Blood Pressure
नवी दिल्ली: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत 'हाय ब्लड प्रेशर' (उच्च रक्तदाब) हा एक 'सायलेंट किलर' बनला आहे. एकदा बीपीची गोळी सुरू झाली की ती आयुष्यभर घ्यावी लागते, असा आजवरचा समज आणि अनुभव आहे. मात्र, आता या त्रासातून कायमची सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शास्त्रज्ञांनी अशा एका क्रांतिकारी औषधाचा शोध लावला आहे, ज्यामुळे रुग्णाला रोज गोळी घेण्याची गरज उरणार नाही; वर्षातून केवळ दोन इंजेक्शन्स घेऊन रक्तदाब नियंत्रित ठेवता येईल.
जगप्रसिद्ध नियतकालिक 'द लँसेट' मध्ये या संशोधनाचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले आहेत. 'द न्यू ड्रग थेरपीज फॉर हायपरटेन्शन' या नावाने प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासामध्ये 'जिलेबेसरान' या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या यशस्वी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
हे नवीन औषध 'स्मॉल इंटरफिअरिंग आरएनए' या प्रगत तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजेक्शन यकृतातील 'अँजियोटेन्सिनोझेन' या घटकाचे उत्पादन रोखते. हा घटक शरीरातील रक्तदाब वाढवण्यासाठी मुख्यत्वे जबाबदार असतो. प्राथमिक चाचण्यांनुसार, त्वचेखाली दिलेले हे एक इंजेक्शन पुढील सहा महिन्यांपर्यंत रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास सक्षम आहे. म्हणजेच वर्षातून फक्त दोन वेळा हे इंजेक्शन घेतल्यास रोजच्या गोळ्यांपासून मुक्ती मिळू शकते.