आरोग्य

Obesity : उतारवयातील लठ्ठपणा कमी करणारे संयुग

मोनिका क्षीरसागर

न्यूयॉर्क : लठ्ठपणा असेल तर लोक पूर्वी 'खाते पिते घर के लोग' अशा सकारात्मक द‍ृष्टीनेच पाहत असत. शरीर गुटगुटीत असणे एक प्रकारे चांगलेच लक्षण मानले जाई. मात्र, कालौघात लठ्ठपणा ही एक समस्या असून त्यामुळे हृदयविकार, मधुमेह यासारख्या आजारांना आयतेच आवतण मिळते हे समजू लागल्यावर लोकांचा द‍ृष्टिकोण बदलला आणि तंदुरुस्तीबाबत लोक जागरूक होऊ लागले. याबाबत नवे नवे संशोधनही होत आहे. आता एका नव्या संशोधनातून दिसून आले की 'बीएएम 15' नावाचे रासायनिक संयुग वाढत्या वयातील लठ्ठपणा किंवा चरबीच्या ऊतींमधील वाढीमुळे उतारवयात होणारी स्नायूंची हानी टाळू शकते.

या संशोधनातील निष्कर्ष 'जर्नल ऑफ कॅशेक्सिया, सारकोपेनिया अँड मसल' या वैद्यकशास्त्राशी संबंधित घडामोडींच्या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. 'इंटिग्रेटेड फिजिओलॉजी अँड मॉलेक्युलर मेडिसिन लॅबोरेटरी' या संस्थेतील संशोधक डॉ. वॅग्‍नर डांट्स यांनी लिहिलेल्या शोधनिबंधात हे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. वृद्ध, लठ्ठ उंदरांची चरबी आणि त्यांचे वजन कमी करण्यास तसेच स्नायू बळकट करण्यास, वयाशी संबंधित दाह कमी करण्यास आणि शारीरिक क्रिया वाढविण्यास मदत करणारी संयुगे संशोधकांनी शोधून काढली आहेत.

लठ्ठपणा असलेल्या तरुण प्रौढांमध्ये स्नायूंचे वस्तुमान कमी होणे ही चिंतेची बाब नसते. तथापि, वयानुसार मात्र त्यामध्ये बदल होतो. वाढलेल्या वयाबरोबर आलेला लठ्ठपणा वृद्धांच्या स्नायूंचे नुकसान करतो. त्यांच्यामधील सक्रियता कमी होते. परिणामी, शरीर सावरताना अडचण येणे, पक्षाघात, हृदयविकार अशा समस्या संभवतात. तसेच अकाली मृत्यूचा धोकाही वाढतो. त्यामुळे वाढत्या वयातील वजन कमी करण्यास, स्नायूंची शक्‍ती वाढवून सक्रिय ठेवण्यास 'बीएएम 15' सारखी रासायनिक संयुगे उपयोगी ठरतील, असे या अभ्यासात म्हटले आहे.

कोल्हापूरच्या शाहू मिलमध्ये चित्र-शिल्पातून दिला जातोय शाहू विचारांना उजाळा | शाहू कृतज्ञता पर्व

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT