डॉ. गौरांगी वैद्य
तोंडातील एखादी लहानशी जखम किंवा फोड (अल्सर) हे सहसा किरकोळ दुखापत, आहारातील बदल किंवा तात्पुरत्या उष्णतेमुळे असू शकतात. अनेकदा अशा जखमा काही दिवसांत आपोआप भरून येतात. मात्र, हा फोड किंवा चट्टा दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ तसाच राहिला, तर त्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
वैद्यकीय निरीक्षणांनुसार, ओरल कॅन्सरची अनेक प्रकरणे ही सुरुवातीला साध्या वाटणार्या; पण बराच काळ न भरणार्या जखमांमुळेच बळावलेली दिसतात. अनेक रुग्ण तोंडातील जखमेकडे सुरुवातीला दुर्लक्ष करतात. जेव्हा ते डॉक्टरांचा सल्ला घेतात, तेव्हा आजार पहिल्या टप्प्याच्या पलीकडे गेलेला असतो. वास्तविक, वेळेवर निदान होणे आणि उपचाराचा परिणाम यांचा थेट संबंध असतो. सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास तोंडाचा कर्करोग मर्यादित शस्त्रक्रिया किंवा उपचारांनी बरा होऊ शकतो. याउलट, आजार बळावल्यावर तो ऊती (टिश्यूज), मानेतील लसिका ग्रंथी (लिम्फ नोडस्) आणि हाडांपर्यंत पसरतो. यामुळे उपचार अधिक गुंतागुंतीचे आणि प्रदीर्घ होतात.
ओरल कॅन्सरसाठी काही प्रस्थापित घटक कारणीभूत ठरतात. यामध्ये तंबाखूचे सेवन, मद्यपान आणि ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचा (एचपीव्ही) संसर्ग यांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त तोंडाची अस्वच्छता, पोषक तत्त्वांची कमतरता आणि तोंडात वारंवार होणारी जळजळ किंवा घर्षण यांमुळेही कर्करोगाचा धोका वाढतो. मुख कर्करोगाचे एक मोठे आव्हान म्हणजे सुरुवातीच्या जखमा अनेकदा वेदनारहित असतात. दुखत नसल्यामुळे रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करतो. वास्तविक, लक्षणे दोन आठवड्यांहून अधिक काळ राहिल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाणे गरजेचे असते.
1. न भरणारी तोंडातील जखम किंवा फोड.
2. जिभेवर किंवा तोंडाच्या आतील बाजूस असलेले पांढरे किंवा लाल चट्टे.
3. तोंडात निर्माण झालेली गाठ किंवा कडकपणा जाणवणे.
4. कारणाशिवाय होणारा रक्तस्राव.
5. गिळताना त्रास होणे किंवा आवाजात बदल होणे.
या जखमेवर वेळीच उपचार केले नाहीत, तर ती आजूबाजूच्या स्नायू आणि हाडांवर आक्रमण करते. पुढील टप्प्यात हा कर्करोग मानेतील ग्रंथींमध्ये पसरतो आणि नंतर शरीराच्या इतर भागांतही जाऊ शकतो. यामुळे केवळ जगण्याची शक्यता कमी होत नाही, तर दैनंदिन शारीरिक कार्यांवरही (गिळणे, बोलणे, चघळणे) मर्यादा येतात.
सबब, तोंडातील कोणतीही जखम 14 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकली, तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून किंवा दंतवैद्याकडून तिची तपासणी करून घ्यावी. तंबाखू आणि मद्यपानापासून दूर राहणे हा कर्करोगाचा धोका कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. जे लोक तंबाखू किंवा इतर जोखीम असलेल्या घटकांच्या संपर्कात आहेत, त्यांनी वेळोवेळी तोंडाची तपासणी करून घेणे हिताचे असते.