुजा कुलकर्णी यांच्याकडून. त्यांनी नुकतीचं 'The Odd Even' या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे.
त्यांच्या मते, टोमणे मारणे ही राग व्यक्त करण्याची अप्रत्यक्ष पद्धत आहे. अनेकदा व्यक्तीला समोरच्याबद्दल नाराजी असते, पण ती थेट सांगण्याऐवजी उपरोधिक बोलणे, मुद्दाम दुर्लक्ष करणे किंवा छोट्या-छोट्या गोष्टींवरून तिरकस प्रतिक्रिया देणे हा मार्ग निवडला जातो.
कामाच्या ठिकाणी किंवा वैयक्तिक आयुष्यात अशा प्रकारचे वर्तन अनेकदा दिसून येते. उदाहरणार्थ, एखाद्या सहकाऱ्याचा राग आल्यावर त्याच्या ई-मेलला उत्तर न देणे, त्याच्या चुका इतरांसमोर मुद्दाम दाखवून देणे, बैठकीत त्याच्या मताला विरोध करणे किंवा चांगले काम करूनही त्याचे कौतुक न करणे, ही सर्व अप्रत्यक्ष रागाची उदाहरणे आहेत.
डॉ. कुलकर्णी सांगतात की, अशा प्रकारे राग व्यक्त केल्याने काही क्षण समाधान मिळाल्यासारखे वाटू शकते; मात्र त्यामुळे मूळ समस्या सुटत नाही. उलट समोरच्या व्यक्तीलाही हा टोमणा किंवा उपरोध असल्याचे जाणवते आणि नात्यांमध्ये विश्वास कमी होऊ लागतो.
आजच्या धकाधकीच्या जीवनात ओव्हरथिंकिंग ही मोठी मानसिक समस्या बनत आहे. एखादा विचार सतत मनात फिरत राहणे, त्यावर कृती न करता फक्त त्याचाच विचार करत राहणे आणि त्यातून नकारात्मक भावना वाढत जाणे, यालाच ओव्हरथिंकिंग म्हणतात. अशा अवस्थेत व्यक्ती एकाच गोष्टीचा वारंवार विचार करत राहते. त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता कमी होते आणि मनावर अनावश्यक ताण वाढतो.
ओव्हरथिंकिंगचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे 'डिसिजन पॅरालिसिस'. म्हणजेच व्यक्तीला योग्य निर्णय घेता येत नाही. प्रत्येक निर्णयाबाबत शंका निर्माण होते आणि त्यामुळे अनेक संधी हातातून निघून जातात. छोट्या-छोट्या गोष्टींसाठीही जास्त विचार करण्याची सवय व्यक्तीला मानसिकदृष्ट्या थकवते. परिणामी आत्मविश्वास कमी होतो आणि कामाचा वेगही मंदावतो.
मनात सतत राग, नाराजी किंवा गैरसमज साठून राहिल्यास त्याचा परिणाम नात्यांवर होतो. अनेकदा व्यक्ती थेट संवाद टाळते आणि टोमणे, उपरोध किंवा शांततेतून नाराजी व्यक्त करू लागते. यामुळे गैरसमज वाढतात, संवाद कमी होतो आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. काही वेळा ही भावना सूड घेण्यापर्यंत पोहोचू शकते, जी मानसिक आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.
तज्ज्ञांच्या मते, एखादी गोष्ट खटकत असेल तर ती स्पष्ट आणि शांतपणे सांगणे हा सर्वात योग्य मार्ग आहे. "तुझ्या या कृतीमुळे मला त्रास होतो" किंवा "हे वेगळ्या पद्धतीने करता येईल का?" अशा स्वरूपाचा संवाद नातेसंबंध टिकवण्यासाठी अधिक प्रभावी ठरतो. त्याऐवजी सतत टोमणे मारणे किंवा खवचट बोलणे यामुळे समस्या वाढतात.
मानसिक ताण कमी करण्यासाठी तज्ज्ञ काही सोपे उपाय सुचवतात. दिवसभरातील ठराविक वेळ फक्त विचार करण्यासाठी राखून ठेवणे, याला 'बकेटिंग' तंत्र म्हणतात. त्यामुळे उर्वरित वेळेत कामावर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. याशिवाय, फक्त विचार करत बसण्याऐवजी छोट्या कृतींना सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. निर्णय घेण्याची सवय लावल्यास आत्मविश्वास वाढतो आणि ओव्हरथिंकिंग कमी होते.
स्वतःच्या आणि इतरांच्या चुका स्वीकारणे, माफ करायला शिकणे आणि भूतकाळातील घटना सतत मनात न ठेवणे हे मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. राग मनात साठवून ठेवण्यापेक्षा तो योग्य पद्धतीने व्यक्त करणे अधिक फायदेशीर ठरतं.
ओव्हरथिंकिंग, सततचा राग किंवा मानसिक ताण दीर्घकाळ जाणवत असेल आणि त्याचा दैनंदिन आयुष्यावर परिणाम होत असेल, तर मानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशकांची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नये. तज्ज्ञांच्या मते, वेळेवर योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ओव्हरथिंकिंगवर नियंत्रण मिळवता येते, नातेसंबंध सुधारता येतात आणि मानसिक आरोग्य अधिक चांगलं ठेवता येतं.