अलिकडील काळात बद्धकोष्ठतेचा त्रास अनेकांना होताना दिसत आहे. ढोबळमानाने जड अन्नपदार्थांचे सेवन, पचनशक्ती कमकुवत असणे यासारखी कारणे सर्वसामान्यांनाही माहीत असतात. पण, याशिवायही काही कारणांनी बद्धकोष्ठतेची समस्या भेडसावू शकते.
(Constipation Causes)
डॉ. संजय गायकवाड
थायरॉईड : घशात जी फुलपाखराच्या आकारातील ग्रंथी असते त्यामधून शरीरात विशेष स्त्राव स्त्रवतात. यामुळे शरीरातील पेशी योग्य प्रकारे आपले कार्य करू शकतात. शरीराला ऊर्जा मिळते. तसेच पचन क्रियाही चांगली राहते. हायपोथायरॉइडिजममध्ये या ग्रंथीच्या कार्यात बिघाड होऊन बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते.
औषधांचे अतिसेवन : काही लोक औषधांचे सेवन अधिक करतात. वेदनाशामक गोळ्या, अॅलर्जीची औषधे, लोहाच्या कॅप्सुल, कॅल्शिअम आणि रक्तदाब या औषधांमुळे बद्धकोष्ठतेची समस्या भेडसावू शकतो. त्यासाठी घरगुती उपाय न करता ताबडतोब डॉक्टरी सल्ला घ्यावा.
मानसिक ताण : मानसिक ताण असल्यास व्यक्ती सतत विचारात राहते. योग्य आहार न घेतल्याने व्यायाम किंवा शारीरिक हालचालीपासून दूर राहिल्याने हळूहळू आरोग्य बिघडते. त्यामुळे पचनासंबंधीच्या समस्या निर्माण होतात. जेवण सहजपणे पचत नाही. त्यामुळे मानसिक तणावग्रस्त व्यक्तीलाही बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. त्यापासून बचाव करण्यासाठी मानसिक आजार किंवा मानसिक ताण यावर उपचार घेणे महत्त्वाचे असते.
इरिटेबल बाऊल सिंड्रोम : इरिटेबल बाऊल सिंड्रोम हा मोठ्या आतड्याशी निगडीत आजार आहे. या आजाराची लक्षणे खूप काळांनंतर शरीरात दिसून येतात; पण त्याचा परिणाम मात्र संपूर्ण पचन क्रियेवर पडत असतो. यामध्येही पोट नीट साफ न झाल्याने बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते.