मेघना ठक्कर
जीभ हा शरीराचा अतिशय संवेदनशील भाग आहे. म्हणूनच ज्यावेळी तोंड येते म्हणजेच जीभेवर पुरळ येतात, ती लाल होते, तेव्हा भरपूर वेदना होतात. हा त्रास होण्याचे कुठले एक विशिष्ट कारण नसून त्यामागची सामान्य कारणे म्हणजे जीभ चावली जाणे किंवा ब्रश आणि टूथपिकचा वापर करताना तेथे जखम होणे ही होय.
काही वेळेला विषाणूंच्या संसर्गामुळे, अनुवंशिकता, हार्मोनल बदल, कमकुवत प्रतिकारशक्ती, अति तिखट, मसालेदार किंवा खारट पदार्थ खाण्यामुळे, पोटाच्या तक्रारींमुळे, तणावामुळे तसेच मिनरल्स आणि झिंक, फॉलिक अॅसिड, लोह आणि 'ब' जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे देखील हा त्रास होता. हा त्रास कमी होण्यासाठी काही नैसर्गिक उपाय फायद्याचे ठरतात; पण त्रास एका आठवड्यापेक्षा अधिक काळ होत राहिला तर मात्र डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
कोरफड ः कोरफडीमध्ये बरे करण्याची आणि जखम भरून काढण्याचा गुणधर्म आहे. तसेच यामध्ये असलेल्या विशिष्ट गुणधर्मांमुळे वेदना आणि आग कमी होते. त्यासाठी कोरफडीच्या पानांचा रस काढावा आणि तो थेट संसर्ग झालेल्या भागावर लावावा. दिवसातून तीन-चार वेळा ही कृती करावी. तसेच दुसरा पर्याय म्हणजे कोरफडीचा ज्यूस करून त्याने तीन-चार वेळा गुळण्या कराव्यात.
बेकिंग सोडा ः तोंड आल्यानंतर खाण्याचा सोडा देखील उपायकारक ठरतो. यामुळे वेदना कमी होतात आणि संसर्गही कमी होतो. अर्धा चमचा सोडा थोड्या पाण्यात मिसळून पेस्ट बनवावी. लाल झालेल्या भागावर ती पेस्ट एक मिनिट लावावी आणि कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात. एक ग्लासभर पाण्यात कोमट पाण्यात खायचा सोडा टाकून हे मिश्रण गुळण्याकरण्यासाठी काही वेळ वापरावे.
हायड्रोजन पेरॉक्साईड ः तोंड आलेल्या भागासाठी हायड्रोजन पेरॉक्साईड हे एक प्रभावी जंतूनाशक आहे. हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये विषाणूंना प्रतिबंध करणारे घटक मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका टाळता येतो. यासाठी गरम पाण्यामध्ये थोडेसे हायड्रोजन पेरॉक्साईड टाकावे. हे मिश्रण तोंड आलेल्या भागावर कापसाच्या साहाय्याने लावावे. काही सेकंद तसेच राहू द्यावे. यानंतर गरम पाण्याने चुळा भराव्यात. दिवसातून चार-पाच वेळा ही क्रिया करावी. काही दिवसांतच तोंड बरे होईल.
मीठ ः मीठ हे नैसर्गिक जंतूनाशक आहे. मिठाचा वापरही तोंड आलेल्या समस्येमध्ये प्रभावी ठरतो. एक कप कोमट पाण्यात एक चमचा मीठ टाकावे. हे मिश्रण नीट ढवळून घ्यावे. या मिश्रणाने दिवसातून तीन ते चार वेळा खळखळून चुळा भराव्यात. जोपर्यंत तोंड आलेली समस्या पूर्ण बरी होत नाही तोपर्यंत हा उपचार सुरू ठेवावा.
मध ः मधामध्ये देखील जखम भरून येण्याचा गुणधर्म असतो. शिवाय वेदनाही त्यामुळे कमी होतात. थोडेसे मध बोटावर घेऊन ते वेदना होत असलेल्या जिभेच्या भागावर दिवसातून दोन-तीन वेळेला लावावे. तसेच एक चमचा मधात अर्धा चमचा हळद टाकून हे मिश्रण किमान पाच मिनिटे जिभेवर लावावे आणि नंतर कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात, ही कृती दिवसातून तीन ते चार वेळा काही दिवस करावी.
तुरटी ः तुरटीमध्ये अॅस्ट्रिजंट आणि अँटिसेप्टिक गुणधर्म असतात. यामुळे वेदना, आग होणे कमी होते आणि जखम भरून निघते. त्यासाठी तुरटीची अगदी थोडी पावडर वेदना होत असलेल्या भागावर लावावी. एक मिनिट तसेच ठेवावे आणि नंतर गुळण्या कराव्या. थुंकीसोबत तुरटीची पावडर गिळू नये. गरज वाटल्यास दुसर्या दिवशी पुन्हा हीच कृती करावी.
त्वरित वेदना दूर करायची असल्यास बर्फाचा छोटा तुकटा जिभेच्या वेदना होत असलेल्या भागावर ठेवावा. तसेच थोड्या थोड्या वेळाने अत्यंत गार पाण्याचा छोटासा घोट, घेता येऊ शकतो. जीवनसत्त्व 'ब-12'चे सप्लिमेंटस् गोळ्यांच्या स्वरूपात घेता येऊ शकते. काही पदार्थांची अॅलर्जी असल्यास ते पदार्थ टाळावेत. तसेच दात घासताना जिभही नियमितपणे स्वच्छ करावी. नियमितपणे माऊथवॉशने गुळण्या कराव्यात, त्यामुळे जंतू संसर्ग होत नाही. धूम्रपान करू नये. ताणतणाव वाढल्यानंतर सुद्धा तोंड येते. त्यामुळे ताण घालवण्यासाठी नियमितपणे योगा, दीर्घ श्वसन आणि योग्य आहार या गोष्टी कराव्यात. तसेच तोंड येत असल्यास टूथपेस्ट बदलून बघावी. ज्या टूथपेस्टमध्ये सोडियम लॅऊरिल सल्फेट आहे ती वापरू नये. ब्रश हळूवारपणे करावा आणि त्याचे दात मऊ असावेत.
तोंडात व्रण पडणे, अल्सर होणे यालाच 'स्टोमॅटायटिस' किंवा अफ्थरस अल्सर असे म्हणतात. बरेच दिवस मोठ्या प्रमाणात प्रतिजैविके व वेदनाशामक औषधे घेतल्यास शरीरास उपयुक्त जीवाणूदेखील मारले जातात. शिवाय अशा औषधांच्या जोडीला पूरक म्हणून जीवनसत्त्वाची औषधे घेतलेली नसल्यास आवश्यक जीवनसत्त्वे कमी होतात. त्यामुळेदेखील तोंडात व्रण पडू शकतात. वारंवार तोंड येणे हे अपचनाचे आणि शरीरात उष्णता वाढल्याचे लक्षण असते. स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळीच्या अनियमिततेमुळे, विशेषतः पाळी उशिरा येण्याने, अंगावरून कमी रक्तस्राव होण्यानेसुद्धा असा त्रास होऊ शकतो. रात्रीची जागरणे टाळणे, संध्याकाळचे जेवण वेळेवर करणे आणि आहारात घरी बनविलेल्या साजूक तुपाचा पुरेशा प्रमाणात समावेश करणे यासारखे उपाय करावेत. अर्थातच सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे सातत्याने तोंड येत असल्यास त्यावर घरगुती उपाय करण्यात वेळ न दवडता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.