Obesity & Vaginal Infections | लठ्ठपणामुळे वाढू शकतो योनीमार्ग संसर्गाचा धोका 
आरोग्य

Obesity & Vaginal Infections | लठ्ठपणामुळे वाढू शकतो योनीमार्ग संसर्गाचा धोका

urinary infection

पुढारी वृत्तसेवा

डॉ. अपर्णा गोविल भास्कर

लठ्ठपणा ही दीर्घकालीन आरोग्य समस्या असून त्याचा परिणाम हृदय, यकृत, सांधे, मूत्रपिंड आणि शरीरातील अनेक अवयवांवर होतो. मात्र, महिलांच्या योनी व जननेंद्रियांच्या आरोग्यावर होणारा लठ्ठपणाचा परिणामीकडे दुर्लक्ष केले जाते.

योनीमार्गामध्ये नैसर्गिकरीत्या हा भाग स्वच्छ ठेवणारे चांगले बॅक्टेरिया कार्यरत असतात. लॅक्टोबॅसिलस या चांगल्या जीवाणूंची संख्या या संतुलनासाठी महत्त्वाची असते. हे जीवाणू योनीमार्गाला विविध संसर्गांपासून संरक्षण देण्यास मदत करतात. मात्र, लठ्ठपणाशी संबंधित काही घटकांमुळे हे नैसर्गिक संतुलन बिघडते. शरीराच्या वाढलेल्या वजनामुळे आपली मांडी आणि त्वचेला पडणाऱ्या घड्यांमध्ये घाम व ओलावा अधिक प्रमाणात साचू शकतो. त्यामुळे बुरशी आणि काही प्रकारच्या जीवाणूंच्या वाढीस पोषक असे ऊबदार आणि ओलसर वातावरण तयार होते.

लठ्ठपणाचा इन्सुलिन रेझिस्टन्स आणि टाईप-२ मधुमेहाशीही जवळचा संबंध आहे. रक्तातील साखरेची पातळी वाढलेली असेल, मधुमेह नियंत्रणात नसेल, तर वारंवार होणाऱ्या यीस्ट इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. याशिवाय लठ्ठपणाशी संबंधित हार्मोनल आणि शरीरातील दाहजन्य बदलांमुळेही काही महिलांमध्ये योनीतील नैसर्गिक वातावरणावर परिणाम होऊन संसर्गाची शक्यता वाढू शकते.

* वारंवार योनीमार्गात संसर्ग होत असल्यास महिलांना पुढील लक्षणे जाणवू शकतात:

* सतत खाज येणे किंवा जळजळ होणे.

* योनीच्या बाहेरील भागात लालसरपणा किंवा सूज येणे.

* लघवी करताना जळजळ होणे.

* योनीमार्गातून नेहमीपेक्षा वेगळा असामान्य असा स्राव होणे, काही वेळा हा स्राव दुर्गंधीयुक्त असू शकतो.

* लघवी करताना किंवा लैंगिक संबंधांदरम्यान वेदना होणे. ही लक्षणे वारंवार होत असतील किंवा उपचार घेतल्यानंतरही पुन्हा उद्‌भवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

निरोगी वजन राखणे आणि वजन कमी करणे यामुळे शरीराचे चयापचयाशी संबंधित आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि वारंवार होणाऱ्या संसर्गाचा धोका कमी होण्यास हातभार लागतो.

संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि मधुमेह असल्यास रक्तातील साखरेचे प्रभावी नियंत्रण हे दीर्घकालीन आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

यासोबतच जननेंद्रियांचा भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवावा. ओले कपडे किंवा व्यायामाचे कपडे घामाने ओले झाल्यानंतर त्वरित बदलावेत. हवा खेळती राहील असे सुती अंतर्वस्त्र वापरावे आणि दीर्घकाळ खूप घट्ट कपडे घालणे टाळावे. सुगंधी साबण, स्प्रे किंवा जननेंद्रियांसाठी वापरली जाणारी सुगंधी उत्पादने नियमितपणे वापरू नयेत. संसर्गाची लक्षणे वारंवार किंवा दीर्घकाळ राहिल्यास स्वतःहून वारंवार औषधोपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरगुती उपाय करू नयेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT