डॉ. निखिल देशमुख
आपल्या दैनंदिन आरोग्य सवयींपैकी एक अत्यंत दुर्लक्षित बाब म्हणजे तोंडाचे आरोग्य. आजही आपल्या समाजामध्ये मौखिक आरोग्याकडे केवळ सौंदर्य आणि श्वासाचा वास एवढ्यापुरते मर्यादित पाहिले जाते; मात्र तोंडाच्या स्वच्छतेचा संबंध केवळ दातांच्या किंवा हिरड्यांच्या विकारांशी मर्यादित राहिलेला नाही. अलीकडच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे की, तोंडाच्या आरोग्याचा थेट संबंध कर्करोगाच्या आजाराशी आणि रुग्णाच्या दीर्घायुष्याशी जोडलेला आहे.
तोंडात आढळणारे पॉर्फिरोमोनास जिन्जिवालिस आणि प्रेवोटेला इंटरमीडिया यांसारखे काही विशिष्ट प्रकारचे हानिकारक जीवाणू हे केवळ दात आणि हिरड्यांचे आजार वाढवतात असे नाही, तर ते शरीरामध्ये गंभीर आजारांचा धोका निर्माण करतात. या जीवाणूंच्या सततच्या संपर्कामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो, तसेच या रोगांचा परिणाम रुग्णाच्या एकूण जीवनमानावर, आजारमुक्त होण्याच्या कालावधीवर आणि मृत्यूदरावर होतो.
जगभरातील विविध संशोधनांमधून असे स्पष्ट झाले आहे की, तोंडाच्या आरोग्याची योग्य निगा राखणार्या व्यक्तींमध्ये विशेषतः डोके व मान परिसरातील कर्करोग होण्याचा धोका तुलनात्मकद़ृष्ट्या कमी दिसून आला आहे. गेल्या काही वर्षांत नियमितपणे दातांच्या तपासणीसाठी जाणार्या व्यक्तींमध्ये कर्करोगामुळे होणार्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाल्याचेही नोंदले गेले आहे. कर्करोग झाल्यावर रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय उपचारांसाठी लाखो रुपये खर्च करतात. मात्र, तोंडाच्या स्वच्छतेची नीट काळजी घेतली, तर केवळ या गंभीर आजारापासून बचाव होतो असे नाही, तर सरकारच्या आरोग्य व्यवस्थेवर येणारा आर्थिक भारही कमी होतो. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोरणात तोंडाच्या आरोग्यासाठी विशेष जागा असणे गरजेचे आहे.
तोंडाच्या आरोग्यासाठी फक्त डॉक्टरकडे तपासणी एवढ्यावर समाधान न मानता समाजस्तरावर काही मूलभूत पावले उचलणे आवश्यक आहे. यामध्ये शाळांमध्ये नियमितपणे दात घासण्याचे उपक्रम राबविणे, मोफत टूथब्रश व टूथपेस्ट वाटप करणे, शिक्षक व पालक यांना या सवयींबाबत जागरूक करणे या गोष्टींचा समावेश होतो. लहान वयात घडणार्या सवयी आयुष्यभर टिकतात. त्यामुळे शालेय पातळीवर अशा उपक्रमांची अत्यंत गरज आहे.
मौखिक आरोग्याच्या द़ृष्टीने तोंड धुण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या पाण्याच्या तपासण्या (माऊथरिन्स चाचणी) उपलब्ध करून देणे, पेरिओडोंटल आजार लवकर ओळखण्याची सोय करणे यासारख्या उपाययोजना राबविता येतील.
अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, साखरयुक्त पदार्थांवरील पोषणमूल्य व सूचनांबाबत स्पष्ट इशारे देणे, लहान मुलांना आकर्षित करणार्या जाहिरातींवर निर्बंध घालणे यासारख्या धोरणात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. कारण, साखरयुक्त पदार्थ फक्त दातांचे नुकसान करत नाहीत, तर दीर्घकाळ त्याचा परिणाम संपूर्ण शरीराच्या आरोग्यावर होतो.