आरोग्य

‘कोरोना’त मातृत्व : काय काळजी घ्याल?

Pudhari News

डॉ राहुल साळुंखे

कोरोना हा आजार संपूर्ण शरीरावर परिणाम दाखवतो. ज्यामुळे त्याचा प्रभाव गर्भवती महिलांवर आणि सोबतच होणार्‍या बाळावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

संपूर्ण देश कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदीत आहे आणि समोर उद्भवलेली परिस्थिती लवकर निवळेल, असे अजून वाटत नाही. अशा परिस्थितीत बरेच लोक घरून काम करत आहेत आणि कामाचे वातावरण नसताना आणि एकूण परिस्थिती लक्षात घेता बर्‍याच जणांना यामुळे ताण म्हणजेच डिप्रेशन  आणि एन्झायटी होत आहे; तर अनेक अपत्यहीन जोडप्यांना बाळ हवे आहे; मात्र ते आयवीएफ उपचाराची मदत घेऊ शकत नाहीत.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव हा कुणालाही होऊ शकतो आणि काही जणांची अशी सुद्धा समजूत आहे की, गर्भधारण करू इच्छिणार्‍या महिलांना याच्या प्रादुर्भावाचा धोका जास्त आहे. कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती या दरम्यान कमी असते. त्यामुळे बर्‍याच जोडप्यांना ज्यांना आयवीएफ उपचार घ्यायचे होते, त्यांनी आपला हा निर्णय आता लांबणीवर टाकला आहे. तर काहींनी कोविड 19 ची परिस्थिती लक्षात घेता आपल्या उपचाराची तारीख लांबणीवर टाकली.

नपुंसकता ही व्याधी समाजात नेहमीच वेगळ्या द़ृष्टीने बघण्यात आलेली आहे. मातृत्व याला समाजात वेगळे स्थान आहे. ते नसेल तर समाजात त्या कुटुंबाला वेगळ्या नजरेने पाहिले जाते. म्हणूनच प्रत्येक जोडप्याला मूल हवे असते आणि ते नैसर्गिकद़ृष्ट्या होत नसेल तर शेवटी त्यासाठी सध्या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. त्यात आयवीएफ उपचार घेणार्‍या महिलांना खूप वाट बघावी लागते. त्यामुळे त्या आणखी तणावामध्ये असतात. हा उपचार घेताना विशेष काळजी घ्यावी लागते. डॉक्टरांना वेळोवेळी भेटावे लागते. त्यामुळे अशा महिलांना उपचारादरम्यान कोरोना संसर्गाचा धोका असतो.

आई होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असणार्‍या महिलांना सध्याची परिस्थिती ही खूप कठीण, तणावपूर्ण आणि त्रासदायक ठरू शकते. कारण काही महिलांसाठी हा काळ आई होण्याची शेवटची संधी असेल; तर काही जणींची मेनोपॉजकडे वाटचाल सुरू झाली असेल. काही जणींनी वर्षानुवर्षे या काळाची वाट बघितली असेल. या सगळ्यांच्या इच्छांना तूर्तास तरी कोविड 19 मुळे आळा बसला आहे. इतकेच नव्हे, तर बर्‍याच जणी उपचाराच्या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत पोचल्या असून त्यांना आता कोरोनाचा  प्रादुर्भाव कमी होईपर्यंत वाट बघावी लागणार आहे. त्यांनी आधीच या संपूर्ण गोष्टींसाठी खूप वाट बघितली आहे आणि आता परत या महामारीमुळे त्यांचे स्वप्न आणखी लांबणीवर गेले आहे.

गर्भधारणेच्यावेळेस होणारे शारीरिक बदल हे कुठल्याही महिलेसाठी खूप तणावपूर्ण असतात. त्यामुळे त्यांना ताण, एन्झायटी, डिप्रेशन, सतत बदलणारा मूड या सगळ्या बाबींना सामोरे जावे लागते. अशा महिलांनी स्वत:ची जास्त काळजी घेणे गरजेचे असते. ज्या महिला आयवीएफ उपचार घेत आहेत किंवा ज्या गर्भवती आहेत, त्यांनी तर सतत चांगला विचार करावा व आपला भावनिक तोल कोणत्याही परिस्थितीत ढासळू देऊ नये.

प्लॅसेंटा ट्रान्सफर करत असताना प्रादुर्भावाची अजूनपर्यंत तरी कुठलीही घटना समोर आलेली नाही; मात्र इतर आजारांसारखा हा आजारसुद्धा आईकडून बाळाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

कोरोना हा आजार संपूर्ण शरीरावर परिणाम दाखवतो, ज्यामुळे त्याचा प्रभाव गर्भवती महिलांवर आणि सोबतच होणार्‍या बाळावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही कोरोनाच्या संसर्गामुळे गर्भपात, वेळेआधी बाळाचा जन्म किंवा बाळाचा एखाद्या शारीरिक कमीमुळे झालेला जन्म असे काहीही आढळून आलेले नाही. त्यामुळे घाबरून जाऊ नये. 

फर्टिलिटी उपचारादरम्यान पाळाव्या लागतील अशा कुठल्याही अधिसूचना जाहीर करण्यात आलेल्या नाही; मात्र सद्य:स्थितीत सगळे स्वतःहून काळजी घेत आहेत. त्यामुळे काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आई आणि बाळाला या संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी आयवीएफ सेंटर्सनी स्वतःहून उपचार लांबवले आहेत. कारण या उपचारासाठी रुग्णांना सारखे दवाखान्यात येणे गरजेचे असते. बरेच स्त्री रोगतज्ज्ञ सध्या ऑनलाईन कन्सल्टेशन घेेत आहेत, जेणेकरून ते या संसर्गापासून दूर राहावेत.

बाळाच्या जन्माच्या आधी आणि जन्मानंतर सगळ्या जोडप्यांनी आईला आणि बाळाला कसलाही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यायलाच हवी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT