आरोग्य

सेरेब्रल पाल्सीबद्दल हवी जागरुकता

दिनेश चोरगे

सेरेब्रल पाल्सी ही मुलांमध्ये आढळणारी एक न्यूरोलॉजिकल समस्या आहे. या विकारामुळे स्नायूंच्या हालचालीवर मर्यादा येतात. जन्मापूर्वी, बाळाच्या जन्मादरम्यान किंवा जन्मल्यानंतर सुरुवातीच्या काळात मेंदूला झालेल्या अपघातामुळे त्याचा परिणाम होतो.

सेरेब्रल पाल्सीची नेमकी कारणे स्पष्ट झालेली नाहीत. बाळाच्या मेंदूला संसर्ग किंवा ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने, प्रसूतीदरम्यान गुंतागुंतीमुळे बाळाच्या जन्मापूर्वी, दरम्यान किंवा नंतर मेंदूवर परिणाम होतो. अकाली जन्म किंवा कमी वजन यासारख्या इतर परिस्थिती देखील सेरेब्रल पाल्सी विकसित होण्याच्या जोखमीशी संबंधित आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये आनुवंशिक घटकांचा समावेश नसतो. सेरेब्रल पाल्सीची विविध कारणे समजून घेतल्यास तसेच वेळीच निदान झाल्यास मुलांचे भविष्य सुधारण्यासाठी, प्रतिबंधात्मक उपाय अवलंबविण्यासाठी महत्त्वाचे ठरते.

काही लक्षणांमध्ये अ‍ॅटॅक्सियाचा समावेश होतो, ज्यात स्नायूंच्या समन्वयात अडचण येते. सेरेब्रल पाल्सीमुळे स्नायूंचा कडकपणा किंवा ताठरता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण होते. आणखी एक लक्षण म्हणजे स्पॅस्टिकिटी, ज्यामुळे स्नायूंची ताठरता, जडपणा आणि हालचालींवर मर्यादा येतात. याचा परिणाम शारीरिक कार्यावर होतो. अस्पष्ट उच्चार, संवादात अडथळे निर्माण होतात. प्रत्येक व्यक्तीचा परिणाम वेगवेगळा असू शकतो. सुरुवातीच्या दिवसांमध्ये मेंदूला होणारी दुखापत आणि वय यासारख्या घटकांवर त्याचा प्रभाव असतो. मेंदूसंबंधी विकृती आणि दुखापती ओळखण्यासाठी एमआरआय किंवा सीटी स्कॅन, तसेच अनुवांशिक चाचणी तसेच इतर तपासणी करून घेणे गरजेचे आहे जेणेकरून समान लक्षणांसह इतर अंतर्निहित परिस्थिती जाणून घेता येईल. उपचारांच्या द़ृष्टीने सहाय्यक तंत्रज्ञानाचा वापर जसे की विशेष की-बोर्ड, मोबाईल अ‍ॅप्स आणि संगणक-आधारित विशेष प्रणाली ही मर्यादित शारीरिक क्षमता असलेल्या व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन क्रियामध्ये अधिक सुलभता मिळवून देते. याव्यतिरिक्त, रोबोटिक थेरपी ही स्नायूंची ताकद आणि मोटर स्किल्स वाढविण्यासाठी प्रभावी आहे. शारीरिक उपचार आणि पुनर्वसन हे सेरेब्रल पाल्सीच्या उपचारांचे अविभाज्य घटक आहेत. सेरेब्रल पाल्सीचे वेळीच व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. गुंतागुंत रोखण्यापासून ते व्यक्तीच्या विकासाला चालना देण्यासाठी याचा नक्कीच फायदा होतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT