Muscle pain causes | स्नायूदुखी आणि नसांमधील वेदना 
आरोग्य

Muscle pain causes | स्नायूदुखी आणि नसांमधील वेदना

पुढारी वृत्तसेवा

डॉ. अभय नेने

जेव्हा शरीरात कुठल्याही प्रकारचे दुखणे उद्भवते, तेव्हा त्याचे नेमके मूळ शोधणे उपचारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरते. विशेषतः, स्नायूंचे दुखणे आणि नसांचे दुखणे यामध्ये अनेकदा गल्लत केली जाते. या दोन्हीतील फरक समजून घेण्यासाठी काही महत्त्वाचे निकष आहेत.

शरीराच्या एखाद्या भागात होणारी वेदना नेमकी कशामुळे आहे, हे त्या वेदनेचे स्वरूप, ती कोठे जाणवते आणि कशामुळे वाढते किंवा कमी होते, यावरून ओळखता येते. स्नायूंच्या वेदनांना वैद्यकीय भाषेत ‘मायल्जिया’ असे संबोधले जाते. साधारणपणे अतिश्रम, किरकोळ दुखापत किंवा स्नायूंना आलेली सूज यामुळे हे दुखणे सुरू होते. स्नायूंच्या वेदनांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या शरीराच्या एका विशिष्ट जागीच एकवटलेल्या असतात. हालचाल केल्यास या वेदना अधिक तीव्र होतात. मात्र, विश्रांती घेतल्यावर त्यात लक्षणीय सुधारणा होते. ही वेदना ओळखीची आणि ठरावीक जागीच जाणवणारी असते, ज्यामुळे त्याचे निदान करणे तुलनेने सोपे जाते.

याउलट नसांच्या वेदना किंवा ‘न्यूरोपॅथी’चे स्वरूप पूर्णपणे वेगळे आणि काहीसे अनोळखी असते. हे दुखणे एका जागी स्थिर न राहता पसरत जाते. याची सुरुवात हाता-पायांना मुंग्या येणे, बधीरपणा जाणवणे किंवा सुया टोचल्यासारख्या संवेदना होण्यापासून होते. अनेकदा हाता-पायांमध्ये जळजळ झाल्यासारखे वाटते आणि ही कळ हळूहळू वरच्या दिशेला सरकत जाते. विशेषतः, मधुमेहाने त्रस्त असलेल्या रुग्णांना अशा प्रकारच्या वेदनांचा अनुभव वारंवार येतो. नसांच्या वेदनांमागे केवळ गंभीर आजारच असतात असे नाही, तर अनेकदा जीवनशैली आणि आहारातील त्रुटीही कारणीभूत ठरू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT